गोवा सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर आधारित लघुपटाचे लोकार्पण
गोव्यात ८ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली वहाण्याचा कार्यक्रम
पोर्तुगिजांच्या विरोधातील गोमंतकीय जनतेच्या लढ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे योगदान नवीन पिढीला समजावे, यासाठी गोवा शासनाचा स्तुत्य उपक्रम !
पणजी, ६ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांच्या अत्याचाराच्या विरोधात गोमंतकीय जनतेच्या लढ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी गोवा शासनाने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम आरंभला आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ६ जून या दिवशी सकाळी ‘पोर्तुगिजांच्या अत्याचाराच्या विरोधात गोमंतकीय जनतेच्या लढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान’, या विषयावर एका हृदयस्पर्शी लघुपटाचे लोकार्पण केले. त्याचप्रमाणे सांखळी, डिचोली, पेडणे, वाळपई, म्हापसा, फोंडा, मडगाव आणि कुडचडे येथे स्थानिक नेत्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली वहाण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या गोमंतकातील योगदानावर प्रकाश टाकणारा हृदयस्पर्शी लघुपट
पोर्तुगिजांच्या अत्याचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्यावर प्रकाश टाकणारा १५ मिनिटे ४५ सेंकदाचा हा लघुपट हृदयस्पर्शी आहे. यामध्ये पोर्तुगिजांनी तलवारीच्या बळावर केलेले अत्याचार, गोमंतकाची संस्कृती आणि पवित्र मंदिरे नष्ट करणे, घरेदारे लुटणे, धर्मपरिवर्तन करणे आदींविषयी माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ सहस्र शूरवीर सैनिकांसह कोलवाळ किल्ल्यावर केलेले आक्रमण आणि आक्रमणानंतर ३ दिवसांनी पोर्तुगिजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शरण येणे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा केलेला जीर्णोद्वार, तसेच बेतुल येथे किल्ला बांधून पोर्तुगिजांना त्यांचे साम्राज्य वाढवण्यासाठी संधी न देणे आदींविषयी माहिती आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराज यांनी मर्दनगड, फोंडा आणि सांत इस्तेंव किल्ला येथे पोर्तुगिजांवर आक्रमण करून बार्देश अन् सासष्टी तालुक्यांतील सर्व किल्ले कह्यात घेऊन पोर्तुगिजांना एक प्रकारे घेराव घालणे आदींविषयी माहिती आहे. आपल्या पूर्वजांचे शौर्य, त्याग आणि केलेला संघर्षाचा वारसा जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
लघुपट इतर भाषांमधूनही प्रकाशित व्हावा ! – धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी, पिठाधीश्वर, श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, कुंडई
कित्येक वर्षांनंतर एका राष्ट्रवादी मुख्यमंत्र्याने गोव्याच्या खर्या इतिहासाचे दर्शन घडवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर आधारित लघुपट इतर भाषांमधूनही प्रकाशित झाला पाहिज.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे योगदान नवीन पिढीला समजावे यासाठीचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांचे जतन करण्यासाठी खूप मोठा हातभार लावला आहे. गोवा राज्य सध्या गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे गोमंतकाच्या अनुषंगाने कार्य अन् गोवा मुक्तीसंग्रामाचा इतिहास नवीन पिढीला समजावा, यासाठी गोवा शासन प्रयत्नशील आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर आधारित लघुपटाचे लोकार्पण करण्यात आले आहे.