गोव्यात येणार्या प्रवाशांची कोरोनाविषयक चाचणी करण्याविषयी सरकार गंभीर नाही ! – आप
म्हापसा, ७ जून (वार्ता.) – गोव्यात येणार्या प्रवाशांची कोरोनाविषयक चाचणी करण्याविषयी सरकार गंभीर नसल्याचे उघड झाले आहे आणि यामुळे गोवा खंडपिठाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. ‘आप’ने याविषयी प्रवाशांची मुलाखत असलेला एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे.
या ‘व्हिडिओ’मध्ये थिवी रेल्वेस्थानकावरून प्रवाशांना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आणले गेल्याचे आणि यामधील बहुतेक प्रवासी चाचणी न करताच त्यांच्या इप्सित स्थळी गेल्याचे दिसत आहे.
१०० प्रवासी आले आणि यामधील केवळ १० प्रामाणिक प्रवाशांनी रुग्णालयात जाऊन स्वत:ची चाचणी करून घेतली, तर उर्वरित ९० जण तेथून पसार झाले. चाचणी करण्यासाठी आलेल्यांना कोणतेही मार्गदर्शन नसल्याने किंवा त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याने हे घडले, असा दावा आपने केला आहे.