भायखळा येथे पोलीस हवालदाराने ५० लाख रुपयांचे दागिने चोरले !

कुंपणच शेत खाऊ लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – भायखळा येथे खलील शेख या पोलीस हवालदाराने कट रचून सोन्याच्या व्यापार्‍याचे ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या हवालदारासह चोरीत सहभागी असणार्‍या त्याच्या सहकार्‍यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

शिवडीतील सोनेव्यापारी भरत जैन हे त्यांच्या मित्रासह ३१ मे या दिवशी दुचाकीवरून येत असतांना काही पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवली. वाहनाची कागदपत्रे पडताळण्याच्या निमित्ताने पोलिसांनी त्यांच्या पिशवीची झडती घेतली. पिशवीमध्ये सोने असल्याचे पाहून ‘याची पोलीस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल’, असे सांगून पोलीस सोने घेऊन गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. त्यावर जैन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनास्थळ, तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चोरीत वापरण्यात आलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या मित्राला अटक केली. हवालदार खलील शेख याने हा कट रचल्याचे सांगण्यात आले.