सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवराज्याभिषेक’ दिनानिमित्त ‘शिवस्वराज्यदिन’ उत्साहात साजरा

  • सर्वत्र शिवशक राजदंड स्वराजगुढी उभारल्याने चैतन्यमय वातावरण

  • श्री भवानीदेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वत्र जयघोष

सिंधुदुर्ग – आंब्याची पाने आणि फुले यांची तोरणे, सुबक नक्षीदार काढलेली रांगोळी, शौर्याची गाथा विशद करणारा पोवाडा, राष्ट्रगीत अन् ‘गर्जतो महाराष्ट्र माझा…’ हे गीत यांमुळे निर्माण झालेल्या आनंदाच्या आणि शौर्य जागृत करणार्‍या वातावरणात ६ जून या दिवशी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘शिवस्वराज्यदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शिवस्वराज्यदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून या दिवशी झाला होता. त्यानिमित्ताने या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. सामाजिक संघटना आणि शासनाची विविध कार्यालये यांमध्ये हा शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराजगुढी उभारून तिचे विधीवत् पूजन, तसेच शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच रांगणागडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कुडाळ येथे भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरासह तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक मंडळे यांनी शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवी गुढी उभारून शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

देवगड पंचायत समितीमध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त सभापती रवि पाळेकर यांच्या हस्ते गुढी उभाण्यात आली.