परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असल्याने ‘सेवा आणि साधना’ हेच जग असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील साधक कै. मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे) !
पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे ३०.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्याविषयी नोएडा येथे रहाणारी त्यांची मावसबहीण आणि पुणे येथील साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. मोहिनी कुलकर्णी (मावसबहीण), नोएडा
१ अ. मोहन चतुर्भुज यांनी साधनेसाठी पुष्कळ साहाय्य करणे : ‘कै. मोहन चतुर्भुज माझे सख्खे मावसभाऊ. लहानपणापासून त्यांनी शिक्षण आणि नोकरी यांसाठी फार कष्ट केले. त्यांनी नातेवाइकांनाही निरपेक्षपणे साहाय्य केले. त्यांनी कधी कशाविषयीही गार्हाणे केले नाही. त्यांच्यामुळेच माझी साधना चालू झाली. त्यांनी मला साधनेसाठी पुष्कळ साहाय्य केले. एखादे सूत्र सांगितल्यावर ते त्याचा आढावाही घ्यायचे. ‘पतीविषयी मनात कृतज्ञतेचा भाव असू दे. साधनेकडे लक्ष दे’, अशी सूत्रे ते मला नेहमी सांगायचे. आमचे व्यावहारिक बोलणे फारच अल्प व्हायचे. त्यांची प्रत्येक गोष्ट साधनेला धरूनच असायची. काही दिवसांपूर्वी ते मला म्हणाले होते, ‘‘तू मृत्यूला घाबरू नकोस. आपले गुरु अतिशय महान आहेत. ते मृत्यूनंतरही साधना करवून घेतात.’’
१ आ. मोहन चतुर्भुज यांच्या मृत्यूविषयी आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी मिळालेली पूर्वसूचना !
१ आ १. ‘मोहन चतुर्भुज आता परत येणार नाहीत आणि साधनेच्या तीव्र तळमळीमुळे ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटले असावेत’, असे वाटणे : ‘मोहन चतुर्भुुज अतीदक्षता विभागात आहेत’, असे कळल्यावर ‘ते आता परत येणार नाहीत. ते कशातही अडकले नाहीत’, असे मला वाटत होते. त्यांचा हसरा तोंडवळा सारखा माझ्या दृष्टीसमोर येत होता. गुरुदेवांवर अतूट श्रद्धा, सकारात्मकता आणि व्यष्टी साधनेमध्ये निरंतरता हे त्यांचे काही गुण होते. ‘त्यांच्यातील हे गुण आणि साधनेची तीव्र तळमळ यांमुळे ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटले असावेत’, असे मला वाटले.’
२. सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. राजश्री खोल्लम
२ अ. उत्साही : ‘चतर्भुजकाकांचे वय ६७ वर्षे असूनही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा होता. सेवा, वैयक्तिक कामे इत्यादी सर्व करतांना ते अखंड उत्साही असायचे. त्यांचे बोलणे आणि चालणेही उत्साही असायचे. ‘त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते दमले आहेत’, असे कधीच जाणवायचे नाही.’
३. सौ. प्रतिभा फलफले
३ अ. प्रेमभाव
१. ‘चतुर्भुजकाकांनी पूर्वी अधिकोषामध्ये ‘व्यवस्थापक (मॅनेजर)’ या पदावर नोकरी केली आहे. त्यांना अधिकोषाच्या संदर्भात एखादी माहिती विचारल्यावर ते अतिशय प्रेमाने आणि आत्मीयतेने मला समजावून सांगायचे. त्यामुळे ‘ते आपल्या कुटुंबातील आहेत’, असे वाटून मला त्यांचा नेहमी आधार वाटायचा.
२. काकांची पुणे जिल्ह्यातील अनेक साधकांशी जवळीक होती. त्यांचे निधन झाल्याचे समजल्यावर ‘आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले’, असे अनेक साधकांना वाटले. ‘आपले चतुर्भुजकाकाच गेले का ?’, असेही काही साधकांनी मला विचारले. प्रेमभावामुळे त्यांनी अनेक वाचकांशीही जवळीक साधली होती. वाचकांशी त्यांचे घरातल्यासारखेच संबंध होते.
३ आ. सेवेतील तत्परता आणि तळमळ : ते सर्वच सेवा तत्परतेने, तळमळीने आणि परिपूर्ण रितीने करायचे. ‘वाचकांना आकाशकंदिल, तसेच सात्त्विक उत्पादने नेऊन देणे किंवा अर्पणासाठी संपर्क करणे’, या सर्व सेवा ते तत्परतेने करायचे. ते ‘महाशिवरात्र आणि नवरात्रोत्सव या काळातील ग्रंथप्रदर्शन, तसेच धर्मरथावरील प्रदर्शन’, अशा सेवेमध्ये तळमळीने सहभागी व्हायचे.
३ इ. गुरुदेवांवरील श्रद्धेने प्रतिकूल प्रसंगातही स्थिर रहाणे : कु. मधुराला (मुलीला) तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही काकांना कधी तिची काळजी वाटली नाही. ‘गुरुदेवच मधुराची काळजी घेत आहेत’, असे ते सांगायचे. ‘काकांचे जीवन गुरुदेवमय झाले होते’, असे त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे. ‘सेवा आणि साधना’ हेच त्यांचे जग होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते रुग्णालयात उपचार घेत होते. तेव्हा भ्रमणभाषवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यावर ते प्रकृतीविषयी सांगून ‘गुरुदेव आहेत’, असे सांगायचे. या कठीण प्रसंगात गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे स्थिर राहून काका तेथेही नामजप करायचे.’
४. सौ. राजश्री खोल्लम
४ अ. प्रेमभाव : ‘काकांची कुठेही भेट झाली आणि ते कितीही घाईत असले, तरी ते आपणहून विचारपूस करून मगच पुढे जायचे.
४ आ. कृतज्ञताभाव : सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना आतापर्यंत प.पू. गुरुदेवांनी सर्वच स्तरांवर घेतलेली काळजी, मधुराला नामजपादी उपायांच्या संदर्भात मिळालेले संतांचे अनमोल मार्गदर्शन इत्यादींविषयी त्यांच्या मनात अपार कृतज्ञताभाव होता.’
५. सौ. अनुराधा तागडे
५ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘काका मुलगी कु. मधुरा आणि काकू यांना व्यष्टी साधनेसाठी साहाय्य करायचे.
५ आ. सेवेची तळमळ : सेवा परिपूर्ण होण्यासाठी ते साधकांना तळमळीने सांगायचे आणि सेवेत साहाय्यही करायचे. त्यामुळे सर्व साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा.’
६. सौ. नम्रता कोळसकर
६ अ. उद्योगासाठी प्रोत्साहन देणे : ‘कोरोना महामारीमध्ये माझी नोकरी गेल्यावर मी लघुउद्योग चालू केला. तेव्हा ‘पदार्थ सावकाश बनवत जा, साहाय्याला कुणी आहे का ? गिर्हाईक मिळवण्यासाठी चतुर्भुजकाकूंना सांग, त्यांच्या पुष्कळ ओळखी आहेत’, असे ते मला सांगायचे. मी केलेल्या पदार्थांचे ते भरभरून कौतुक करायचे.
६ आ. प्रेमभाव : चतुर्भुजकाका सेवेनिमित्त घरी आल्यावर घरातील अन्य सदस्यांचीही विचारपूस करायचे. त्यांनी नेहमीच माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम केले. ‘मला साधनेत साहाय्य होईल आणि माझी सेवा परिपूर्ण होईल’, अशा भावाने ते माझ्या चुका सांगायचे. मी त्यांच्याशी वैयक्तिक गोष्टी, तसेच साधनेविषयीही मनमोकळेपणाने बोलू शकत होते.’
७. श्री. विलास पाटील आणि सौ. नीता पाटील
७ अ. सतत सेवेचाच ध्यास असणे आणि वर्गणीदारांशी जवळीक निर्माण करणे : आम्हा उभयतांना काही वर्षे काकांचा सहवास लाभला. आम्ही साधनेला नुकताच आरंभ केला. तेव्हा काका अधिकोषात नोकरी करत होते. तेव्हापासून त्यांची साधना आणि सेवा चालू होती. अधिकोषात असतांनासुद्धा ते नेहमी सेवेचाच विचार करायचे. नोकरीच्या गावी काकांनी ‘सनातन प्रभात’चे अनेक वर्गणीदार केले होते. पुण्यात रहायला आल्यापासून काका-काकूंनी अनेक वर्गणीदारांना जोडून ठेवले आहे. वर्गणीदारांशी जवळीक निर्माण करण्याविषयी ते प्रयत्न करत.
७ आ. परात्पर गुरु डॉक्टर आणि देव यांच्यावर अपार श्रद्धा असणे : त्यांच्या मनात ‘आपण काहीच करत नसून देवच सर्व करत असतो. देवच आपल्याकडून सेवा आणि साधना करून घेत आहे. देवाच्या कृपेनेच आपण सेवा करू शकत आहोत’, असा भाव सतत असायचा. ते तसे बोलूनही दाखवायचे. ’
८. सौ. ज्योती दाते
८ अ. तळमळीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे सेवा पूर्ण करणे : ‘दिलेली सेवा पूर्ण होईपर्यंत काकांना चैन पडायचे नाही. ‘सेवा पूर्ण व्हायला हवी. ज्या विश्वासाने आपल्याला ही सेवा दिली आहे, तो विश्वास सार्थ ठरायला हवा’, अशी त्यांना तळमळ लागलेली असायची. ते अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करायचे. त्यांनी कधी सेवेत सवलत घेतली नाही. त्यांच्या सेवेत कधी लक्ष द्यावे लागायचे नाही.
८ आ. कठीण परिस्थितीला धिराने सामोरे जाणे : त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. तेव्हा ते घरी एकटेच होते. या कठीण प्रसंगाला ते अत्यंत धिराने सामोरे गेले. त्यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली आणि हार न मानता ते लढत राहिले.
८ इ. जाणवलेला पालट : ‘अलीकडे काकांचे नामजप आणि उपाय करणे, यांचे गांभीर्य वाढले होते. ते नियमित प्रयत्न करायचे.’
९. डॉ. नरेंद्र दाते
९ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘मुलगी कु. मधुरा आणि त्यांची पत्नी माधवी काही वेळा रामनाथी आश्रमात नामजपादी उपायांसाठी रहायच्या; परंतु याविषयी त्यांनी कधी गार्हाणे केले नाही. परिस्थिती स्वीकारून त्यांनी धैर्याने तोंड दिले. ते घरची कामे, उदा. स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे स्वतःच करायचे.
९ आ. सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे : कुठलीही सेवा करतांना ‘ती वेळेत कशी पूर्ण होईल ?’, याकडे त्यांचे लक्ष असायचे. सेवा वेळेत पूर्ण होणार नसेल किंवा काही अडचण असेल, तर ते तसे कळवायचे.’
१०. श्री. रवींद्र धांडे
१० अ. प्रांजळपणा : ‘सेवेमध्ये झालेल्या चुका ते प्रांजळपणे स्वीकारायचे. प्रत्येक मासात त्यांच्याकडून झालेल्या चुका आणि इतर साधकांनी सांगितलेल्या त्यांच्या चुकाही ते सांगायचे. तेव्हा ‘या चुका सुधारण्यासाठी अन्य साधकांना वेळ द्यावा लागेल’, याची त्यांना खंतही वाटायची.
१० आ. इतरांना समजून घेणे : पूर्वी आम्ही कधी कधी एकत्रित सेवा करायचो. मला सेवेसाठी पोचण्यास उशीर झाला, तरी त्यांचे कधीही गार्हाणे नसायचे. मी नवीन सेवा शिकतांना ते मला सेवेतील बारकावे आठवणीने सांगायचे.’
११. श्री. राहुल बिहाणी
अ. ‘काका सेवेसाठी कंटाळा न करता बराच प्रवास करायचे.
आ. त्यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा होती.’
१२. सौ. श्वेता तागडे
अ. ‘काका सतत सकारात्मक आणि आनंदी असायचे.
आ. त्यांनी संगणकीय सेवा तळमळीने शिकून घेतली आणि ती झोकून देऊन केली.’
१३. सौ. गौरी अभिजीत कुलकर्णी
‘चतुर्भुजकाका म्हणजे सेवेचा अखंड ध्यास, गुरुचरणांवर अढळ श्रद्धा, व्यष्टी साधनेतील सातत्य आणि उत्साहाचे मूर्तीमंत रूप होते. या वयातही काकांचा सेवेचा उत्साह, तत्परता आणि तळमळ यांतून पुष्कळ शिकायला मिळायचे. काका गेल्याचे कळले. तेव्हा मला एकदम धक्का बसला. माझा आतून परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा चालू झाला आणि प्रार्थना होऊ लागली.
१३ अ. व्यवस्थितपणा : काकांचे घर नेहमी व्यवस्थित असायचे. ‘घर म्हणजे गुरुदेवांचा आश्रम आहे’, असा त्यांचा भाव असायचा. त्यांचे सेवेचे साहित्य व्यवस्थित ठेवलेले असायचे. कधीही काही विचारले, तरी ते लगेच सांगायचे.
१३ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : दिवसभर समष्टी सेवा आणि घरातील कामे करून त्यांना रात्री झोपायला उशीर व्हायचा, तरीही त्यांची व्यष्टी साधना नियमित होत होती. ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे.
१३ इ. सेवेतील चुका सांगून ‘चालढकलपणा’ हा स्वभावदोष जाण्यासाठी साहाय्य करणे : व्यष्टी साधनेसेवेत माझ्याकडून बर्याचदा चुका व्हायच्या. काका मला त्या चुका सांगायचे; पण तेवढेच मला समजूनही घ्यायचे. माझ्यात ‘चालढकलपणा’ हा स्वभावदोष असल्यामुळे काही सूत्रे प्रलंबित रहायची. ते प्रत्येक वेळी मला त्या सूत्रांची आठवण करून द्यायचे. व्यष्टी साधनेचीही ते मला अधून-मधून आठवण करून द्यायचे.
१३ ई. सेवेची तळमळ असल्याने सेवा अविरत चालू असणे : ऊन-पाऊस असतांनाही काकांची सेवा अविरत चालू असायची. मध्यंतरी काही वैद्यकीय कारणांमुळे आधुनिक वैद्यांनी त्यांना ‘दुचाकी गाडी चालवू नका’, असे सांगितले होते. तेव्हा काका बसने किंवा रिक्शाने जाऊन सेवा पूर्ण करायचे. काका बर्याचदा त्यांची मुलगी आणि पत्नी यांना सोडण्यासाठी रामनाथी आश्रम, गोवा येथे जायचे; परंतु तेथे अधिक दिवस न रहाता सेवेला प्राधान्य देऊन त्वरित परत येऊन सेवा करायचे.
गुरुप्रिय एक साधक-फूल समर्पित झाले श्री गुरुचरणी आता ।सगुण साधनेचा काळ संपला, निर्गुण सेवाही सरली आता । श्री गुरुचरणी एकरूप होण्या चालले आमुचे चतुर्भुजकाका । – सौ. गौरी अभिजीत कुलकर्णी |
१४. सौ. शारदा हुमणाबादकर
१४ अ. परिस्थिती स्वीकारणे : काकांची मुलगी कु. मधुरा हिला बरे नसायचे. त्यामुळे ती एकटी कुठेच जाऊ शकत नव्हती. तिला गाण्याची आवड असल्याने काका ‘तिला गाण्याच्या शिकवणीला घेऊन जाणे, आणणे, परीक्षेला बसविणे’, असे सर्व करायचे. याविषयी ते कुठलेही गार्हाणे करायचे नाहीत.
१४ आ. कृतज्ञताभाव
१. ते म्हणायचे, ‘‘सेवेतील सर्व साधिका गृहिणी असूनही सर्व करतात. त्यामुळे आपण सेवा करू शकतो, नाहीतर आपण कसे करणार ?’’
२. ‘सध्याच्या ‘ऑनलाईन’ सेवांची कार्यपद्धत सर्वांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केली’, याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता होती.
१४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी भाव : मला कधी काही गोष्टींचा ताण आल्यास ते म्हणायचे, ‘‘काही काळजी करू नका. गुरुदेव आहेत. ते आपल्याला पुढे नेणारच आहेत. ते आपले प्रारब्ध संपवत आहेत. त्यांना सर्व ठाऊक आहे. आपण सेवा करत राहूया. प्रत्यक्षात आपण काय करतो ? आपली काही क्षमता नाही. गुरुदेवच सर्व करवून घेतात. त्यामुळे सर्व चालले आहे.’’ प्रत्येक भेटीत ते ही वाक्ये मला सांगायचे.’
मृत्यूनंतर कै. मोहन चतुर्भुज यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना आनंद होणे आणि त्यांचे साधनेचे प्रयत्न वाढणे‘रुग्णाईत असतांना यजमानांचा देह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ आहे आणि ‘ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते. ते सतत ‘गुरुमाऊली’ असेच म्हणत होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ईश्वराचाच ध्यास होता. मृत्यूनंतर यजमानांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित केले. त्या वेळी मी, मुलगी कु. मधुरा, मुलगा आणि सून यांना पुष्कळ आनंद झाला. मुलगा आणि सून यांच्यामध्ये फारच सकारात्मक पालट झाला आहे. आम्हा दोघींना (मला आणि मुलीला) कुठल्याच गोष्टीची काळजी वाटत नाही. मधुराचा आध्यात्मिक त्रास उणावला आहे. तिचे साधनेचे प्रयत्न वाढले असून मनाला शांतपणा जाणवत आहे. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने होत आहे. ‘आपली अशीच कृपादृष्टी आम्हावर असू दे आणि आमचे साधनेतील प्रयत्न वाढून आनंद घेता येऊ दे’, अशी गुरुमाऊलींना प्रार्थना आहे.’ – श्रीमती माधवी चतुर्भुज, पुणे (२४.५.२०२१) |
कै. मोहन शंकर चतुर्भुज यांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या आणि पत्नी यांना जाणवलेली सूत्रे अन् सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !कु. मधुरा चतुर्भुज१. कु. मधुरा मोहन चतुर्भुज (कै. मोहन चतुर्भुज यांची कन्या) १ अ. वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण आठवून मन स्थिर होणे : बाबांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला; पण तरीही देवाने मला स्थिर ठेवले. माझ्या मनात बाबांविषयीच्या स्मृती जाग्या होऊ लागल्या. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण आठवून मी स्थिर राहू शकले. १ आ. मला सूक्ष्मातून दिसले, ‘बाबांचा सूक्ष्मदेह परात्पर गुरु डॉक्टरांच्या हृदयात विलीन झाला आहे.’ त्या वेळी त्यांच्याभोवती मला पिवळ्या आणि निळ्या या रंगांचे वलय दिसले. १ इ. बाबांनी शेवटपर्यंत नामजप केला. त्यांचा प्राण गेल्यानंतर मला जाणवले, ‘त्यांचा जपयज्ञच झाला आहे.’ २. श्रीमती माधवी चतुर्भुज (कै. मोहन चतुर्भुज यांच्या पत्नी) ‘कै. मोहन चतुर्भुज यांची पुढील आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे मला आणि मधुराला वाटते. (‘प्रत्यक्षातही कै. चतुर्भुज यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’ – संकलक) |
|