भारताची व्यसनाधीन तरुण पिढी !
भारतातील महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थ या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. गुरुकुलाची परंपरा असणार्या भारतासाठी ही अत्यंत लज्जास्पद आणि खेदजनक गोष्ट आहे.
भारताच्या शत्रूराष्ट्रांनी भारतातील युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी कशी जाईल, यासाठी मोठे षड्यंत्र रचले आहे आणि दुर्दैवाने भारतातील युवा पिढी त्याला बळी पडली आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाने हिंदु तरुणांची वाताहत झाली आहे. महाविद्यालयाबाहेर तंबाखूची अवैध दुकाने आढळतात; पण त्यावर कारवाई होतांना दिसत नाही.
धर्माचरण करणारी मुले व्यसनांना बळी पडण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे युवकांनी धर्माचरण करणे हाच व्यसनांपासून दूर रहाण्याचा योग्य उपाय आहे !
‘आयआयटी कानपूर’चे शेकडो विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी !
‘कानपूर येथील ‘आयआयटी कानपूर’ या शिक्षण संस्थेत शिकणारे शेकडो विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती प्रशासनाने केलेल्या अंतर्गत चौकशीतून उघडकीस आली आहे. याविषयी आयआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितले, ‘‘ही आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविषयी जिल्हा न्यायदंडाधिकारी सुरेंद्र सिंह यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’’
महाविद्यालयांतील एक तृतीयांश विद्यार्थी मद्यसेवन करतात !
‘मेडिकल अँड अप्लाइड सायन्स’ अहवालातील माहिती !
‘गोव्यात महाविद्यालयांतील ३४.१० टक्के (एक तृतीयांश) महाविद्यालयीन विद्यार्थी मद्यसेवन करतात. त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण ३१.८ टक्के असून विद्यार्थ्यांचे प्रमाण ३९.१८ टक्के आहे. महाविद्यालयातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांना ‘मद्याच्या दुष्परिणामाविषयी कुणी काहीही सांगितलेले नाही’, असे सांगितले आहे. ‘गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मद्यसेवन आणि त्याच्या परिणामाविषयी त्यांची जाण’ यासंबंधी ‘मेडिकल अँड अप्लाइड सायन्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात माहिती देण्यात आली आहे, असे वृत्त ‘द गोवन वार्ता’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.’