आषाढी वारीच्या निमित्ताने सरकारने वारकर्यांच्या भावना लक्षात घेऊन ‘पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर – सध्या महाराष्ट्रात तमाम वैष्णवजन, समस्त वारकरी संघटना, दिंडीकरी, फडकरी यांच्याकडून ‘आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर अशी पायी वारी काढण्यासाठी अनुमती मिळावी’, अशी मागणी केली जात आहे. तरी सरकारने या संदर्भात वारकर्यांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ बैठक बोलावून चर्चा करून मार्ग काढावा. आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करत आहोत, असे सुनील घनवट यांनी सांगितले.
आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, वारकरी महामंडळ सचिव (आळंदी)
वारकरी संप्रदायाच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट आहे की, पंढरपूरची वारी ही आतापर्यंत पायीच होत आली आहे आणि या वर्षीही ती पायीच व्हायला हवी. आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही.
यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते
वारी हे एक वैभव आहे. समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की, निर्बंधासह का असेना; पण पायी वारी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरित वारकर्यांसमवेत चर्चा करून नियमावली सिद्ध करावी; मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे. याविषयी आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.