कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आशासेविकांचे काम अधिक ! – मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचे ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे आशासेविकांना आवाहन !
मुंबई – आतापर्यंत तुम्ही पुष्कळ काम केले आहे, तसेच घरोघरी जाऊन पहाणी-तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला ‘कुटुंब’ म्हणून तळहाताच्या फोडासारखे जपले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठीही तुमचे काम अधिक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशासेविकांना केले. उद्धव ठाकरे यांनी आशासेविकांशी ७ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना वरील आवाहन केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही; मात्र ते नियंत्रणात आणू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात तुम्ही जे काम करत आहात, त्याची देशात आणि परदेशात प्रशंसा होत आहे. सरकारने प्रथम शेतकर्यांकडे लक्ष दिले. तुमच्या आशा आणि अपेक्षा यांकडे लक्ष देण्यापूर्वी कोरोनाचे संकट आले. सरकार तुम्हाला विसरले, असे समजू नका. आपले ऋण आम्ही विसरणार नाही. त्याची परतफेड करणे शक्य नसले, तरी तुमच्या वेदनांची नोंद घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून सरकारला थोडी सवलत (वेळ) द्या.’’