‘कोरोनामुक्त गाव’ या योजनेवर लक्ष केंद्रित करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुडाळ येथील ‘लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांट’चे ऑनलाईन उद्घाटन
सिंधुदुर्ग – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनांप्रमाणे ‘कोरोनामुक्त गाव’ या योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे. छोटे छोटे दायित्व स्वीकारून सांघिकरित्या जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे मोठे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कुडाळ येथील ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवघ्या १५ दिवसांत बसवण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाच्या ‘लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांट’चे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत,
आमदार दीपक केसरकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उद्घटनासाठी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे या वेळी पुढे म्हणाले की,
१. कोकणच्या किनार्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, अतिवृष्टी, तर कधी चक्रीवादळ. अशा संकटांबरोबरच कोरोनाचाही सामना करावा लागत आहे. तुम्ही सर्वजण संकटाचा केवळ सामना न करता आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत आहात. यासाठी सर्वांचे मनापासून कौतुक करतो.
२. पुढच्या संकटाची तीव्रता अल्प करण्यासाठी नियोजन करणे आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही, यासाठी नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे. मागील अनुभव पहाता जिल्ह्याची ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवा.
३. राज्याची आरोग्यसुविधा बळकट करण्याला प्राधान्य देत आहोत. शासनाकडून आवश्यक ती सुविधा जिल्ह्याला दिली जाईल. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासता कामा नये. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करा.
३. लोकप्रतिनिधींनी मतदारसूचीप्रमाणे कोरोनामुक्तीसाठी काम करावे. सर्वप्रथम ‘माझे घर कोरोनामुक्त’ यावर भर द्या.
या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ या ४ ठिकाणी अद्ययावत् ऑपरेशन थिएटरची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांट असावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. जिल्ह्यात आता ५६५ ऑक्सिजन खाटा आहेत. त्यामध्ये वाढ करून १ सहस्रपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेला सामोरे जातांना आवश्यक ती सुविधा, साधनसामुग्री उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सारस्वत बॅँक, काही उद्योजक, काही स्वयंसेवी संस्था यांनीही सी.एस्.आर्. फंडामधून योगदान दिले आहे.