एस्.टी. आगारात वाढदिवस साजरा केला म्हणून आगारप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा नोंद
कोरोना महामारी गंभीर स्वरूप धारण करत असतांना नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करणे गंभीर आहे.
सातारा, ७ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील वडूज एस्.टी. आगारात आगारप्रमुख आणि सहकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाविषयक नियमावली धाब्यावर बसवली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आगारप्रमुखासह ११ जणांवर वडूज पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या चौकटीत अधिकऱ्यांच्या विरोधात असा गुन्हा नोंद होण्याची ही पहिलाच वेळ आहे.
वडूज परिसरामध्ये अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महसूल विभाग यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
वडुज येथील एस्.टी. आगारात सायंकाळी वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस पथक गेले आणि घटनेची पडताळणी केली. नंतर वाढदिवस साजरा करणाऱ्या आगार प्रमुखांच्यासह ११ जणांवर वडूज पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ आणि २६९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.