वारंवार येणार्या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत ! – सुराज्य अभियान
हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
मुंबई – महाराष्ट्र सरकारने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ४ जिल्ह्यांतील एकूण ११ ठिकाणी वर्ष २०१९-२० मध्ये ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४२ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूदही केली होती; मात्र ठरलेल्या १८ मासांच्या मुदतीत ही निवारा केंद्रे उभारली गेली नाहीत. परिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीत घरे, फळबागा, शेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती, तर ‘फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एकापाठोपाठ येणार्या चक्रीवादळांच्या काळात कोकणवासियांना या निवारा केंद्रांचा मोठा आधार मिळाला असता. तरी सरकारने वारंवार येणार्या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव, तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ४ जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे, अधिवक्ता अनिल परब, डॉ. उदय सामंत आणि दादाजी भुसे यांनाही याविषयीचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वैश्विक हवामान पालटामुळे आणि वारंवार अल्प दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आगामी काळात अशी चक्रीवादळे येणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.
वर्ष २०१९-२० मध्ये ४ जिल्ह्यांतील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णे, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली आणि उसरणी येथे बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्याप्रमाणे चक्रीवादळाच्या पूर्वी मासेमारांना पूर्वकल्पना दिली जाते, त्याचप्रमाणे वादळी क्षेत्रातील फळबागायतदार, शेतकरी, व्यावसायिक यांनाही सतर्क करण्यासाठी यंत्रणा उभी करावी. जेणेकरून या वादळापूर्वी पिकांचा उतारा घेऊन या सर्वांची हानीही टाळता येईल. चक्रीवादळांच्या क्षेत्रांत पिके आणि फळबागा यांची मोठी हानी होत असल्याने तेथे कोणती पिके घ्यावीत ? वादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ? तेथील बांधकामे कशा प्रकारची असावी ? याविषयीही तेथील नागरिकांना मार्गदर्शन करावेे. बंगाल आणि ओडिशा या राज्यांत आलेल्या चक्रीवादळांची पूर्वसिद्धता म्हणून लक्षावधी नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर करण्यात आल्याने तेथील संभाव्य जीवितहानी टळली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यसरकारने उपाययोजना कराव्यात.