इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रात विविध पद्धतींनी आंदोलन करून काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध !

मुंबई – पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीच्या विरोधात ७ जून या दिवशी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाच्या अंतर्गत काँग्रेसच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध पद्धतीने आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

१. मुंबईमध्ये घाटकोपर येथे काँग्रेसचे माजी आमदार वीरेन बक्षी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानकाच्या येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकलवर बसून आंदोलन केले.

२. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन इंधन दरवाढीचा निषेध केला.

३. पुणे येथील कुलकर्णी पेट्रोल पंपावर घोडागाडी आणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसने आंदोलन केले.

४. नागपूर येथे वर्धमाननगर चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

५. सोलापूर येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी हेल्मेट घालून घोड्यावरून रपेट मारत केंद्र सरकारचा निषेध केला.

६. कोल्हापूर येथे मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

७. मनमाड येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपाला हार घालून काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध केला.

८. चंद्रपूर येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. परभणी येथे भिकुलाल पेट्रोल पंपाच्या येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या.