रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
१. श्री. मिलिंद पोशे, नवीन पनवेल
१ अ. कुटुंबातील सर्व जण मिळून सामूहिक नामजप करतांना त्याचे महत्त्व लक्षात येणे : ‘कुटुंबातील सर्व जण रात्री ८ वाजता सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करून नामजपाला बसलो. नामजपाला बसतांना ‘आम्ही रामनाथी आश्रमामध्ये यज्ञाच्या ठिकाणी बसून प्रत्येक नामजपासह आहुती देत आहोत’, असा भाव ठेवून आणि प्रार्थना करून नामजपाला आरंभ केला. आरंभी प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत होता. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या वेळी ‘ॐ नमः शिवाय ।’ आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपाच्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा चुकीच्या पद्धतीने नामजप होत असल्याचे लक्षात आले. वाईट शक्ती अनावश्यक नामजप मधेच घालून आमचा नामजप चुकवत असल्याचे लक्षात आले. त्या वेळी ‘सूक्ष्मातून केवढे मोठे युद्ध चालू आहे’, याची जाणीव झाली; पण एकत्रितपणे नामजप केल्यामुळे ‘मी कुठे चुकत आहे ?’, हे कळत होते. त्यामध्ये इतरांचे साहाय्य मिळत होते. त्यामुळे सामूहिक नामजपाचे महत्त्व लक्षात आले.
१ आ. क्षमायाचना आणि प्रार्थना केल्यावर नामजपातील अडचणी दूर होणे : नामजप करतांना श्री दुर्गादेवीचा नामजप व्यवस्थित होत होता; परंतु दत्त आणि शिव यांचा नामजप होतांना मनात इतर विचार येऊन नामजप चुकायचा. देवाची क्षमायाचना करून तळमळीने प्रार्थना करून स्वतःवरील वाईट शक्तीचे आवरण काढल्यावर नामजपातील अडचणी दूर झाल्या.
१ इ. नामजपाच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्री दुर्गादेवी, कुलदेवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व अनुभवता येणे : काही वेळाने नामजप एकाग्रतेने आतून होत असल्याचे लक्षात आले. घरातील स्पंदनेसुद्धा पालटली आणि ‘शरिरातून बरेच काही निघून जात आहे. त्रासदायक शक्ती तोंडावाटे शरिराबाहेर पडत आहे’, असे वाटून हलके वाटले. सगळ्यांना ‘रामनाथी आश्रमामध्ये यज्ञाच्या ठिकाणी बसून नामजप करत आहोत’, असा अनुभव आला. पुष्कळ चैतन्य मिळून नामजपाच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्री दुर्गादेवी, कुलदेवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व अनुभवता आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे हा नामजप करता आला’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्रीमती रुक्मिणी पोशे, नवीन पनवेल
२ अ. सर्व संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर, सर्व देवदेवता यांचे दर्शन होऊन त्यांचे अस्तित्व अनुभवता येणे : ‘आपण आश्रमातच आहोत आणि तेथे मोठा यज्ञ चालू असून प्रत्येक नामजपासह त्यात आहुती देत आहोत’, असे वाटून मला पुष्कळ चैतन्य जाणवले. मला आवरण अल्प होत असल्याचे जाणवले. तेथे सर्व संत आणि सद्गुरु यांचे दर्शन झाले. सर्व देवदेवता उपस्थित असल्याचे जाणवून त्यांचे अस्तित्व अनुभवता आले. सर्वांना पुष्कळ चांगले आणि चैतन्यमय वाटून आवरण न्यून झाले अन् शक्तीही जाणवत होती.’
३. सौ. शोभा वत्सराज, पनवेल
अ. ‘आम्हाला जप करतांना ‘आपण यज्ञाच्या ठिकाणीच आहोत’, असे अनुभवून पुष्कळ आनंद मिळाला.’
|