कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ कारागृहातील ६० बंदीवान पॅरोलवर
गेल्या वर्षी पॅरोलवर सोडलेला एक बंदीवान पसार
म्हापसा, ७ जून (वार्ता.)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या आधारे कोलवाळ कारागृहातील ६० बंदीवानांना (कैद्यांना) पॅरोलवर, तर एका बंदीवानाला फर्लोवर सोडण्यात आले आहे. या मध्यवर्ती कारागृहाची ६२४ बंदीवान ठेवण्याची क्षमता आहे. सध्या या कारागृहात ४६५ बंदीवान आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या आधारे कारागृहातील बंदीवानांना पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला होता. कोरोना महामारीच्या काळात बंदीवानांच्या सुरक्षेच्या कारणावरून न्यायालयाने हा आदेश दिला होता. पॅरोलवर सोडलेल्या बंदीवानांमध्ये ५८ पुरुष, तर २ महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या काळात अशाच प्रकारे बंदीवानांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यांपैकी २ बंदीवान परत आले नाहीत. दोघांपैकी यशवंत भगत हा बंदीवान अद्याप परत आला नाही, तर दुसरा बंदीवान महंमद आदिल याला एका गुन्ह्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यशवंत भगत या बंदीवानाच्या विरोधात कारागृहाच्या अधिकार्यांनी म्हापसा पोलिसांद्वारे परत न आल्याविषयी गुन्हा नोंदवला असून अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही. (या माहितीप्रमाणे आताही पॅरोलवर सोडण्यात येणार्या ६० बंदीवानांपैकी काहींनी पुन्हा गुन्हे केले आणि काही जण पसार झाले, तर त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)