‘आयव्हरमेक्टीन’ची मोठ्या प्रमाणात मागणी केल्याने गोवा शासनापुढे पेच !
केंद्रशासनाने कोरानावरील उपचारासाठी वापरण्यात येणार्या औषधांच्या सूचीतून ‘आयव्हरमेक्टीन’ औषध वगळले
पणजी, ७ जून (वार्ता.)- केंद्रीय आरोग्य खात्याकडून लागू करण्यात आलेल्या कोरोनावरील उपचाराविषयीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाची मंद लक्षणे असणार्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्रशासनाने अंतिम केलेल्या औषधांच्या सूचीतून ‘अॅन्टीपायरेटीक’ आणि ‘अॅन्टीट्यूसीव’ औषधांव्यतिरिक्त इतर सर्व औषधे वगळण्यात आली आहेत. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘आयव्हरमेक्टीन’ आणि ‘डॉक्सीसायक्लीन’ ही औषधे वगळण्यात आली आहेत.
गोवा राज्यात कोरोनावरील उपचारासाठी देण्यात येणार्या संचामध्ये या औषधांचा समावेश होता. गोवा शासनाने आयव्हरमेक्टीन हे औषध कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपचारांसाठीचे औषध म्हणून समाजात वितरित करण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली होती; परंतु केंद्रशासनाच्या या निर्णयामुळे हे औषध आता देता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टीन हे औषध प्रतिबंधात्मक औषध म्हणून देण्याविषयी शंका उपस्थित केली असतांनाही राज्यशासनाने हे औषध वितरित करण्याविषयी निर्णय घेतला होता.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘याविषयी केंद्रशासनाकडून आलेले परिपत्रक मला देण्याविषयी मी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना सांगितले आहे. मी परिपत्रक पाहून त्यानुसार पुढची कृती करीन.’’ गोवा शासनाने आयव्हरमेक्टीन औषध खरेदी केले आहे का ? या प्रश्नावर त्यांनी ‘मला पहावे लागेल’, असे उत्तर दिले. केंद्रशासनाने २७ मे २०२१ या दिवशी काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या सुधारित परिपत्रकामध्ये कोरोनाची मंद लक्षणे असलेल्या रुग्णांना देण्यात येणार्या औषधांच्या सूचीतून ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टीन’, ‘डॉक्सीसायक्लीन’, ‘झिंक’, ‘मल्टीव्हिटामिन’ ही औषधे वगळली आहेत, तर केवळ ‘अॅन्टीपायरेटीक’ आणि ‘अॅन्टीट्यूसीव’ औषधे देण्यात यावीत, असे म्हटले आहे.