गोकुळच्या दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय खर्च न्यून करण्याची सूचना !
कोल्हापूर, ७ जून – गोकुळच्या टँकर वाहतुकीचे दर अन्य दूध संघांच्या तुलनेत अधिक आहेत. त्याची पुनर्रचना करावी लागेल. दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय खर्च न्यून करावा लागेल, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात, म्हणजेच गोकुळच्या मुख्यालयात सतेज पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या.
सतेज पाटील म्हणाले, ‘‘सध्या असणारे १३ लाख लिटर दूध संकलन प्रतिदिन २० लाख लिटरवर जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आगामी काळात आव्हाने स्वीकारतांना गोकुळच्या सर्व प्रशासकीय विभागांनी मनात कोणतेही दडपण न ठेवता त्यांच्या सूचना मांडाव्यात आणि सकारात्मकतेने कार्य करावे.’’