लसीकरणाअभावी सातारा जिल्ह्यातील ४०० युवकांचे भवितव्य अंध:कारमय


सातारा, ४ जून (वार्ता.) – विदेशात शिक्षण आणि नोकरी यांसाठी येथील युवकांनी ‘ऑनलाईन’ नोंदणी करून तेथील प्रवेश तसेच नोकरी निश्‍चित केली आहे. सध्या राज्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण बंद आहे. त्यातच विदेशी दूतांनी लसीकरण केल्याशिवाय विदेशात प्रवेश निषिद्ध केला आहे. याचा फटका जिल्ह्यातील ४०० युवकांना बसला आहे. त्यामुळे वेळ निघुन जाण्याअगोदर निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील युवकांचे भवितव्य अंध:कारमय होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या युवकांना लसीकरण करणे आवश्यक करण्यात आले असून त्यातही ‘कोव्हिशिल्ड’चीच लस घेतलेली असावी, असेही बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे अशा युवकांचा लसीकरणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश युवकांना ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये विदेशात जावे लागणार आहे. जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.