बी-बियाणे देण्यासाठी असलेल्या ‘ऑनलाईन’ नोंदणीची जाचक अट रहित करा ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
कागल (जिल्हा कोल्हापूर), ६ जून (वार्ता.) – शेतकर्यांना कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानावर बी-बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते त्यात बर्याच अडचणी येतात. त्यामुळे ‘ऑनलाईन’ नोंदणीची जाचक अट रहित करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी कागल कृषी विभागाच्या अधिकार्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या ग्रामीण भागात वीज मोठ्या प्रमाणात कधीही जाते. यामुळे ‘सर्व्हर’ वारंवार ‘डाऊन’ होत आहेत, तसेच दळणवळण बंदीमुळे ‘महा-ई-सेवा केंद्र’, संगणक सुविधा केंद्र बंद आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी ‘ऑनलाईन’ मागणी कशी करायची ? हा मोठा प्रश्न आहे. तरी ही ‘ऑनलाईन’ची अट रहित करून कृषी साहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे थेट आवेदन स्वीकारले जावे. याचप्रकारे खतांची टंचाई दाखवून जे विक्रेते वाढीव भावाने खतविक्री करतात, अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी.