मुंबईसह कोकणात ९ ते १२ जून या काळात अतीवृष्टीची चेतावणी !
मुंबई – मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ ते १२ जून या काळात अतीवृष्टी होणार असल्याची चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची आढावा बैठक घेतली. ‘अतीवृष्टीच्या काळात आवश्यक तिथे एन्.डी.आर्.एफ्. आणि एस्.डी.आर्.एफ्.च्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएन्जीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्या अतीवृष्टीची माहिती देऊन सतर्क रहाण्यास सांगण्यात यावे’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मुंबईत जेथे पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले आहेत. या पंपांद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतीवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून पाणी निचर्याचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंदमाता (दादर) येथील परिसरात दोन मोठ्या टाक्या करण्यात आल्या असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.