पौष्टिकतेची ऐशीतैशी !

नेस्ले’ या हे नाव जगविख्यात आहे. त्याच्या विविध अन्नपदार्थांचा ग्राहक वर्ग आज जगभरात  मोठ्या प्रमाणात आहेत. ही जरी चांगली बाजू असली, तरी ‘नेस्ले’ हे नाव यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरले होते आणि अजूनही ठरत आहे. ‘नेस्ले’चे ‘६० टक्के अन्नपदार्थ आणि पेय आरोग्यासाठी पौष्टिक नाहीत’, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर आस्थापनानेही सांगितले की, ‘कितीही सुधारणा केल्या, तरी काही अन्नपदार्थ कधीही आरोग्यासाठी हितकारक होऊ शकत नाहीत.’ खरेतर कोणताही अन्नपदार्थ म्हटला की, त्याचा मानवाच्या आरोग्याशीच संबंध येतो. त्यामुळे अन्नपदार्थ हा पौष्टिक आणि सकस असायला हवा. अहवालानंतर ‘नेस्ले’ आस्थापन संबंधित उत्पादने सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते; पण असे असले, तरी मुळात ही उत्पादने असुरक्षित होतातच कशी ? या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांचे कोणतेही उत्पादन चाचणी आणि पडताळणी यांच्या विविध कसोट्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच पेठेत विक्रीसाठी आणले जाते. ते सुरक्षित, खाण्यायोग्य आहे ना ? त्यातील घटकांचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत ना ? अमुक पदार्थ किती काळ टिकून राहू शकतो ? अशा विविध सूत्रांनुसार त्यांची १०० टक्के निश्‍चिती करून मगच त्याला मान्यता मिळत असते. इतक्या विविध टप्प्यांवरील चाचण्या उत्तीर्ण झालेली ‘नेस्ले’च्या आस्थापनाची उत्पादने पौष्टिक नाहीत, हे कालांतराने कसे काय समजते ? याचा अर्थ उत्पादनांच्या सुरक्षिततेच्या निश्‍चिती प्रक्रियेतच काहीतरी गौडबंगाल झालेले असू शकते, असे म्हणण्यास वाव आहे. जे आता कळते, ते विक्रीपूर्व चाचण्यांमधून दिसून आले नव्हते का ? या संपूर्ण प्रक्रियेत अन्न आणि औषध प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. जर खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीत, तर ते ग्राहकांपर्यंत कोण पोचवते ? अन्न आणि औषध प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही का ? खाण्यायोग्य नसलेल्या पदार्थांमुळे कुणाच्या जिवावर बेतले, तर त्याचे दायित्व कोण घेणार ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ‘नेस्ले’ आस्थापन आणि खाद्यपदार्थांशी संबंधित असणारे उत्तरदायी अधिकारी यांनी द्यायला हवीत.

प्रतिकात्मक छायाचित्र

वादग्रस्त ‘नेस्ले’ !

वर्ष २०१५ मध्ये ‘नेस्ले’ आस्थापनाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. ‘नेस्ले’ची ‘मॅगी’ खाऊन दक्षिण भारतातील ९ मुलांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा ‘मॅगी’मध्ये शिसे अधिक प्रमाणात आढळून आले होते. मॅगी आरोग्यास अपायकारक असल्याचे लक्षात आल्यावर त्यावर भारतातील अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. कोईमतूर येथील एका व्यक्तीने तिच्या जुळ्या बाळांसाठी घेतलेल्या ‘नेस्ले’च्या दुधाच्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या होत्या. प्रत्यक्षातही चाचणीमध्ये त्यात अळ्या असल्याचे निदर्शनास आले. या अळ्यांचा परिणाम म्हणून एका बाळाच्या अंगावर पुरळ उठले. त्यानंतर ‘नेस्ले’ची दूध पावडर वापरण्यायोग्य नसल्याचे घोषित करण्यात आले. ‘नेस्ले’चा पास्ताही अपायकारक असल्याचे मध्यंतरी सिद्ध झाले होते. खाद्यपदार्थांच्या चाचण्या करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती असतांना अन्नपदार्थ खाणार्‍यांना त्रास होईल, इतके दर्जाहीन पदार्थ पेठेत कसे येतात ? खाद्यपदार्थांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा केला जात असल्याने त्यात विष निर्माण होते. ते लहान आतड्यात शोषले जाऊन हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत या अवयवांना हानी पोचते. हे गंभीर आणि भयावह परिणाम खाद्यपदार्थ सिद्ध करणार्‍या सर्वच आस्थापनांनी विचारात घेतले पाहिजेत. ‘नेस्ले’ हे आस्थापन स्वीडनचे आहे. विविध खाद्यपदार्थांमुळे आस्थापनाला जागतिक बाजारपेठ मिळाली खरी; पण उत्पादनांच्या निकृष्ट दर्जामुळे आस्थापनाचा नावलौकिक धुळीस मिळाला गेला. काही दशकांपूर्वी ‘नेस्ले’ने ‘मातेच्या दुधापेक्षा आमची दूध पावडर चांगली आहे’, असा दावा केला होता. मातेचे दूध हे अमृतासमान असते, हे सर्वश्रुत आहे. मातेच्या दुधाची तुलना कोणत्याही आस्थापनाच्या दुधाशी किंवा दूध पावडरसमवेत कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःची दूध पावडर श्रेष्ठ (?) असल्याचा दावा करणार्‍या ‘नेस्ले’वर टीका करण्यात आली होती.

जनता काय किंवा लहान बालके काय, सर्वांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विदेशी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांवर का बरे अवलंबून रहायचे ? ‘नेस्ले’प्रमाणेच अन्य विदेशी आस्थापनांच्याही खाण्यायोग्य नसणार्‍या खाद्यपदार्थांवर जनतेनेच बहिष्कार घालायला हवा. अशा उत्पादनांची गुणवत्ता पुढे सुधारली जाईल; पण तोपर्यंत जी निकृष्ट उत्पादने बाजारात विक्रीला आहेत, ती आस्थापनाने परत मागवावीत, यासाठी प्रशासनाने हालचाल करणे आवश्यक आहे. जोपर्यंत संबंधित खाद्यपदार्थ उत्कृष्ट दर्जाचे आणि पौष्टिक असल्याचे सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांची खरेदी-विक्रीही केली जाऊ नये, असेच जनतेला वाटते. भारत सरकारनेही जनताहितार्थ विचार करून तत्परतेने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा !

निरोगी पिढी !

पूर्वी अन्नधान्य आणि सर्वच खाद्यपदार्थ यांचा दर्जा सकस अन् पौष्टिक असायचा. त्यामुळे चालणे, बोलणे, श्‍वासोच्छ्वास, अन्नपचन, हृदयगती, विचार करणे या क्रियांसाठी लागणारी ऊर्जा अन्नातून मिळायची. अन्नातून धातू, इंद्रिये, बल, तेज, संतोष, प्रतिभा आणि आरोग्य यांची प्राप्ती होत असे. त्यामुळे तेव्हाची पिढी ही आताच्या पिढीच्या तुलनेत अधिक बलशाली आणि निरोगी होती. शरीरस्वास्थ्य उत्तम असल्याने लोक अधिक वर्षे जगत. रोगराई, व्याधी यांचे प्रमाणही नगण्य असायचे. आताचे धान्य किंवा खाद्यपदार्थ यांत सर्वाधिक भेसळ असते. वैज्ञानिक उपकरणे आणि रासायनिक खते यांच्या वापरामुळे पोषणमूल्ये न्यून होऊन त्याचा मनुष्य जीवनशैलीवर परिणाम होतो. विषवैज्ञानिक डॉ. के.एन्. मल्होत्रा यांनी म्हटले होते, ‘आम्ही केवळ आम्हालाच विषाचे बळी बनवत नसून येणार्‍या पिढ्यांचेही प्राण संकटात टाकत आहोत.’ हे भीषण वास्तव खाद्य आस्थापनांनी लक्षात घेऊन उत्पादनांची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे उचित ठरेल !