महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात १० जूनला राज्यभर चाबूकफोड आंदोलन ! – सदाभाऊ खोत, आमदार
सांगली, ७ जून (वार्ता.) – राज्यात दुधाचे दर उतरले असून सरकारने दूध उत्पादकांना वार्यावर सोडले आहे. राज्यातील काही भागांत दुधाचे दर १८ ते २० रुपयांपर्यंत उतरले आहेत. राज्यसरकारनेे ३ ते ५ फॅटच्या दुधासाठी २५ रुपये दर ठरवला आहे; मात्र निर्णयाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे दूध दरासाठी १० जून या दिवशी रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर चाबूकफोड आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी ७ जून या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक वर्षी दुधाला दर मिळण्यासाठी आंदोलन का करावे लागते ? तमिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत दूध फेडरेशन आहे. महाराष्ट्रात नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले; मात्र महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते न्यायालयात टिकू शकले नाही. १६ जूनपासून होणार्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही.’’
पंढरपूर वारीची परंपरा खंडित करू नये ! – सदाभाऊ खोत
पंढरपूर आषाढी वारीची अनेक वर्षांची परंपरा गतवर्षी खंडित झाली; परंतु यंदा ती खंडित करू नये. ५० जणांना पालखी काढण्यासाठी अनुमती देण्यात यावी. पालखीसमवेत वैद्यकीय पथक सज्ज ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याचे नियोजन करावे. गोकुळ, पंढरपूर येथे निवडणूक होती, तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? काँग्रेसचे आंदोलन चालू असतांना कोरोना पसरत नाही का ? शासन सांस्कृतिक परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही वारकर्यांसमवेत असून त्यांना संरक्षण देऊ, असे सदाभाऊ खोत या वेळी म्हणाले.