अभिनेत्याच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत !
अभिनेते पर्ल व्ही. पुरी यांच्यावरील बलात्काराचा आरोप फेटाळणार्या निर्माती एकता कपूर यांना पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील यांचे उत्तर !
मुंबई – निर्माती एकता कपूर यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. आमच्याकडे अभिनेते पर्ल व्ही. पुरी यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. ते आम्ही न्यायालयात सादर करू. सध्या या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे, असे उत्तर पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी निर्माती एकता कपूर यांना दिले आहे. अभिनेता पर्ल व्ही. पुरी हे एकता कपूर यांच्या ‘नागीण’ या मालिकेत काम करत आहेत. पोलिसांनी बलात्कारप्रकरणी त्यांना अटक केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या पर्ल व्ही पुरी हे न्यायालयीन कोठडीत आहे. एकता कपूर यांनी मात्र पुरी यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. आरोप करणार्या मुलीच्या वडिलांनी बनावट तक्रार केल्याचे एकता कपूर यांनी म्हटले आहे. कपूर यांच्या वक्तव्याला पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘याविषयीची तक्रार सर्वप्रथम वर्साेवा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तेथून आता वालीव पोलीस ठाणे येथे हस्तांतरित करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीचेही निवेदन घेण्यात आले आहे.’’