सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीची सूत्रे
‘सावंतवाडी मेडिकल असोसिएशन’च्या वतीने सावंतवाडी नगरपरिषदेला वैद्यकीय साहित्य सुपूर्द
सावंतवाडी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सावंतवाडी मेडिकल असोसिएशन’ने १०० ‘पीपीई किट’, २० लिटर ‘सॅनिटायझर’, १०० मास्क, ८ ‘फेसशिल्ड’, ४ बॅग आणि सर्जिकल ग्लोव्हज आदी साहित्य नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपुर्द केले. मुख्याधिकारी जावडेकर यांनी नगरपरिषदेत कार्यरत सफाई कर्मचारी तथा इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक साहित्य आवश्यक असल्याचे ‘सावंतवाडी मेडिकल असोसिएशन’ला कळवले होते. त्यांच्या आवाहनाला अनुसरून हे साहित्य नगरपरिषदेला देण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्णांची आत्महत्या
देवगड – पडेल, वारीकवाडी येथील ७६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने येथील विहिरीत आत्महत्या केली.
कुडाळ – नेरूरपार, कुडाळ येथील महेश यशवंत नाईक या ३४ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाने येथील कर्ली नदीमध्ये आत्महत्या केली.
माजगावात १५ जूनपर्यंत पूर्णत: दळणवळण बंदी
सावंतवाडी – तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ७ ते १५ जून या कालावधीत पूर्णत: दळणवळण बंदी करण्यात आली आहे. माजगाव ग्रामपंचायतीच्या सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजगावचे सरपंच दिनेश सावंत, पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा चालू रहाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ५७४ रुग्ण
१. उपचार चालू असलेले रुग्ण ६ सहस्र ६९४
२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण ३
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ७६९
४. बरे झालेले रुग्ण २३ सहस्र ३३६