रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अनुभवलेल्या आनंददायी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
‘नोव्हेंबर २०१९ मध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी माझे रामनाथी आश्रमात जाण्याचे ठरले. ‘जेथे प्रत्यक्ष भगवंत रहातो, तेथे रहाण्याची संधी मिळून प्रक्रिया करायला मिळणार’; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला आणि मी सकारात्मक झाले.प्रक्रिया संघर्षमय असल्याने प्रत्येकालाच ती मनोभावे स्वीकारायला संघर्ष होतो; परंतु ‘मला शिकायला मिळणार’, या आनंदात असल्याने मी सकारात्मक होते.
१. व्यष्टी साधनेचा आढावा देण्यास आरंभ
१ अ. स्वतःतील स्वभावदोषांची सूची असलेली पाटी गळ्यात घालतांना मनाचा झालेला संघर्ष आणि त्यासाठी केलेले प्रयत्न : प्रथम मी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू यांची सूची सौ. सुप्रिया माथूर यांना दाखवली. त्यानंतर मी स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लिहिलेली पाटी बनवून गळ्यात घातली. त्या वेळी मला ते स्वीकारता आले नाही आणि माझा एक दिवस पुष्कळ संघर्षात गेला. तेव्हा ‘माझे चांगले चालले आहे’, हा माझा मोठा भ्रम आहे’, याची मला जाणीव झाली.
देवाच्या कृपेने पाटी गळ्यात घालतांना ‘देव माझी प्रतिमा नष्ट करत आहे’, असा भाव मला ठेवता आला आणि मनात निर्माण झालेल्या संघर्षावर मात करता आली.
१ आ. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकाला माझ्याकडून झालेल्या काही चुका आणि अयोग्य विचार सांगणे : आरंभी आढाव्यासाठी बसल्यावर ‘प्रक्रिया करणे म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ? नेमके काय प्रयत्न करायचे आहेत ?’, हे मला कळत नव्हते. मी माझ्याकडून झालेल्या काही चुका आणि अयोग्य विचार प्रामाणिकपणे आढावा घेणार्या साधकाला सांगू लागले आणि तो जे काही सांगेल, तसे प्रयत्न करायला आरंभ केला.
२. व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेतून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. मनात येणारा प्रत्येक लहान नकारात्मक विचार सारणीत लिहिल्याने सारणी लिखाणातूनच तो स्वभावदोष निघून जात असणे आणि त्यासाठी वेगळे स्वयंसूचना सत्र करावे न लागणे : पूर्वी माझ्याकडून ज्या प्रसंगात मनाचा संघर्ष झाला आहे, असेे प्रसंगच सारणीत लिहिले जायचे. मनात येणार्या प्रत्येक लहान अयोग्य विचारांचे लिखाण माझ्याकडून होत नसे. तेव्हा सौ. सुप्रियाताईने सांगितले, ‘‘असे लहान विचार साचून नंतर मोठा प्रसंग घडतो. त्यामुळे प्रसंग लहान असतांनाच लिहिला, तर सारणी लिखाणातूनच स्वभावदोष निघून जातो. त्यासाठी स्वयंसूचना सत्र करावे लागत नाही.’’
२ आ. ‘स्वतः कुठे चुकत आहे ? त्या ठिकाणी योग्य विचार कोणता ? योग्य कृती काय असायला पाहिजे ? आणि यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत ?’, हे शिकायला मिळाल्याने उत्साह वाटू लागणे : त्यानंतर सारणीत लिहिलेले मनाच्या स्तरावरचे प्रसंग मी आढाव्यात सांगू लागले. तेव्हा सुप्रियाताई त्या प्रसंगाचे विश्लेषण करून त्या प्रसंगातील मूळ स्वभावदोष शोधून देत असे. त्या वेळी ती ‘मी त्या प्रसंगात कुठे चुकले ?’, हे कठोरपणे सांगत असे. ते ऐकतांना ‘मी कुठे चुकत आहे ? योग्य विचार कोणता ? योग्य कृती काय असायला पाहिजे ? आणि यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत ?’, हे मला समजू लागले. ‘अशा प्रकारे कसा विचार करायचा असतो’, हे शिकायला मिळाल्याने मला उत्साह वाटू लागला.
२ इ. बहिर्मुखतेमुळे उद्भवणारे प्रसंग आणि त्यामागील स्वभावदोष
२ इ १. ‘जिथे स्वतःची चूक असते, तिथे स्वतःकडे कठोरपणे बघितले पाहिजे आणि दुसर्यांकडून चूक झाल्यास त्याला समजून घेऊन क्षमा करता आली पाहिजे’, असे शिकायला मिळणे : पूर्वी माझ्याकडून चूक झाल्यास ‘समोरची व्यक्ती अयोग्य वागली किंवा परिस्थितीच तशी होती; म्हणून माझ्याकडून चूक झाली’, असे विचार मनात येत. माझ्याकडून चूक झाल्यास मला स्वतःविषयी सहानुभूती असे आणि ‘इतरांनी मला समजून घ्यायला हवेे’, असे वाटायचे. ‘माझ्याकडून ‘दुसर्यांकडून झालेली चूक गांभीर्याने घेतली जात आहे’, याची ताईने मला कठोरपणे जाणीव करून दिली आणि ‘येथे नेमकी उलट प्रकिया राबवायची आहे’, याविषयी सांगितले अन् म्हणाली, ‘‘जिथे स्वतःची चूक असते, तिथे स्वतःकडे कठोरपणे बघितले पाहिजे आणि दुसर्यांकडून चूक झाल्यास त्याला समजून घेऊन क्षमा करता आली पाहिजे.’’
२ इ २. ‘कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती यांमुळे स्वतःची स्थिती बिघडत नसते, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे परिस्थिती बिघडत असून त्यामुळे येणारी अस्थिरता स्वतःमुळेच आलेली असते’, असे लक्षात आणून देणे : एका प्रसंगात मला एका साधिकेची भीती वाटत होती. तेव्हा मी बहिर्मुखतेमुळे साधिकेचे स्वभावदोष बघत होते आणि माझ्यातील ‘स्पष्टपणे बोलता न येणे आणि भीती वाटणे’, या स्वभावदोषांकडे दुर्लक्ष करत होते.
‘प्रत्यक्षात कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती यांमुळे स्वतःची स्थिती बिघडत नसते, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःची स्थिती बिघडते. ही अस्थिरता स्वतःमुळेच आलेली असते’, याची जाणीव सुप्रियाताईने मला करून दिली. त्यामुळे ‘इतरांनी मला समजून घ्यायला हवे’, हा संकुचित विचार सोडून ‘समोरच्या साधकाची नेमकी काय अडचण आहे ? नेमकी परिस्थिती काय होती ?’, ते समजून घेण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले.
वरील प्रसंगांमुळे ‘अशी विचारप्रक्रिया, म्हणजे बहिर्मुखता आहे’, याची मला जाणीव झाली.
२ इ ३. ‘माझ्यामध्ये पुष्कळ अस्थिरता आहे’, याची जाणीव सुप्रियाताईनेच करून दिली; मात्र त्यामागे ‘माझा नेमका कोणता स्वभावदोष आहे ?’, ते माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा ताईने ‘माझ्यातील आग्रही भूमिकेमुळे माझ्यात अस्थिरता आहे’, याची जाणीव करून दिली.
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने होणारे परिणाम
अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली नाहीच, तर ‘आढावा घेणारे साधक काय सांगत आहेत ?’, ते आपल्याला आकलन होत नाही. ते स्वीकारता येत नाही. त्यामुळे अंतर्मुखता येत नाही.
आ. आरंभी मनाचा संघर्ष होणे साहजिकच असते. नंतर कृतीच्या स्तरावर मनापासून आणि सातत्याने प्रयत्न केल्याने मनाची शुद्धी होते आणि अनिष्ट शक्तीचे आवरण दूर व्हायला साहाय्य होते.
इ. शरिरात पित्त वाढल्यास चिडचिड होते, तसेच चुका झाल्यामुळे चिडचिड होते. त्यामुळे अनिष्ट शक्तींचा त्रास वाढत जातो. कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्याने त्रास लवकर न्यून होतात.
४. सारणी लिखाण
सारणीत मनातील सर्व अयोग्य विचार लिहिल्याने मनाची शुद्धी होते. नंतर त्या अयोग्य विचारांवर योग्य दृष्टीकोन देणे, चिंतन करणे जमायला लागल्याने अंतर्मुखता येते. काही प्रसंगांत हे चिंतन मनाच्या स्तरावर करणे अपेक्षित असते; अशा प्रसंगात चिंतन जर बुद्धीच्या स्तरावर केले, तर केवळ तो अभ्यास होतो. त्याचा लाभ होत नाही, हे शिकायला मिळाले. जेवढे चिंतन अधिक, तेवढे अंतर्मनातून प्रयत्न अधिक होतात आणि प्रयत्नांची गती वाढते.
४ अ. सारणीत चूक लिहितांना किंवा चुकीमागील मूळ स्वभावदोष शोधतांना मन किंवा बुद्धी यांच्या स्तरावर चिंतन कसे करावे ?
४ अ १. चिंतन बद्धीच्या स्तरावर झाल्यास खंत न वाटल्याने अंतर्मुखता न येणे : एका प्रसंगात एका साधकाने मनाने एक कृती केली. त्यात त्याचा अतिआत्मविश्वास होता. ‘योग्य काय असायला हवे ?’, हे त्याने विचारून घेतले नव्हते. त्यात त्याने कार्यपद्धतीचे पालन केले नव्हते. आढाव्यात त्याने या प्रसंगातील त्याचे सर्व स्वभावदोष सांगितले. तेव्हा सुप्रियाताईने ‘सर्व अभ्यास बुद्धीच्या स्तरावर केला आहे’, असे सांगितले; कारण त्याच्या मनाला या चुकीची खंत वाटत नसल्याने त्याच्या मनाचा सहभाग या प्रसंगात कुठेच जाणवला नव्हता. तेव्हा सुप्रियाताई म्हणाली, ‘‘चिंंतन मनाच्या स्तरावर झाले नसल्याने खंत वाटत नाही. त्यामुळे अंतर्मुखता नाही.’’
साधकांमध्ये साधकत्व निर्माण करण्यासाठी कार्यपद्धती असतात. त्यांचे पालन केले नाही, तर आपण साधक म्हणून कसे घडणार ? व्यष्टी साधनेच्या अभावामुळे साधक प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्यांची फलनिष्पत्ती उणावते. सर्वसाधारण विचार करायलाही आपण उणे पडतो.’’
(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
– सौ. समिधा संजय पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |