परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात देवद (पनवेल) येथील श्री. प्रमोद बेंद्रे यांनी अनुभवलेले भावक्षण !
६ जून २०२१ या दिवशी आपण श्री. प्रमोद बेंद्रे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट कशी झाली’, या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहूया.
मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/484562.html
३. मनोलय होण्यासाठी घडलेले प्रसंग
३ अ. एका विवाह सोहळ्याला जाण्यासाठी नवीन कपडे घालणे, ते कपडे घालूनच सेवाकेंद्रातील माळा स्वच्छ करण्याची सेवा करणे आणि मळलेले कपडे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा सदरा देऊन विवाहसोहळ्याला जायला सांगणे : एकदा मला एका नातेवाइकांकडे विवाह सोहळ्यासाठी जायचे होते; म्हणून मी नवीन कपडे घातले. त्या वेळी मी ठरवले, ‘प्रथम सेवाकेंद्रात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना नवीन कपडे दाखवूया आणि नंतर लग्नाला जाऊया.’ मी प्रथम सेवाकेंद्रात गेलो. तेथे गेल्यावर मी सतत परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर जात होतो; पण ते माझ्याकडे बघत नव्हते आणि माझ्याशी बोलत नव्हते. आम्ही दुपारी महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी बसलो. नंतर एक साधक मला म्हणाला, ‘‘तुला माळा स्वच्छ करायला सांगितले आहे.’’ मी १ घंटा ३० मिनिटे माळा स्वच्छ करत होतो. माळा स्वच्छ करून मी खाली उतरणार, तेवढ्यात परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘नवीन कपडे.’’ मी मनात म्हणालो, ‘आता कसले नवीन कपडे ? सगळे मळले आहेत.’ त्यानंतर मी त्यांना सांगितले, ‘‘मला लग्नाला जायचे होते; पण आता माझे कपडे खराब झाले आहेत; म्हणून मी लग्नाला जात नाही.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘माझे कपडे घालून जा.’’ त्यांनी मला त्यांचा सदरा घालायला दिला. ते माझ्यापेक्षा पुष्कळ उंच असल्याने मला त्यांचा सदरा पुष्कळ मोठा झाला, तरी मी तसाच आनंदाने लग्नाला गेलो. माझ्या गुरूंचे कपडे मला घालायला मिळाल्याने माझ्या डोळ्यांत भावाश्रू आलेे. सर्व नातेवाईक मात्र माझी मस्करी करत होते.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी विजार शिवून घेणे; मात्र त्यांना ती विजार व्यवस्थित न बसणे : त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांकडे केवळ दोन विजारी (पॅन्ट) होत्या. त्यातील एका विजारीची शिलाई सारखी उसवत असे. परात्पर गुरु डॉक्टर प्रतिदिन ती विजार शिवून घालायचे. तेव्हा मी आणि श्री. विजय कदम यांनी ठरवले, ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांना नवीन विजार शिवून देऊया.’ परात्पर गुरु डॉक्टर अंघोळीला गेल्यावर आम्ही त्यांनी काढून ठेवलेली विजार घेतली आणि तिचे माप घेऊन दुसरी विजार शिवण्यासाठी दिली. आम्ही नवीन विजार परात्पर गुरु डॉक्टरांना दिल्यावर त्यांनी विचारले, ‘‘तुम्हाला कुणी नवीन विजार शिवून घ्यायला सांगितली ?’’ त्यांनी ती विजार घातली; परंतु त्यांना ती व्यवस्थित बसली नाही.
३ इ. रात्री गोवा येथून आलेले अंगफलक घालून बघायला सांगणे आणि ‘ते छान बनविले आहेत’, असा निरोप गोवा येथे देण्यास सांगणे : एकदा मी सेवाकेंद्रात झोपलो होतो. त्या रात्री २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास मला निरोप आला, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी बोलावले आहे.’’ मी उठून त्यांच्याकडे गेलो. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘गोव्याहून अंगफलक आले आहेत. तू घालून बघ.’’ मी ते अंगफलक घालत असतांना परात्पर गुरु डॉक्टर मला अंगफलक बांधत होते. त्यांनी मला ‘सर्व बाजूंनी अंगफलक नीट बसला आहे ना ?’, ते पाहिले आणि मला म्हणाले, ‘‘अंगफलक छान बनविले आहेत. आवडले’, असे गोव्याला कळवा.’’
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती
४ अ. धर्मरथावर सेवा करणार्या साधकांसमवेत खेळणे : वर्ष १९९७ मध्ये रायगड जिल्ह्यातील रामनाथ येथे परात्पर गुरु डॉक्टरांची सार्वजनिक (जाहीर) सभा होती. त्या वेळी धर्मरथावर सेवा करणारे आम्ही साधक सायंकाळी समुद्रात पोहायला गेलो होतो. तिथे परात्पर गुरु डॉक्टर आले आणि त्यांनी मला विचारले, ‘‘चेंडू आणला नाही का ?’’ मी म्हणालो, ‘‘नाही.’’ मग आम्ही सर्वांनी ‘बनियन’ काढून चेंडू बनवला. त्या चेंडूने आम्ही ३० मिनिटे समुद्रात खेळत होतो. परात्पर गुरु डॉक्टरही आमच्या समवेत खेळत होते.
४ आ. सोलापूर येथील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सार्वजनिक सभा
४ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले दुचाकीवर बसल्यावर दुचाकी चालवतांना साधकाचे पाय थरथरणे, त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी खांद्यावर हात ठेवून आधार देणे : एकदा सोलापूर येथे परात्पर गुरु डॉक्टरांची सार्वजनिक सभा होती. त्यानिमित्त परात्पर गुरु डॉक्टर सोलापूर येथे येणार होते. ते सोलापूरला आल्यानंतर मी त्यांना दुचाकीवरून निवासस्थानी न्यायचे अचानक ठरले. परात्पर गुरु डॉक्टर दुचाकीवर माझ्या मागे बसल्यावर माझे पाय थरथरत होते. त्या वेळी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले, ‘‘घाबरतोस कशाला ? मी तुझ्या पाठीशी आहे ना ?’’
४ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वाट पहात साधक बाहेर उभे असणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले दुचाकीवरून आल्यानेे साधकांनी त्यांना न ओळखणे : आम्ही सोलापूर येथील निवासस्थानी पोचलो. तेव्हा सर्व साधक आरतीचे ताट घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांची वाट पहात बाहेर उभे होते. आम्ही दुचाकीवरून उतरून खोलीत जाऊन बसलो. नंतर परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘जा, ‘मी आलो आहे’, असे साधकांना सांग.’’ मी लगेच बाहेर गेलो आणि सर्वांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आत येऊन बसले आहेत.’’ तेव्हा साधकांनी मला विचारले, ‘‘पिवळी चारचाकी गाडी कुठे आली ? मग परात्पर गुरु डॉक्टर कसे आले ?’’ साधकांनी खोलीत पाहिल्यावर त्यांना दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर आत बसले आहेत.’ नंतर सर्व साधक आले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘देव आला घरा, नाही ओळखीला.’’
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा
५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधकाने धर्मांतर न करणे : मला एक ख्रिश्चन मुलगी आवडली होती. तिची आई मला म्हणाली, ‘‘तुला हिच्याशी लग्न करायचे असेल, तर तुला ख्रिश्चन व्हावे लागेल.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘मी ख्रिश्चन व्हायला सिद्ध आहे.’’ त्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात आल्याने मला हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी अभिमान वाटू लागला. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मी ख्रिस्ती होण्यापासून वाचलो.
५ आ. साधक सोलापूर येथे सेवा करतांना एका व्यक्तीने त्याच्यावर करणी करणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ही सूक्ष्म गोष्ट लक्षात येणे, त्यांनी साधकाला श्री गणेशाचा नामजप करायला सांगणे, साधकाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे न केल्याने त्याला त्रास होऊन रुग्णालयात भरती करावे लागणे : मी सोलापूर येथे प्रसाराची सेवा करत होतो. एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘एका व्यक्तीने तुझ्यावर करणी केली आहे. असे असले, तरी ईश्वर तुला शक्ती देणार आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात विकल्प आला, ‘त्या व्यक्तीने माझ्यावर कशाला करणी केली असेल ? मी तर चांगला जिवंत आहे. मला कुठलाही त्रास होत नाही. परात्पर गुरु डॉक्टर खरे बोलत आहेत ना ?’
त्यानंतर मी घरी गेलो. मी दुसर्या दिवशी सेवाकेंद्रात गेल्यानंतर सर्व साधक माझ्याकडे बघू लागले. मी त्यांना विचारले, ‘‘काय झाले ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुला परात्पर गुरु डॉक्टरांनी बोलावले आहे.’’ मी त्यांच्याकडे गेलो. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘तू श्री गणेशाचा ६ माळा नामजप कर. तुझी प्राणशक्ती न्यून झाली आहे.’’ मी म्हणालो, ‘‘हो.’’ थोड्या वेळाने मी पुन्हा परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही मला ६ माळा नामजप करायला सांगितला आहे. मी १० माळा नामजप करू का ? म्हणजे मी लवकर बरा होईन.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा पुष्कळ लाल झाला होता. ते मला म्हणाले, ‘‘तुला काय वाटते ? तू नामजप करून बरा होणार का ? ईश्वराचा तुझ्यासाठी संकल्प होता; म्हणून तू बरा होणार होतास. आता भोगा.’’ मी तसाच खोलीच्या बाहेर आलो. एका साधकाने मला विचारले, ‘‘काय झाले ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘आता भोगा.’’ त्या वेळी मला ‘संतांच्या समवेत कसे रहावे ?’, हे ठाऊक नव्हते. त्यामुळे मला काहीच वाटले नाही.
मी घरी जाऊन रात्री झोपलो. मी सकाळी उठल्यावर दात घासत असतांना गुळण्या केल्यावर माझ्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले आणि मी खाली कोसळलो. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले. मी आठ दिवस रुग्णालयात होतो. परात्पर गुरु डॉक्टर प्रतिदिन रुग्णालयात माझ्यासाठी एक फळ पाठवत होते. मी ९ दिवसांनंतर सेवाकेंद्रात गेलो. त्या वेळी सर्व साधक महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी बसले होते. मीही महाप्रसाद घेण्यासाठी बसलो. इतक्यात परात्पर गुरु डॉ. आठवले तेथेे आले आणि म्हणाले, ‘‘आज प्रमोद आला आहे का ?’’ मी तोंड लहान करून सांगितले, ‘‘आलो आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आजारी काय पडतोस ? आपल्याला पुष्कळ कार्य करायचे आहे. चल उठ. उद्या सकाळी देहलीला जाण्यासाठी निघ.’’ त्यानुसार मी लगेच देहलीला जायची सिद्धता केली.
५ इ. प्रकृती ठीक नसतांनाही देहली येथे प्रसारसेवा करतांना तेथील उन्हाचा त्रास न होणे : देहली येथे प्रसाराची सेवा करतांना मी आणि अमरजित सिंह दुपारी संस्थेची माहिती भिंतीवर रंगवण्याची सेवा करण्यासाठी बाहेर जात होतो. तिकडे पुष्कळ उन्हाळा होता; परंतु माझी प्रकृती ठीक नसतांनाही त्या उन्हाचा मला त्रास झाला नाही. त्याच कालावधीत ‘सनातन प्रभात’चा पहिला अंक प्रकाशित झाला आणि तो मला वाचायला मिळाला. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला होता.
५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने एका कठीण प्रसंगातून वाचणे : मी अनुमाने वर्ष २०००-२००१ मध्ये गुजरात येथे प्रसार करण्यासाठी गेलो होतो. तेथे गेल्यानंतर काही मासांनी सेवेचा आढावा देण्यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांना भ्रमणभाष केला. त्यांनी मला लगेच मुंबईला यायला सांगितले. मी गुजरात येथे ज्या व्यक्तीकडे रहात होतो, त्या व्यक्तीला मी सांगितले, ‘‘मला मुंबईला लगेच बोलावले आहे.’’ त्या वेळी ती व्यक्ती रागाने मला म्हणाली, ‘‘तू मुंबईला जायचे नाही.’’ काही वेळाने ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘ठीक आहे. आधी जेवण कर. नंतर मी तुला गाडीत बसवून देतो.’’ मी त्या व्यक्तीला सांगितले, ‘‘मला भूक नाही.’’ तेव्हा त्या व्यक्तीने पुष्कळ आग्रह केला; म्हणून मी त्या व्यक्तीसह अल्पाहार करायला उपाहारगृहात गेलो.
मी मुंबईला पोचल्यानंतर सेवाकेंद्रात गेलो. परात्पर गुरु डॉक्टर दारातच उभे होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘काय, सोलापूरसारखे भांडण करून आला आहेस का ?’’ मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले, ‘‘सर्व लिहून दे.’’ मी सर्व प्रसंग लिहून दिला. मी लिहिलेल्या प्रसंगाच्या खाली त्यांनी ‘श्री. बेंद्रे यांचा नामजप चालू होता; म्हणून त्या माणसाने जो मंत्र (अन्नावर लिहून) खायला घातला होता, तो त्यांच्या पोटात गेला नाही. हा मंत्र त्यांच्या पोटात गेला असता, तर त्यांना पुढे अनेक जन्म तीव्र त्रास झाला असता आणि तीव्र साधना करावी लागली असती’, असे लिहिले.’ (समाप्त)
– श्री. प्रमोद बेंद्रे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (९.३.२०१७)
|