बारावीच्या निकालानंतर ‘सीईटी’ प्रवेश परीक्षांविषयी तातडीने निर्णय घेऊ ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

सांगली – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १२ वीच्या परीक्षा रहित केल्या आहेत. हे निकाल काही दिवसांत लागतील. या निकालानंतर ‘सीईटी’ प्रवेश परीक्षांविषयी बैठक घेऊन तातडीने निर्णय घेऊ, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ईश्वरपूर येथील तहसीलदार कार्यालयात प्रथम वर्ष पदवी प्रवेशाच्या संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘१२ वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा कल असतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा महत्त्वपूर्ण असते. ही परीक्षा आयोजित करण्याच्या अनुषंगाने विभागाकडून सिद्धता चालू आहे. तंत्र शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै-ऑगस्ट पर्यंत चालते. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार या वेळी करण्यात येईल.’’