१० सहस्र पाणीस्रोतांची होणार तपासणी ! – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर
सोलापूर – पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १० सहस्र ९३९ पाणीस्रोतांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
या उपक्रमाविषयी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण ९ सहस्र ४१७ इतके पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत, तर १ सहस्र ५२२ इतक्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. एकूण १० सहस्र ९३९ इतक्या स्रोतांचे पाणी नमुने जैविक तपासणीस पाठवण्यासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवता चांगली रहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ नये, तसेच दूषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी पाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.