मराठा समाजाला न्याय दिल्याविना मी गप्प बसणार नाही ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, भाजप
|
मुंबई – आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात; पण यापुढे मराठा समाजाला न्याय दिल्याविना मी गप्प बसणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. ६ जून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाविषयीची भूमिका छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केली. या वेळी त्यांनी ‘मराठा आरक्षणासाठी १६ जून या दिवशी पहिला मोर्चा काढणार आहे’, अशी घोषणाही केली.
या वेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले…
१. खासदार आणि आमदार वेतन घेतात; पण कुठलाही आमदार मराठा आरक्षणासाठी पुढे आलेला नाही. तुमचे दायित्व काय आहे ? यावर बोला. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवे की, सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात ?
२. आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्चित आहे.
३. मला सांगायचे आहे की, सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिले दायित्व आमच्या लोकप्रतिनिधींचे आहे. पहिला मोर्चा कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीच्या ठिकाणी आहे.
४. कोरोना संपल्यानंतरही तुम्ही ठोस पावले उचलली नाहीत, तर माझ्यासह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत मोर्चा काढेल. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी मला मारावी लागेल. आम्हाला गृहित धरू नका.
५. आधीच्या सरकारमधील लोक म्हणाले की, आताच्या सरकारने मांडणी योग्य केली नाही.’ आताचे सरकार म्हणते, ‘‘तुम्ही कायदा योग्य केला नाही.’’ कोण चुकले ? त्याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही. ‘आम्हाला न्याय द्या’, ही आमची एकच मागणी आहे.