शांत, रुग्णाईत स्थितीतही इतरांचा विचार करणारे आणि तळमळीने गुरुसेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे उज्जैन येथील कै. दिवाकर कुलकर्णी (वय ७७ वर्षे) !
१.५.२०२१ या दिवशी उज्जैन येथील दिवाकर कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांची मुलगी आणि सून यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. श्रुती डोंगरे (मुलगी), शिकागो, अमेरिका
१ अ. समाधानी वृत्ती : ‘माझ्या बाबांना कधीही कसलीही अपेक्षा नसायची. त्यांच्याकडे जे होते, त्यात ते समाधानी होते. घरात किंवा बाहेर कार्य करतांनाही ते समाधानी आणि आनंदी असायचे.
१ आ. शांत स्वभाव : ते मितभाषी होते. आपण जितके विचारू, तितकेच ते उत्तर द्यायचे. त्यांना कुणी कितीही बोलले, तरी ते प्रत्युत्तर द्यायचे नाहीत किंवा मनात काही धरूनही ठेवायचे नाहीत. ते कधी कुणाविषयी वाईट बोलले नाहीत.
१ इ. इतरांचा विचार करणे
१. बाबांच्या आईला वृद्धापकाळात अंगदुखीचा पुष्कळ त्रास होता. आजी ‘पुरे. झोप आता’, असे म्हणेपर्यंत ते रात्री उशिरापर्यंत स्वतःचा विचार न करता तिचे हात-पाय चेपायचे.
२. बाबांनी आम्हाला शिक्षणासाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी मला महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग येथे जाण्यासाठी दुचाकी घेऊन दिली; मात्र ते स्वतः नोकरीच्या ठिकाणी पायी चालत जायचे.
१ ई. सेवाभाव
१. हनुमान मंडळ आणि व्यायामशाळा यांचा हिशोब ठेवण्याचे कार्य ते ‘समाजसेवा’ या भावाने प्रामाणिकपणे करायचे.
२. बाबांना कधीही आणि केव्हाही सेवा सांगितली, तरी ते सदैव सिद्ध असायचे. वर्ष २००४ – २००५ मध्ये त्यांनी प्रतिदिन सकाळी आणि दुपारी महाकाळ मंदिरात ग्रंथप्रदर्शनाची सेवा उत्साहाने केली. वेगवेगळ्या ठिकाणी लागणार्या ग्रंथप्रदर्शनात त्यांनी तत्परतेने सेवा केली.
१ उ. भाव
१. बाबा पूजा झाल्यानंतर देहभान विसरून भावपूर्ण आरती म्हणायचे.
२. ते प्रतिवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी तल्लीन होऊन गुरुचरित्र वाचायचे.
गुरुदेवांनी बाबांकडून साधना करवून घेऊन त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. त्यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता आणि ‘पुढेही त्यांची साधनेत प्रगती व्हावी’, हीच गुरुचरणी प्रार्थना !
२. सौ. स्मिता कुलकर्णी (सून), उज्जैन
२ अ. सासर्यांना ताप येणे
२ अ १. सासर्यांना ताप आल्यावर लगेचच औषधोपचार करणे : ‘१५.४.२०२१ या दिवसापासून माझ्या सासर्यांना ताप येऊ लागला; म्हणून त्यांच्यावर लगेचच औषधोपचार चालू केले. त्यांची ‘ऑक्सिमीटर’ आणि ‘थर्मामीटर’ यांनी प्रती ३ घंट्यांनी तपासणी करून नोंदी केल्या. तापाविना त्यांना कोरोनाचे कुठलेच लक्षण नव्हते.
२ अ २. रक्त तपासणी अणि क्ष-किरण चाचणी केल्यावर सासर्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे समजणे : २२.४.२०२१ या दिवशी सासर्यांची रक्त तपासणी आणि क्ष-किरण चाचणी केली. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे समजले. आधुनिक वैद्यांनी त्यांना कोरोनासाठी इंजेक्शन देऊन घरीच उपचार चालू केले आणि त्यांच्या काही चाचण्या करून घ्यायला सांगितले. सासर्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्यांची ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी केल्यावर त्यांच्या फुफ्फुसात ४५ टक्के संसर्ग असल्याचे कळले. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २ दिवसानंतर येणार होता. तेव्हा आम्ही नामजपादी उपाय केले.
२ अ ३. सासर्यांचा कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येणे : २८.४.२०२१ या दिवशी माझे यजमान सासर्यांच्या कोविड चाचणीचा अहवाल आणायला गेले होते. सासर्यांचा कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. तेव्हा तेथील कर्मचार्याने सांगितले, ‘‘त्यांच्या अहवालानुसार यांच्यापासून कोविड पसरण्याची शक्यता नाही.’’ ‘आताच्या परिस्थितीत बाहेर इतकी गंभीर स्थिती असतांना त्याने असे सांगणे’, म्हणजे ‘गुरुकृपाच आहे’, असे मला वाटले.
२ अ ४. सासर्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना रुग्णालयात भरती करणे
अ. त्यानंतर सासर्यांची प्रकृती खालावत गेल्याने ३०.४.२०२१ या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती केले आणि अलगीकरण कक्षामध्ये ठेवले. बाहेरची स्थिती गंभीर असतांनाही आम्ही स्थिर होतो.
आ. आम्ही रुग्णालयात गेल्यावर आमचा कोरोनाविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी सांगितलेला नामजप आपोआप चालू व्हायचा.
२ आ. सासरे रुग्णाईत असतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. ते रुग्णाइत असतांना त्यांना ८ ते १० दिवस अंघोळ करणे शक्य नव्हते, तरी त्यांच्या शरिराला दुर्गंध येत नव्हता.
२. सासर्यांची सेवा करतांना ‘त्यांच्या जवळ जाऊ नये’, असे विचार आमच्या मनात आले नाहीत. गुरुकृपेने आमचे मन स्थिर होते.
३. इतरांचा विचार करणे : ते रुग्णाईत असतांना इतरांनी त्यांची सेवा केल्यावर त्यांना खंत वाटे. त्यांना थोडे बरे वाटले की, ते स्वतःचे सर्व स्वतःच करायचे. या रुग्णाईत स्थितीतही ते दुसर्यांचा विचार करत होते. ‘तुम्हाला माझे किती करावे लागते’, असे ते म्हणायचे.
४. त्यांच्याकडे दत्तमाला मंत्रपठणाची सेवा होती. त्यांना मधे बरे वाटले की, ते दत्तमाला मंत्रपठणाची सेवा करायचे.
२ इ. सासर्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
२ इ १. निधनानंतर तोंडवळा स्थिर आणि शांत जाणवणे : १.५.२०२१ ला रात्री ११.३० वाजता सासर्यांचे निधन झाले. त्या वेळी आम्ही त्यांच्या जवळ नव्हतो. आम्ही रुग्णालयात गेल्यानंतर सासर्यांच्या मृतदेहाकडे पाहिल्यावर त्यांचा तोंडवळा स्थिर आणि शांत जाणवत होता.
२ इ २. कुटुंबियांचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक येणे : आम्ही (मी, सासूबाई, यजमान, मुलगा आणि मुलगी) सर्वांनी सांगितल्यानुसार ५.५.२०२१ या दिवशी आमची कोविड चाचणी केली. आमच्या सगळ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. तेव्हा आम्हाला श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता वाटली.
‘सासर्यांना पुढे चांगली गती मिळून त्यांची मोक्षाच्या दिशेने वाटचाल होवो’, अशी दत्तगुरु आणि श्री गुरु यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाचयेतील असे नाही. – संपादक |