सातारा जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी
गर्दी वाढल्यास कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार. त्यामुळे प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
सातारा – गत काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता; मात्र सद्य:स्थितीत लसीचा साठा उपलब्ध झाला असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला आहे.
सातारा जिल्ह्यात ३० जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ७ लाख ५० सहस्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला; मात्र लसींच्या अल्प प्रमाणातील उपलब्धतेमुळे १० मे या दिवसापासून ही मोहीम थांबवण्यात आली. ‘कोव्हॅक्सिन’ ही घेतलेल्या नागरिकांच्या पहिला डोसची मुदत आता संपत आली असून लसीचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १९२ नागरिकांनी ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या ११ लाख असून त्यातील केवळ १६ सहस्र ५२२ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, तर १० लाख ८३ सहस्रांहून अधिक नागरिक लसीच्या प्रतिक्षेत आहेत.