खलिस्तानी आतंकवाद : चीनचे छुपे युद्ध !
१. खलिस्तानी आतंकवाद संपवण्यात सैन्य दल आणि पोलीस यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका !
१ अ. भारतीय सैन्याने खलिस्तानी आतंकवादाचे कंबरडे मोडले ! : ‘ज्या वेळी पंजाबमध्ये खलिस्तान आतंकवाद जोरावर होता, त्या वेळी माझी बटालियन ‘७ मराठा लाईट इन्फेट्री’ ही पाकिस्तानकडून येणार्या आतंकवाद्यांना थांबवण्यासाठी गुरुदासपूर भागात होती. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ झाल्यानंतरही आमची बटालियन आतंकवाद्यांना पकडण्यासाठी तेथे गुंतलेली होती. या आतंकवाद्यांशी मी स्वत: लढलेलो आहे. हा आतंकवाद आम्ही अनुभवलेला आहे. १९९० च्या दशकात भारतीय सैन्याने त्याचे कंबरडे मोडले. या संघर्षात मी माझे अनेक सहकारी गमावले आहेत.
१ आ. आतंकवाद्यांच्या विरोधात राबवलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि ‘ऑपरेशन थंडर’ ! : जून १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात ५०० ते ६०० खालिस्तानी आतंकवादी घुसले होते. त्यांना मारण्यासाठी भारतीय सैन्याला आत प्रवेश करावा लागला. या मोहिमेला ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ असे म्हटले जाते. या मोहिमेत भारतीय सैन्याने आतंकवाद्यांना ठार केले; पण या घटनेनंतर आतंकवाद अन्य भागात मोठ्या प्रमाणात वाढला. २ वर्षांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबवण्यात आले. आतंकवादी परत सुवर्ण मंदिरात घुसले; पण या वेळी सैन्याने सुवर्ण मंदिरावर आक्रमण केले नाही. त्यांनी ‘स्नायपर्स’चा वापर करून आतंकवाद्यांना ठार मारले. ही मोहीम अतिशय यशस्वी समजली जाते.
१ इ. खलिस्तानी आतंकवाद, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ! : खलिस्तानी आतंकवादामध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. त्यानंतर देहली आणि उत्तर भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये पुष्कळ प्रमाणात दंगली उसळल्या. त्यात शीख समाजाला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा खलिस्तानी आतंकवादाने उसळी घेतली.
वर्ष १९८४ ते १९८६ या काळात भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणात रक्त सांडावे लागले. वर्ष १९९० मध्ये या आतंकवादाचे कंबरडे मोडले. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांचे मोठे योगदान आहे. दुसरे पंजाब पोलीसचे पोलीस महासंचालक के.पी.एस्. गिल यांचेही मोठे योगदान आहे. तेव्हा पोलीस महानिरीक्षक असलेले वीर्क यांनीही पुष्कळ चांगली कामगिरी बजावली.
पंजाबला आतंकवादमुक्त करण्यात तेथील तत्कालीन मुख्यमंत्री बेअंतसिंह यांचीही महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आतंकवाद्यांचा त्यांच्यावर राग होता. वर्ष १९९५ मध्ये आतंकवाद्यांनी त्यांना एका बॉम्बस्फोटात उडवले. आता जवळजवळ खलिस्तानी आतंकवाद थांबलेला आहे आणि सध्या परिस्थिती शांत आहे.
२. चीन आणि पाकिस्तान यांनी भारतात खलिस्तानी आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणे
चीन आणि पाकिस्तान हे भारतात खलिस्तानी आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांना यश मिळत नाही. आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे. अलीकडे खलिस्तानवाद्यांना स्फोटासारख्या कारवाया करणे जमले नाही; पण ते ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत असतात. भारताच्या बाहेर त्यांनी चांगले जाळे सिद्ध केले आहे. वर्ष २०१५ मध्ये गुरुदासपूर येथे आतंकवादी आक्रमण झाले होते. त्यात देशाबाहेरील आतंकवाद्यांचा सहभाग होता. सध्या खलिस्तानी हे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे वसलेले आहेत. चीन आणि पाकिस्तान यांनी कितीही प्रयत्न केले, तरी पंजाबचा खलिस्तान होऊ शकत नाही. खलिस्तानला पंजाबच्या लोकांचा अजिबात पाठिंबा नाही. पंजाबमधील युवक मोठ्या संख्येने भारतीय सैन्यात आहेत. त्यांच्याकडून कधीही चुकीचे काम होणार नाही.
३. विदेशातील खलिस्तानी समर्थकांना उत्तर देण्याची सिद्धता भारताने करणे आवश्यक !
कॅनडाच्या मंत्रीमंडळात काही शीख समाजाचे मंत्री आहेत. त्यातील २ जण खलिस्तान समर्थक आहेत. तेथून ते खलिस्तानवाद्यांना साहाय्य करतात. त्यांचे मत नोंदवतात. तोच भाग इंग्लंडमध्ये होतो. तेथे मतपेटीच्या राजकारणामुळे खलिस्तानवाद्यांना महत्त्व दिले जाते. इंग्लंडमधील काही खासदारांनी तेथील संसदेत खलिस्तानचा प्रश्न उपस्थित केला. ‘ते भारताच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलत असतील, तर भारतानेही इंग्लंडमधील आयर्लंडच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी बोलायचे का ?’, असे त्यांना विचारावेसे वाटते.
कॅनडालाही खलिस्तानचा एवढा पुळका आहे, तर त्यांनी त्यांच्या देशातील एक भाग खलिस्तान म्हणून घोषित करून टाकावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कॅनडाच्या लोकांना कोरोनावरील लस बनवता आली नाही. ती ते भारताकडून घेऊन जात आहेत. भारतात खलिस्तान होणार नाही; परंतु त्याला कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे प्रत्युत्तर कसे द्यायचे, यासाठी भारताने काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
४. पंजाबमधील अमली पदार्थाचा आतंकवाद !
आज पंजाबमध्ये अफू, गांजा आणि चरस यांचा आतंकवाद फोफावला आहे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे आपण पुष्कळ सतर्क राहिले पाहिजे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंंदर सिंह यांच्या मते पाकिस्तान ड्रोनच्या साहाय्याने अमली पदार्थ आणि शस्त्रे पंजाबमध्ये पाठवतोे. अशा प्रकारचे अनेक ड्रोेन पंजाबमध्ये पकडण्यात आले आहेत. पाकिस्तानला ड्रोन कसे चालवायचे, हे ठाऊक नाही; परंतु पाकचा मित्र असलेल्या चीनने त्याला अत्याधुनिक ड्रोन पुरवले आहेत. त्यांच्या साहाय्याने अमली पदार्थ आणि बनावट नोटा पंजाबमध्ये पाठवल्या जातात.
खलिस्तानी आतंकवादानंतर पंजाबला ‘उडता पंजाब’, म्हणजे अमली पदार्थांच्या आतंकवादाने ग्रासले आहे. अनेक पंजाबी युवक अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. दुर्दैवाने हा आतंकवाद देशाच्या अन्य भागांतही पसरलेला आहे. मागील वर्षी अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक वलयांकित व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले. त्यामुळे भारताला अतिशय सावध रहावे लागेल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.