भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी ईश्वरी कृपा असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

  • ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान !

  • १ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !

सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून ‘यापुढील काळ आणखी भयावह आहे’, असे अनेक संत, द्रष्टे, भविष्यवेत्ते आणि नॉस्ट्रॅडॅमस यांनी सांगितले आहे. अशा काळात आपले रक्षण होणे, हे केवळ ईश्वरी कृपेवर अवलंबून असते. ईश्वर भक्त आणि साधना करणारे यांच्यावर कृपा करतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही. ईश्वराची कृपा मिळवायची असेल, तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. खान्देश आणि मराठवाडा येथील १ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. व्याख्यानाचा उद्देश आणि समितीच्या कार्याचा आढावा समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक श्री. वैभव आफळे यांनी मांडला. सूत्रसंचालन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले.

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की,

१. येत्या काळात महापूर, वादळे, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, चक्रीवादळे अशी नैसर्गिक संकटे येणार आहेत. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असणारी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

२. तिसरे जागतिक महायुद्ध होण्याचा कालावधी २-३ वर्षे असा आहे. यात प्रचंड मनुष्यहानी होणार आहे. प्रत्येक देशाकडे परमाणू बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे आहेत. त्याची संहारकता प्रचंड आहे.

क्षणचित्रे

१. या वेळी अनेकांनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रम चालू असतांना काही जणांनी ‘व्हॉट्सॲप’ संदेश पाठवून कार्यात सहभागी होण्याविषयी, तसेच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याविषयी विचारणा केली.

२. या कार्यक्रमाला बँकॉक, थायलंड, टोरंटो येथून प्रत्येकी एक धर्मप्रेमी ऑनलाईन जोडले होते.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले. जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यूंचे राष्ट्र आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.