पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राज्यात १ सहस्र ठिकाणी आंदोलन करणार ! – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
मुंबई – मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस यांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास अधिक दिवस लागणार नाहीत. गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीच्या विरोधात ७ जून या दिवशी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल यांमधून कररूपाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. ‘युपीए’ सरकार असतांना पेट्रोलवर ‘एक्साईज ड्युटी’ ९.४८ रुपये होती, ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. डिझेलवर ‘एक्साईज ड्युटी’ ३.५६ रुपये होती, ती आज ३१.८० रुपये इतकी आहे. म्हणजे ८२० टक्के वाढ आहे. यातून मोदी सरकारने मागील ७ वर्षांत २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. वर्ष २००१ ते २०१४ या कालावधीत प्रतीलिटर १ रुपया असलेला पेट्रोल-डिझेल यांवरील ‘सेंट्रल रोड फंड सेस’ वर्ष २०१८ मध्ये १८ रुपये इतका करण्यात आला. या दरोडेखोरीच्या विरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३ पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे.’’