६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय लोटलीकर यांनी पूर्वीचे ‘वैभवशाली कोकण’ आणि आताचे ‘उदासीन कोकण’ यांविषयी केलेले यथार्थ वर्णन !
कोकण ही भगवान परशुरामाची भूमी ! पूर्वीपासूनच कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. अशा या निसर्गसंपन्न कोकणाविषयी सनातनचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. विजय लोटलीकर यांनी पूर्वीचे वैभवशाली कोकण, आताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यांत असलेला भेद यांविषयी लेखन केले आहे. ते वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. पूर्वीचे वैभवशाली कोकण
१ अ. एकत्र कुटुंबपद्धत : ‘पूर्वी कोकणात एकत्र कुटुंबपद्धत होती. एक कुटुंबप्रमुख आणि अनेक जण त्याच्या आश्रयाखाली रहात होते. ‘कुटुंबप्रमुखाने सांगितलेले सर्वांनी ऐकावे’, अशी पद्धती होती. कुटुंबप्रमुखाने दिलेला निर्णय घरातील सर्व जण ऐकत असत. त्यामुळे अनेक कुटुंबे आनंदाने जीवन जगत होती.
१ आ. धान्याची मुबलकता आणि एकमेकांवर असलेला विश्वास यांमुळे जीवन आनंदी असणे : ‘मुबलक प्रमाणात असलेले धान्य’, हे कोकण प्रांताचे वैभव होते. त्यामुळे पैशांची आवक अल्प असली, तरी सर्व कुटुंबे आनंदात होती. दैनंदिन प्रत्येक कार्य एकमेकांवर अवलंबून होते. जे आपल्याकडे आहे, ते इतरांना दिले की, त्यांच्याकडूनही आपल्याला साहाय्य मिळते, उदा. नाभिक (न्हावी) वर्षभर घरी येऊन सर्वांचे केस कापायचा. तेव्हा त्याला शेतात पिकलेले तांदूळ दिले जायचे, तसेच शेतात काम करणार्या शेतमजुरांना शेतात पिकणारे धान्य दिले जात होते. त्यामुळे एकमेकांविषयी आदर असायचा. कोकणात सुखसमृद्धी होती. लोकांच्या हातात पैसा अल्प असला, तरी आनंद अधिक होता. प्रत्येकाची कष्ट करण्याची सिद्धता होती.
१ इ. एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती
१. पूर्वी शेतकर्यांकडे आर्थिक आवक अल्प होती, तरी सर्व शेतकरी एकत्र येऊन एकमेकांच्या शेतात काम करून साहाय्य करायचे आणि आनंद मिळवायचे. यातून एकमेकांना साहाय्य करण्याची त्यांची वृत्ती दिसायची.
२. पूर्वी गावात सरकारी रुग्णालये नव्हती. त्या वेळी रुग्णाईत व्यक्तीला डोलीतून दूर अंतरावर असलेल्या आधुनिक वैद्याकडे नेले जायचे. गावातील सर्व जण रुग्णाईत व्यक्तीची विचारपूस करून तिला साहाय्य करायचे. कुणाच्या घरी एखादी व्यक्ती रुग्णाईत असेल किंवा कुणाला एखाद्या प्रसंगात अडचण आली, तर सर्व जण त्याच्या साहाय्यासाठी जात होते.
१ ई. मुबलक प्रमाणात असलेले पशुधन ! : पूर्वी प्रत्येकाकडे गायी-गुरे होती. त्यांना वनात चरायला नेले जायचे. त्यामुळे प्राणीही आनंदी होते. वनचर प्राण्यांना त्यांचे भक्ष्य शोधण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत नव्हते. आता मात्र सर्वत्र पाळीव प्राणी तुरळक प्रमाणात दिसतात. गावात ठराविक व्यक्तींकडेच गायी किंवा अन्य गुरे दिसतात. शेतकुरणे अल्प झाल्याने गुरांना चारा मिळत नाही. त्यामुळे गुरे पाळणे कठीण झाले आहे.
२. सध्याची स्थिती
कोकणातील आताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यात अनेक पटींनी भेद जाणवतो.
२ अ. हिंदूंनी आपली जनावरे कसायांना विकणे आणि गावात प्राणी-पक्षी यांचे प्रमाण अल्प होणे : गावात ‘गायी-गुरांना बागेत घेऊन जातो’, असे सांगून कसायाकडे कापायला घेऊन जाणार्या व्यक्ती आहेत. हिंदू त्यांची जनावरे कसायांना विकत आहेत. त्यामुळे गावात पाळीव प्राणी राहिले नाहीत. नैवेद्याचे पान देण्यासाठी गावात गाय शोधावी लागते, असे दिवस आता गावात आले आहेत. गायी विकल्यामुळे अनेक कुटुंबे शापित झाली आहेत आणि त्यांचे वैभव न्यून झाले आहे. झाडांना लागणारे खतही मिळेनासे झाले आहे. सर्वत्र आधुनिकीकरणाचा वापर वाढला आहे. पाळीव प्राण्यांवर अवलंबून असणारे प्राणी नष्ट झाले आहेत. कावळे, चिमण्या इत्यादी पक्षी अल्प प्रमाणात आहेत.
२ आ. मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे वनातील प्राणी (वानर, वाघ, रानरेडे, हत्ती इत्यादी) घराजवळ येऊन कुत्रे, मांजर आदींची शिकार करू लागल्याने मनुष्य भयभीत होणे : भूमी खरेदी करणार्या व्यक्तीकडे विदेशातील पैसा असतो किंवा तिचा मोठा व्यवसाय असतो. त्यामुळे या व्यक्तींना भूमी खरेदी करणे सोपे होते. काळ्या पैशाचा वापर कोकणातील भूमी खरेदी करण्यासाठी झाला. त्यामुळे कोकणात वने राहिली नाहीत. जंगलतोडीमुळे रानातील प्राणी (वानर, वाघ, रानरेडे, हत्ती इत्यादी) घराजवळ येऊ लागले आहेत. पूर्वी वनात वाघ दिसला किंवा त्याचा आवाज जरी ऐकला, तरी मनुष्य हतबल होत होता; परंतु आता वाघ दिवसा, संध्याकाळी किंवा रात्री कधीही घराजवळ येऊन कुत्रे, मांजर इत्यादी जनावरे घेऊन जात आहे. माणसाला वाघापासून भय निर्माण झाले आहे. अन्य वनचर प्राणी शेताची नासाडी करत आहेत.
२ इ. मजुरीत वाढ होणे आणि मजुरांमध्ये अल्प काम करण्याची वृत्ती निर्माण होणे : पूर्वी पुष्कळ माणसे एकत्र येऊन शेती करायचे. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळायचे. आता एकटा मनुष्य शेती करतो. त्यामुळे शेती किंवा अन्य व्यवसाय करणे कठीण झाले आहे. शेतीसाठी कामगार आणि बैलजोडी मिळत नाही. पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या मजुरीत वाढ झाल्याने मजुरी देणेही परवडत नाही. गावातील गरीब माणसाला कामगारांकडून काम करून घेणे कठीण झाले आहे, तसेच व्यय अधिक आणि उत्पन्न मिळण्याचा भाग अल्प झाला आहे. याला उत्तरदायी माणूसच आहे. भूमालक (जमीनदार) त्यांच्याकडे काम करणार्या कामगाराला मोठ्या प्रमाणात मजुरी देऊ लागला. त्यामुळे मजुरांमध्ये अल्प काम करण्याची वृत्ती निर्माण झाली. गावात कामे पुष्कळ असूनही मजूर नाहीत आणि मजुरी देऊनही कामगार नीट काम करत नाहीत. त्यामुळे मालकाला लाभ होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२ ई. शेतात काम करण्यासाठी बाहेरील देशातून मजूर मागवले जाणे : आता गावात काम करण्यासाठी नेपाळमधून मजूर मागवले जातात. ते चांगल्या प्रकारे काम करतात. ‘ते ठराविक वेळेतच काम करतात’, असे नाही. ते तुम्ही सांगाल ते काम वेळेचे कोणतेही बंधन न ठेवता करतात. त्यामुळे कोकणात आंबा, काजू आणि मच्छी असे अनेक प्रकारचे व्यवसाय करणे शक्य झाले आहे. गावातील लोक स्वतः काम करत नाहीत आणि काम करणार्यांना त्रास देतात. सरकारने कोकणातील माणसाला पंगू बनवले आहे. त्यामुळे कोकणी माणसाचे रहाणीमान आणि वागणे यांत पालट झाले आहेत. त्यांच्यात उदासीनता निर्माण झाली आहे.
२ उ. शासकीय योजनांमुळे पुष्कळ पैसा हाती आल्याने कोकणातील लोकांना कष्ट करण्याची सवय न रहाणे : सरकार ‘प्रतिकिलो २ रुपये’ या भावाने प्रत्येक व्यक्तीला १५ ते ३० किलो धान्य देत आहे. त्यामुळे ‘शेती करायला नको’, अशी लोकांची मानसिकता झाली आहे, तसेच गावात घर आणि शौचालये बांधण्यासाठी सरकारकडून पैसे मिळतात. लोकांना मोठी शस्त्रकर्मे करण्यासाठी पैसे मिळू लागले. पैसा पुष्कळ मिळाल्यामुळे कोकणातील लोक उदासीन होऊन त्यांची कष्ट करण्याची सवय गेली आणि त्यांना ऐषोराम करण्याची सवय लागली. त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाली आहे. माणसांना एकमेकांची जाण राहिली नाही. कोकणातील समृद्धी जाऊन आता उदासीनता आली असून माणूस पूर्वीपेक्षा दुःखी झाला आहे.
२ ऊ. पूर्वी पैशाची समृद्धी नसून प्रेमाची समृद्धी असल्यामुळे पुष्कळ आनंद मिळणे : निसर्ग आणि हवामान यांत झालेल्या पालटांमुळे वस्तूंचे उत्पादन अल्प होऊन त्यांच्या मूल्यात वाढ झाली. पूर्वी पैशाची समृद्धी नव्हती; परंतु प्रेमाची समृद्धी होती. माणूस माणसाला धरून आणि अनेक कुटुंबे एकत्र पद्धतीने रहात होती. त्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद मिळत होता. आता तो मिळत नाही. आता कोकणातील घरामध्ये १ – २ व्यक्ती किंवा वयोवृद्ध रहातात. तरुण पिढी गावात रहात नसल्यामुळे अनेक घरे बंद आहेत. आता लोकांना गावाला जावेसे वाटत नाही; कारण तेथे पूर्वीचे वैभव राहिले नाही. पूर्वी लहान मुलांना सांगितले जायचे, ‘मामाच्या गावाला जाऊया’; पण आता मामाच तेथे रहात नाही’, हे वास्तव आहे.
– श्री. विजय लोटलीकर, डोंबिवली, ठाणे. (१३.२.२०१७)