कौटुंबिक जीवनात पतीला समर्थपणे साथ देणार्‍या आणि साधना करण्याच्या दृढ निश्‍चयाने मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणार्‍या बीड येथील सौ. प्रज्ञा विवेक झरकर !

वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी (७.६.२०२१) या दिवशी सोलापूर येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. प्रज्ञा विवेक झरकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. स्नेहा आणि मुलगा श्री. वेदांत अन् रामनाथी आश्रमात सेवा करणारी मुलगी कु. निकिता झरकर यांनी वर्णन केलेली सौ. झरकर यांच्या त्यागाविषयीची आणि कुटुंबियांसह स्वतःच्या साधनेसाठी करत असलेल्या कठोर प्रयत्नांविषयी सूत्रे येथे दिली आहेत. आजच्या लेखात आपण त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी मुलांवर केलेले साधनेचे संस्कार यांविषयीची सूत्रेे पाहूया. 

श्री. विवेक आणि सौ. प्रज्ञा झरकर
कु. स्नेहा झरकर
कु. निकिता झरकर
श्री. वेदांत झरकर

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/484627.html            

(भाग २)

४. सनातन संस्थेशी संपर्क

वर्ष २००४ मध्ये माझ्या काकांचे लग्न झाले. काकू (सौ. अंजली झरकर) आधीपासूनच सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असल्याने त्यांनी घरातील सर्वांना साधना करण्यास सांगितले. आई तिने सांगितल्यानुसार साधना करू लागली. त्यापूर्वी आईने भागवत कथा, ॐ शांती, स्वामी समर्थ इत्यादी बर्‍याच संप्रदायानुसार साधना करण्याचा प्रयत्न केला होता.

४ अ. सेवेला आरंभ : आईला एक सेवा मिळाली होती. त्यासाठी आईला सोलापूर सेवाकेंद्रात जावे लागायचे. आरंभी आई १५ दिवस घरी आणि १५ दिवस सोलापूर सेवाकेंद्रात रहायची. त्यानंतर आईने अन्य ठिकाणी जाऊन सेवा करणे चालू केले. त्या वेळी आम्ही तिघेही शाळेत जायचो.

४ आ. मुलांना स्वावलंबी होण्यास शिकवणे : आमच्यासाठी आमची आईच पहिली गुरु आहे. ती आम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी सतत प्रयत्न करायची. काकांचा साधनेला विरोध असल्याने आई सोलापूरला गेल्यावर काकू आम्हाला काहीही साहाय्य करू शकत नव्हती. स्नेहा सातव्या इयत्तेत शिकत असतांना आणि निकिता पाचव्या इयत्तेत शिकत असतांना आईने त्यांना स्वयंपाक बनवायला शिकवले. तेव्हा वेदांत पहिल्या इयत्तेत शिकत होता.

५. सेवेसाठी परगावी जातांना लहान मुलगा आणि यजमान यांना समजून घेणे

आई सोलापूरला जाण्यासाठी निघतांना वेदांत रडायचा. ते पाहून बाबांना वाईट वाटायचे. त्यामुळे ते आईवर चिडायचे; मात्र आई त्यांना समजून घ्यायची. एकाच वेळी वेदांत आणि बाबा यांना समजावणे अन् सेवा करणे, हे ती लीलया करायची. तिच्या गुरूंप्रतीच्या अढळ श्रद्धेच्या बळावरच ती हे करू शकत होती.

६. मुलांना आध्यात्मिक स्तरावर हाताळणे

६ अ. मुलांना प्रत्येक वेळी श्रीकृष्णाचे साहाय्य घेण्यास सांगणे : आमचा (स्नेहा आणि निकिता यांचा) घरातील कामे, शाळेतील अभ्यास, वेदांतला सांभाळणे, बाबांना सर्व गोष्टींसाठी साहाय्य करणे, यांसाठी संघर्ष व्हायचा. आम्हाला ‘आईने घरी थांबावे’, असे वाटायचे. आई आम्हाला ‘या गोष्टी कृष्णाचे साहाय्य घेऊन कसे करायच्या ?’, याविषयी सांगायची. ती आम्हाला ‘कोणताही पदार्थ बनवतांना मीठ आदी गोष्टी किती प्रमाणात घालायच्या ?’, हे सूक्ष्मातून कृष्णाला विचारायला सांगायची.

आम्ही (स्नेहा आणि निकिता) साधनेसाठी रामनाथी आश्रमात गेल्यावर आईनेे वेदांतलाही हळूहळू स्वयंपाक शिकवायला चालू केले. तिने वेदांतला घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्ट बारकाईने शिकवली.

आई घरी नसल्यामुळे वेदांतलाही घरातील सर्व करावे लागत असे. त्यात त्याचा अर्धा दिवस जायचा, तसेच शाळेतील अभ्यासामुळे त्याला खेळायला वेळ मिळायचा नाही. ‘हे सर्व आईमुळे करायला लागते’, असे वाटून तो आईला मनातून पुष्कळ दोष द्यायचा; पण आईने प्रत्येक वेळी वेदांतच्या मनावर ‘तुझ्या जीवनात तुला साहाय्य करणारा केवळ कृष्णच आहे’, हे बिंबवले.

६ आ. मुलांविषयी भावनिक स्तरावर न रहाणे : आई घरी आल्यावर आम्ही ती घरी नसतांना घडलेले सर्व प्रसंग तिला सांगायचो; पण आई अशा गोष्टींसाठी कधीच भावनिक झाली नाही.

आम्हाला (स्नेहा आणि निकिता यांना) पूर्णवेळ साधक होऊन आता ८ वर्षे पूर्ण झाली; पण आई-बाबांनी आम्हाला कधीच भावनिक स्तरावरील दृष्टीकोन दिला नाही.

६ इ. आम्ही शाळेतून येऊन घरातील कामे करून थकलो, तरीही ‘अभ्यास आणि साधना प्रत्येक दिवशी करणे’, हे तुमचे कर्तव्यच आहे’, असे ती आम्हाला सांगायची.

६ ई. मुले रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी जातांना त्यांना दिलेला कानमंत्र : आम्ही दोघी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघतांना आम्हाला आई किंवा बाबा या दोघांविषयीही काहीच भावना मनात नव्हती. त्या वेळी आईला पुष्कळ रडू येत होते; पण ‘तुमची आठवण येते’, असे आईने आमच्याकडे कधीच व्यक्त केले नाही. त्या वेळी तिने आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही त्यांच्याच (प.पू. गुरुदेवांच्या) मुली आहात. त्यांनी काही कालावधीसाठी तुमचे दायित्व मला दिले होते. आता मी तुम्हाला त्यांच्यावर सोपवत आहे. आश्रमात जे सांगतील, ते सर्व ऐकायचे. कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नाही. गुरूंची कृपा संपादन करायची आहे. काहीही झाले, तरी माघार घ्यायची नाही.’’

वेदांत रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघतांना आईने त्याला सांगितले, ‘‘तू गुरुचरणांकडे जात आहेस. आता मागे वळून पहायचे नाही. अखंड सेवारत रहायचे. गुरु म्हणजे साधक सांगतील, ते ऐकायचे. तुझ्या दोन्ही बहिणी आणि वैभवी (चुलत बहीण) तिकडेच आहेत. तुला त्यांच्यात अडकायचे नाही. त्यांच्याकडे एक साधक म्हणून पहायचे. आमची कितीही आठवण आली, तरी प्रत्येक वेळी देवाला सांगायचे; कारण तो शाश्‍वत आहे.’’

६ उ. आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन विश्‍वासाने आणि प्रेरणा देऊन सांगणे : आमच्या मनाची स्थिती बिघडल्यास आम्ही प्रथम आईला भ्रमणभाष करून तिला मनातील सर्व सांगतो. तेव्हा प्रत्येक वेळी आई आम्हाला आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देते. ती आम्हाला कधीच मानसिक स्तरावर हाताळत नाही. ‘प.पू. गुरुदेवांच्या चरणप्राप्तीसाठी तुम्ही तिकडे गेला आहात. कितीही संघर्ष झाला, तरी तुम्हाला ते साध्य होईपर्यंत करत रहायचे आहे’, असे ती विश्‍वासाने आणि प्रेरणा देऊन सांगते.

६ ऊ. सेवेसाठी घराबाहेर जाऊ देण्यासाठी मनाचा त्याग करायला मुलाला शिकवणे आणि आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व त्याच्या मनावर बिंबवणे : आम्ही (स्नेहा आणि निकिता) पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात आलो, तेव्हा वेदांत तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. आईने वेदांतला सांगितले, ‘‘तू मला सेवेला जाऊ देणे, हा तुझाही गुरुसेवेतील एक मोठा त्यागच आहे. स्नेहा आणि निकिता यांनी हे आधी स्वीकारले; म्हणून त्यांना देवाने आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यासाठी बोलावले. तुला देवाजवळ जायचे असेल, तर तुलाही हे स्वीकारावे लागेल. आईने प्रतिदिन वेदांतला अनेक गोष्टी सांगून ‘तूही आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू शकतोस’, हे त्याच्या मनावर बिंबवले.

६ ए. मुलाच्या मनावर अध्यात्माचे महत्त्व युक्तीने बिंबवणे : वेदांत लहान असल्याने त्याच्या मनावर ‘अध्यात्म हेच खरे शिक्षण आहे आणि त्यातील आनंद शाश्‍वत आहे’, हे बिंबवण्यासाठी आई त्या वेळी कु. यश वेसणेकर याच्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून येत असलेले लिखाण वेदांतला वाचून दाखवायची, तसेच अन्य बालसाधकांची छापून येणारी गुणवैशिष्ट्येही त्याला वाचून दाखवायची. त्यामुळे वेदांतच्या मनात आश्रमात राहून साधना करण्याविषयीचे विचार येऊ लागले. त्याने आईला याविषयी सांगितल्यावर तिचे डोळे पाणावले.

७. स्वतःला अपघात झाला असतांना आणि यजमानांचे शस्त्रकर्म झाले असतांना ‘मुलांच्या साधनेवर परिणाम होऊ नये’, यासाठी त्यांना त्याविषयी काही न सांगणे

काही वर्षांपूर्वी काही मासांच्या अंतराने आईचे २ वेळा अपघात झाले. त्यासाठी तिला रुग्णालयातही भरती व्हावे लागले. आई पूर्ण बरी झाल्यावर तिने आम्हाला त्याविषयी सांगितले. तेव्हा आम्ही आईला म्हणालो, ‘‘तू असे का केलेस ? बाबांना तरी सांगायचेस ना !’’ तेव्हा आईने सांगितले, ‘‘तुम्हाला सांगितल्यास तुम्हाला काळजी वाटून तुमच्या साधनेवर परिणाम झाला असता.’’

वर्ष २०२० च्या दळणवळण बंदीच्या काळात बाबांचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी आईला त्यांचे सर्व जागेवर करावे लागत होते, तरीही तिने आम्हाला ‘येऊ नका’, असेच सांगितले.

८. भाव

बाबांना वेतन मिळाल्यानंतर आई ते पैसे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर ठेवून ‘तुम्हीच या पैशांचा योग्य तो विनियोग करून घ्या’, अशी प्रार्थना करायची. त्यानंतर त्यातील काही रक्कम अर्पण करण्यासाठी काढण्यास सांगून अन्य पैशांचे नियोजन करायची.

९. कृतज्ञता

अ. आईने आम्हा तिघांना ‘स्वतःची मुले’ या नात्याने नाही, तर ‘गुरूंचे साधक’ या नात्याने शिकवले आणि घडवले. तिने केलेल्या कष्टामुळे आम्हाला रामनाथी आश्रमात आल्यावर त्रास झाला नाही.

आ. ‘हे भगवंता, ‘तू आम्हा तिघा भावंडांना अशी गुरुस्वरूप, स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून मुलांना स्वावलंबी आणि गुरुचरणी अर्पण होण्यास पात्र बनवणारी, तसेच जीवनातील प्रत्येक प्रसंगात आमची प्रेरणा बनून उभी रहाणारी आई दिलीस’, त्याविषयी  कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आमची आई आमच्यासाठी कधी मैत्रीण बनते, कधी मातेच्या वात्सल्याने प्रेम करते, तर कधी जीवनातील कठीण प्रसंगात गुरु बनून आम्हाला मार्गदर्शन करते. ती आम्हा तिघांसाठी नेहमीच एक प्रेरणा आणि एक आदर्श आहे. ‘गुरूंच्या कृपेने आम्हाला अशी बहुगुणी आई मिळाली आणि तिचे ते गुण हेरता येण्यासाठी आम्हाला दिव्य दृष्टी दिली’,  याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि कोटीशः नमन !’

(समाप्त)

– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि कु. स्नेहा अन् श्री. वेदांत झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२१)

आयुष्याच्या या वाटेवर पहिली
वाट दावियली आम्हा आई तू ।

आयुष्याच्या या वाटेवर पहिली
वाट दावियली आम्हा आई तू ।
गुरु म्हणून लाभलीस आई तू ॥ १ ॥

कधीच भरकटू दिले नाहीस,
आम्हा कोणालाच साधनेत तू ।  नेहमीच दिशा दिलीस
आणि प्रेरित केलेस आम्हाला तू ॥ २ ॥

लहानपणापासून आहोत आम्ही जरी खोडकर ।
परि सावरलेस आम्हा साम, दाम,
दंड अन् भेद या सर्वांचा करूनी वापर ॥ ३ ॥

शिकवण दिलीस तू वेळोवेळी ।
मात्र आचरणात आणण्यास
पडतो नेहमीच आम्ही कमी ॥ ४ ॥

आम्हा सर्वांच्या साधनेसमवेतच,
सर्व व्यवहार किती सहजपणे सांभाळतेस तू नेहमीच ।
लहानपणापासून सोसूनी सर्व कष्ट ॥ ५ ॥

गुरुमाऊली येता जीवनी, आई तुला झाले सर्व सुसह्य ।
समष्टी सेवेची दिली संधी देवाने ॥ ६ ॥

व्यष्टी साधना परिपूर्ण करूनी व्हावेस आई,
तू जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त ।
हीच करितो प्रार्थना आम्ही श्री गुरुचरणी व्यक्त ॥ ७ ॥

– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि कु. स्नेहा अन् श्री. वेदांत झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक