पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा रविवार, वैशाख कृष्ण पक्ष एकादशी (६ जून २०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया !
‘माझा साधनेचा आरंभ पुण्यातून झाला. साधनेच्या प्रवासात प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी मला आध्यात्मिक मैत्रीण म्हणून लाभल्या. परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने मला अनेक साधकांचे प्रेम लाभले. २०.५.२०१८ या दिवशी मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आले.
पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. बालपण
१ अ. भावंडांत मोठी असल्याने आई पहाटे काकडआरतीला जात असतांना ‘तू अंघोळ करून शेगडीवरचा कुकर उतरव आणि मंदिरात नैवेद्य आणून दे’, असे सांगत असल्याने देवाची ओढ लागणे : माझा जन्म पुण्यात तुळशीबागेतील रामाच्या मंदिराजवळ मेहुणपुरा येथील इनामदार, परचुरे यांच्या पेशवेकालीन वाड्यात झाला. आईला देवाची आवड होती. या वाड्यात विष्णुमंदिर होते. आई पहाटे काकडआरतीला जात असे. मी भावंडांत मोठी असल्याने ती मंदिरात जातांना मला उठवत असे. ती मला सांगत असे, ‘‘तू अंघोळ करून शेगडीवरचा कुकर उतरव आणि मंदिरात नैवेद्य आणून दे.’’ त्यामुळे मला देवाची आवड निर्माण झाली.
१ आ. आईला घरकामात साहाय्य करणे आणि देवाशी बोलायची सवय लागणे : मी लहान भावंडांना सांभाळत असे आणि आईला घरकामांत साहाय्य करत असे. आई भावंडांना शिस्त लागण्यासाठी मारत असल्यास मला पुष्कळ रडू येत असे. आई-बाबांचे भांडण झाल्यास मला भीती वाटायची. तेव्हा मी देवापुढे साखर ठेवून ‘आमच्या घरात भांडण होऊ देऊ नको’, असे त्याला सांगत असे. तेव्हापासून मला देवाशी बोलायची सवय लागली.
१ इ. वडिलांची लाडकी असल्याने घरात काही सणवार किंवा कार्यक्रम असल्यास त्यांनी त्याचे नियोजन करण्यास सांगणे : माझा बराच वेळ घरकामात जात असे. मी कधी कामचुकारपणा केला नाही. मी कुणालाच उलट बोलले नाही. मी वडिलांची लाडकी होते. घरात काही सणवार किंवा कार्यक्रम असल्यास ते मलाच नियोजन करायला सांगत.
२. शैक्षणिक जीवन
२ अ. वेगवेगळ्या शाळांत प्रवेश घेऊन अकरावीपर्यंतचे शिक्षण घेणे : आमच्या घराजवळच मुलींची म्युनिसिपल शाळा होती. मी सातव्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला. मी ‘व्हर्नाक्युलर फायनल’ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ‘अहिल्यादेवी हायस्कूल’ येथे माझे आठव्या इयत्तेचे शिक्षण झाले. मला चांगले गुण मिळाले; म्हणून काकाने मला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत आत्यांच्या मुलींच्या समवेत प्रवेश मिळवून दिला. मलाही नादार (पैसे न भरता गुणवत्तेवर प्रवेश मिळणे) म्हणून प्रवेश मिळाला. तेथे माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले; पण नंतर माझी प्रकृती (पोट) बिघडू लागल्याने आईने मला तिथे पाठवले नाही. मी कन्या शाळेत अकरावीचे शिक्षण घेतले. त्यात मी ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
२ आ. घरी अभ्यास करून बाहेरून ‘प्रि-डिग्री आर्ट्स’ची परीक्षा देणे : नंतर मी हिंदीची तिसरी परीक्षा दिली. माझा भाऊ मॅट्रीक झाल्यावर आम्ही दोघांनी बाहेरून ‘महाजन क्लासेस’मध्ये शिकवणीवर्गाला जाऊन ‘प्रि-डिग्री आर्ट्स’ची परीक्षा दिली.
३. कौटुंबिक जीवन
३ अ. यजमान भावंडांत मोठे असल्याने त्यांच्यावर घराचे दायित्व येणे : वर्ष १९६० मध्ये माझे लग्न झाले. यजमान माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठे होते. ते पोस्टात कारकून म्हणून नोकरी करत होते. विवाहानंतर पहिली १५ वर्षे आम्ही एकत्र कुटुंबात (सासूबाई, दीर, नणंदा, एक लग्न झालेली नणंद) राहिलोे. घरची गरिबी होती. यजमानांवर घरचे सर्व दायित्व होते. दीर (यजमांनाचा पाठचा भाऊ) मॅट्रीकला होता. तो लोकांच्या घरी जाऊन दूध देत असे. धाकटा दीर आठव्या इयत्तेत शिकत होता. तो लोकांच्या घरी जाऊन वर्तमानपत्रे देत असे. नणंदेचा मुलगा १ मासाचा होता. त्या आमच्याकडेच रहात होत्या. आम्हाला जागा अल्प पडत असूनही आम्ही सर्व जण प्रेमाने रहात होतो. मी दायित्व घेऊन सर्वांचे पहात होते.
३ आ. सासूबाई कारखान्यात कामाला जात असल्याने स्वयंपाक करणे आणि घरातील आवरणे : सासूबाई सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत एका कारखान्यात (आकडे, बूच, स्पेअरपार्ट्स बनवणे यासाठी) काम करायला जात असत. मी स्वयंपाक आणि अन्य आवराआवर करत असे. त्यामुळे त्यांना पुष्कळ बरे वाटले. सासूबाईंचे आई-वडील संध्याकाळी मुरलीधराच्या देवळात येत. त्या म्हणत ‘‘तूच पूजा कर. मी तुला मानसपूजा शिकवते.’’
३ इ. घरातील कामे करून दुपारी प्रि-डिग्रीचा अभ्यास करणे : तेव्हापासून मी प्रतिदिन पूजा करत असे. सकाळी मी सर्वांना डबे करून देत असे. घरातील कामे करून मी दुपारी प्रि-डिग्रीचा अभ्यास केला; पण मला परीक्षेला बसता आले नाही.
३ ई. वेगळे बिर्हाड केल्यावर नोकरी करणे आणि मुलांची शिक्षणात चांगली प्रगती होत असणे : मला पहिला मुलगा झाल्यावर तो २४ घंट्यांत गेला. आमच्या लग्नानंतर १५ वर्षांनी आम्हाला पुण्यातील प्रभात रोडवर भाड्याने १ खोली मिळाली. तिथे आम्ही वेगळे बिर्हाड केले. तेव्हा मला लकडीपूल विठ्ठल मंदिराच्या देवळातील ‘माँटेसरी’ शाळेत नोकरी मिळाली. त्या वेळी आमची मोठी मुलगी दहाव्या इयत्तेत आणि दुसरी मुलगी पाचव्या इयत्तेत शिकत होती. मी मुलाला माझ्या समवेत शाळेत घेऊन जात असे. मुलांची शिक्षणात चांगली प्रगती होती. त्यानंतर मी ‘माँटेसरी’ची परीक्षा पत्राद्वारे उत्तीर्ण झाले. नंतर मी दासबोधाचा अभ्यास केला आणि ३ परीक्षा दिल्या. दोन्ही मुलींची लग्ने, मुलाची मुंज सर्व त्या खोलीत उत्तम प्रकारे पार पडले.
४. साधना
अ. वर्ष १९९५ मध्ये मी वयाच्या ५५ व्या वर्षी सत्संगात आले. त्यापूर्वी माझी शेगावचे श्री गजानन महाराज यांच्यावर श्रद्धा होती.
आ. मी व्यंकटेश स्तोत्र आणि प.पू. गजानन महाराज यांच्या पोथीचे पारायण करत असे. मी प्रतिदिन विठ्ठलाचे दर्शन घेत असे. श्रीमती गद्रेआजी आमच्या वरच्या माळ्यावर रहात होत्या. त्यांच्या सहवासाने मी ‘ॐ राम कृष्ण हरि ।’ हा नामजप करत असे. त्या भजन, कीर्तन आणि ज्ञानेश्वरी वाचन करत. मीसुद्धा ज्ञानेश्वरी वाचत असे.
इ. मी घरातील सर्व कुलाचार व्यवस्थित करत होते.
५. सनातन संस्थेशी संपर्क
५ अ. राममंदिरासमोरील सत्संगाचा फलक वाचून सत्संगाला जाणे आणि सत्संगातील विषय आवडल्याने सत्संगाला नियमित जाऊ लागणे : एकदा मी पाषाण गावात आणि नंतर सदाशिव पेठेत दूध आणायला गेले असतांना मी राममंदिरासमोर लावलेला ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’च्या सत्संगाचा फलक वाचला. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून मी ७ वाजता सत्संगाला गेले. तेथे डॉ. नरेंद्र दाते आणि श्री. प्रशांत फणसळकर घेत असलेला सत्संग ऐकून मला पुष्कळ बरे वाटले. ‘मला जे हवे होते, ते हेच’, असे मला जाणवून मी प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहात असे.
५ आ. सांगली येथील गुरुपौर्णिमा उत्सवाला जाऊन आल्यानंतर स्थिरता लाभणे : मी सत्संगात जाऊ लागल्यानंतर ३ मासांनी (वर्ष १९९५ मध्ये) सांगलीला गुुरुपौर्णिमा उत्सव होता. त्यासाठी मी सत्संगातील ७ – ८ साधकांकडून अर्पण जमा करून सौ. ज्योती दाते यांना दिले. तेव्हा माझी दाते कुटुंबाशी ओळख झाली. या उत्सवात मला सेवाभावासह अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला जाऊन आल्यावर माझे मन पुष्कळ स्थिर झाले.
५ इ. मला प.पू. भक्तराज महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्यासारखे वाटत. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे सर्वांप्रतीचे प्रेम पाहून मी भारावून गेले.
५ ई. घरी रहायला आलेल्या अवचट कुटुंबियांमुळे ग्रंथ वाचनाची गोडी लागणे : आमचा संसार पूर्ण झाला होता. मी घरी राहून नामजप आणि खाऊची सेवा करू लागले. मला मधून मधून पित्ताचा आणि खोकल्याचा त्रास होत असे. परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना मला अधिक खोकला येत असे. आमच्याकडे रहायला आलेल्या अवचट कुटुंबियांमुळे पुढे ६ वर्षे मला ज्ञानेश्वरी, दासबोध, नारद भक्तिसार, हरिपाठ, भागवत आदी ग्रंथांच्या वाचनाची गोडी लागली. जणू ‘त्यांना परात्पर गुरुदेवांनीच पाठवले’, असे मला वाटले. अवचट कुटुंबियांमुळे मला ‘मी कोण ? आत्मा म्हणजे काय ?’ यांचे ज्ञान झाले. मी विठ्ठल मंदिरात कीर्तन ऐकायला आणि पहाटे काकडआरतीला जात असे. मी नामजप करत होते आणि सतत साधकांच्या संपर्कात होते.
५ उ. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने शांत रहाता येणे आणि लांबून सत्संगाला येणे : खरेतर स्वतःचे घर नसल्याने मी थोडी अडचणीत होते, तरी मन शांत ठेवून सर्व सोसण्याची शक्ती परात्पर गुरुदेवांनी दिली. आम्ही मुलाच्या मित्राच्या जागेत रहायला आलो. मी लोकमान्य नगर येथून सत्संगाला येत असे.
५ ऊ. श्रीमती विमलताई फडके यांच्याशी (आताच्या प.पू. (श्रीमती) फडकेआजी यांच्याशी) भेट होणे
५ ऊ १. जिवाभावाची आध्यात्मिक मैत्रीण लाभणे : मुंबईहून आलेल्या श्रीमती विमलताई फडके (आताच्या प.पू. फडकेआजी) या एक दिवस सत्संगाला आल्या. त्यांच्याशी झालेली भेट ही एक दिव्य अनुभूती होती. ‘हरवलेल्या व्यक्तीला वाट सापडावी’, तशी माझी स्थिती झाली. त्यांनी मला पुष्कळ आधार आला. आम्ही दोघी मिळून सेवा करू लागलो. त्या मला आणि यजमानांना जवळच्या वाटत. मला त्या नेहमी धीर देत. त्या मला ‘तुम्ही सत्संग घेऊ शकता’, असे म्हणत आणि मला घरी रहायला बोलावत. आम्ही दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी झालो.
५ ऊ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झालेली भेट ! : एकदा त्यांनी मला परात्पर गुरु डॉ. आठवले येणार आहेत, म्हणून सिद्धता करायला बोलावले. मी दोन दिवस आधी २ किलो चिवडा आणि नारळाच्या वड्या केल्या. मुलाने दोन मोठे हार आणले. हे सर्व घेऊन मी रिक्शाने ११ वाजता विमलताईंकडे गेले. आम्ही घर आवरून रांगोळी काढली आणि फळे चिरून ठेवली. परात्पर गुरुदेव, सौ. कुंदाताई आणि १० ते १२ साधक आले. विमलताईंनी परात्पर गुरुदेवांना आसन देऊन त्यांचे स्वागत केले. सर्वांना अल्पाहार दिला. विमलताईंनी परात्पर गुरु डॉक्टरांना कुंकुमतिलक आणि सौ. कुंदाताईंना हळद-कुंकू लावले. त्यांनी दोघांना हार घालून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. आम्हीही त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. तेव्हा चांगले वाटले.
परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘मराठेआजींना नारळाच्या वड्या करायला सांगत जा.’’ त्यांनी असे म्हटल्यावर मला पुष्कळ बरे वाटले.
५ ऊ ३. प.पू. (श्रीमती) फडकेआजी यांच्या सत्संगामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी होणे : विमलताई पनवेलला जाण्यापूर्वी माझ्याकडे २ दिवस रहायला आल्या. आम्ही रात्री पुष्कळ गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आता मी पनवेलला गेले की, परत पुण्यात येणार नाही.’’ मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. मला आत्मविश्वास वाटू लागला आणि माझ्या परात्पर गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी झाली.
५ ए. सेवेतील आनंद घेणे
१. आरंभी मी पत्रके वाटणे, गुरुपौर्णिमेसाठी अर्पण गोळा करणे, प्रसार सेवा, भित्तीपत्रके लावणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, या सेवा करत होते. मी घरून पोळ्या करून देणे, आषाढी एकादशीला फराळाचे पदार्थ करून देणे इत्यादी सेवा करायचे. मी घरोघरी जाऊन सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करत असे.
२. नंतर मी समष्टीसाठी नामजप करणे, नामदिंडीसंबंधी सेवा करणे, हिशोब ठेवणे, या सेवाही करत होते.
३. वारकर्यांच्या दिंडीत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना मला पुष्कळ शिकायला मिळाले.
४. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना लोक मला पाहून दार लावून घेत. त्या वेळी ‘मी परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत. निराश न होता पुढे जायचे’, असा विचार करत असे. मी परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असे, ‘त्यांच्या प्रारब्धात नाही; म्हणून ते दार लावून घेतात.’
५. एकदा मला थोडे बरे वाटत नव्हते. तेव्हा मला सेवेसाठी दूरभाष आला. मी त्यांना सांगितले, ‘‘मला बरे नाही.’’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘मी चुकले. परात्पर गुरुदेवांनी मला चैतन्य मिळण्यासाठीच सेवा दिली असेल.’ नंतर मी ‘सेवा करीन’, असे कळवले. तेव्हा ती सेवा अन्य साधकाला दिली असल्याचे मला समजले. तेव्हा मला पुुष्कळ वाईट वाटले. मग मी ठरवले, ‘आता कुठलीही सेवा करायची. ‘नाही’ हा शब्द काढून टाकायचा आणि सकारात्मक रहायचे.’
६. नंतर सिंहगड रोड येथील गणपति मंदिरात सत्संग चालू झाला. मला सत्संगाला जाणे-येणे जमत नसे. शस्त्रकर्म झाल्यामुळे मी अशक्त झाले होते. घरी राहून सत्संग घेणे, बालसंस्कारवर्ग घेणे, अशा सेवा मी करत असे.
५ ऐ. जाणवलेले पालट
१. साधक भेटल्यावर मला माझे कुणीतरी जवळचे भेटल्याचा आनंद होत होता. ‘प्रत्येक साधक म्हणजे परम पूज्यांचे रूप आहे’, असे मला वाटत असे.
२. मी सत्संगात जात असतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची सारणी लिहीत होते. त्यामुळे लहान-सहान चुका, उदा. कंगव्यात केस रहाणे, दूध उतू जाणे, स्वयंपाकघरातील साहित्य खराब होईपर्यंत लक्ष न देणे, या चुका मला सुधारता आल्या.
३. मला साधकांना त्यांच्या चुका प्रेमाने सांगता येऊ लागल्या.
४. मी यजमानांची सेवा ‘देवाचीच सेवा करत आहे’, या भावाने केली. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना सतत प्रार्थना करत असे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होत असे.
५ ओ. आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित होणे
५ ओ १. साधकांनी घरी येऊन सोहळा करणे : एका गुरुपौर्णिमेला सौ. मनीषा पाठक हिने मला सौ. राजश्री खोल्लम यांची भेट घेण्यास सांगितले. मी त्यांच्याशी बोलल्यावर मला पुष्कळ बरे वाटले. त्यानंतर एक दिवस त्या काही साधकांना घरी घेऊन आल्या. त्यांनी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे सांगून माझा सत्कार केला. त्या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टरांशी भ्रमणभाषवरून बोलले. मी सद्गुरु अनुताईंशीही (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी) बोलले. मी म्हणाले, ‘‘माझी सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी रुजू झाली आणि मी त्यांची शिष्य झाले. यासाठी मी त्यांची ऋणी आहे. आज मला ‘माझ्या जन्माचे सार्थक झाले’, असे वाटते.’’ मला भक्तीचा, गुरुकृपायोगाचा मार्ग दाखवल्याविषयी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
५ ओ २. सोहळा चालू असतांना घरात दैवी कण आढळणे, सोहळा पाहून मुलाला आनंद होऊन त्याची भावजागृती होणे : सोहळ्याच्या वेळी घरात दैवी कण आढळले. या वेळी माझा मुलगा उपस्थित होता. त्याला सोहळा पाहून पुष्कळ आश्चर्य वाटले आणि त्याचीही भावजागृती झाली. यजमानांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. हे सर्व मला अनपेक्षित होते. मी भावविभोर होऊन बघत होते.
५ औ. रामनाथी आश्रमात जाणे
५ औ १. रेल्वेतून उतरण्यापासून, आश्रमात नेणे-आणणे इत्यादी सर्व व्यवस्था साधकांनी करणे अन् आश्रम पाहून मुलाला आश्चर्य वाटणे : एकदा दिवाळीनंतर आम्ही (मी, माझे यजमान आणि मुलगा) रामनाथी आश्रमात गेलो. तेथे आम्ही ३ दिवस राहिलो. साधकांनी आमची रेल्वेतून उतरण्यापासून, आश्रमात नेणे-आणणे इत्यादी सर्व व्यवस्था केली. आश्रम, तेथील स्वच्छता आणि सुविधा पाहून मुलाला आश्चर्य वाटले.
५ औ २. परात्पर गुरुदेवांचा लाभलेला सत्संग !
५ औ २ अ. परात्पर गुरुदेवांकडे पहातच रहाणे : दुसर्या दिवशी आम्हाला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यांना इतक्या वर्षांनी पाहून माझ्या मुखातून ‘‘वा ! तात्काळ दर्शन. अगदी आहात, तसेच आहात’’, असे उत्स्फूर्त उद्गार निघाले. मी बघतच राहिले. ते म्हणाले, ‘‘इकडे या.’’ मी आज्ञापालन म्हणून त्यांच्या शेजारी उभी राहिले. त्यांनी सर्वांना विचारले, ‘‘तुम्हाला यांच्याकडे बघून काय वाटते ?’’ तेव्हा सर्वांनी सांगितले, ‘‘चांगले वाटते. आनंद होतो.’’ नंतर मी जागेवर येऊन बसले.
५ औ २ आ. परात्पर गुरुदेव बोलतांना साधकांना चैतन्य मिळणे : परात्पर गुरुदेव बोलतांना साधकांना चैतन्य मिळत होते. मी त्यांना ‘पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही काही करू नका. तुम्ही संत आहातच.’’
५ औ २ इ. परात्पर गुरुदेवांना भेटल्यावर देव भेटल्याचा आनंद होणे : परात्पर गुरुदेवांना भेटल्यावर मला देव भेटल्याचा आनंद झाला. ‘देव पहायला गेलो आणि देवची होऊन गेलो’, याची मला अनुभूती आली. त्यांच्या सत्संगात मला ‘गुरुकृपायोग’ ही मनाची साधना आहे. मन शुद्ध करण्यासाठी अखंड नाम चालू झाले की, आपण कुणी नसतोच. सर्वकाही परात्पर गुरुदेवच करून घेतात’, हे शिकायला मिळाले.
५ औ ३. आश्रम पहातांना पिशवीवर दैवी कण आढळणे : साधकांनी यजमानांना चाकाच्या आसंदीवर बसवून आश्रम दाखवला. तेव्हा यजमानांची भावजागृती झाली. माझ्या पिशवीवर दैवी कण आढळले.
५ औ ४. परात्पर गुरुदेवांच्या सत्संगानंतर प्रत्येक व्यक्तीविषयी प्रेम वाटू लागणे : परात्पर गुरुदेवांच्या सत्संगानंतर मला प्रत्येक व्यक्तीविषयी प्रेम वाटू लागले. ‘हे जग म्हणजे जणू देवाने खेळायला दिलेला एक पट आहे. माणसे येतात आणि जातात. काही घेऊन जातात, काही देऊन जातात (अनुभवाच्या संदर्भात). आपण स्थिर रहायचे. सर्व काही करणारे परात्पर गुरुदेव आहेत’, हे मला उलगडले.
५ औ ५. त्यानंतर माझ्या यजमानांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित झाले.
६. यजमानांचे आजारपण
६ अ. ‘देवाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवून यजमानांची सेवा करणे : काही दिवसांनी यजमानांना अशक्तपणा आणि खोकला यांमुळे त्रास होऊ लागला. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे मी ‘देवाचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवून यजमानांना अंघोळ घालण्यापासून सर्व सेवा केली.
६ आ. यजमानांच्या निधनानंतर स्थिर राहू शकणे आणि घरात चैतन्य जाणवणे : गणेशोत्सवाच्या काळात यजमानांचे निधन झाले. तेव्हा मी स्थिर राहू शकले. त्या वेळीही मला घरात चैतन्य जाणवत होते. मला आतून शांत आणि तृप्त झाल्यासारखे वाटत होते. ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत. ते मला धीर देत आहेत’, असे मला जाणवले. मी मुलाकडेच राहिलेे. मी प्रतिदिन परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलत असे.
७. देवद आश्रमातील वास्तव्य
७ अ. देवद आश्रमात आल्यावर ‘घरी आले आहे’, असे वाटणे : २०.५.२०१८ या दिवशी मी देवद आश्रमात रहायला आले. येथे मला माझ्या घरी आल्यासारखे वाटले. परात्पर गुरुदेवांच्या आश्रमासारखे दुसरे घर असूच शकत नाही. माझी साधकांशी हळूहळू ओळख होत आहे. मला साधकांमध्ये प्रेमभाव आणि आपुलकी जाणवली. माझ्या समवेत पू. रमेश गडकरी यांच्या आई रहातात. मला त्यांच्याकडून आश्रम जीवनाशी निगडित सूत्रे समजतात. त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळते. आमची छान मैत्री झाली आहे.
७ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून नामजप करतांना ध्यान लागणे : एके दिवशी सकाळी अल्पाहार झाल्यावर मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून नामजप करत होतेे. तेव्हा कुणीतरी माझ्या पायाखाली स्टूल ठेवले. त्यानंतर माझे ध्यान लागले. तेव्हा मला प.पू. बाबांच्या पादुका दिसल्या. मी नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला.
७ इ. प्रेमाने काळजी घेणारे साधक : येथे आल्यावर अनेक साधकांशी माझी ओळख झाली. कु. काजल हाबळे अतिशय लाघवी आणि प्रेमळ आहे. ती माझी काळजी घेते. ती सर्व सेवा मनापासून करते. मला थोडासा खोकला झाला, तरी ती लगेच ‘औषध घ्या. दोन दिवस आंबिल घेऊ नका’, असे सांगते. ‘तिची सेवा म्हणजे हनुमंताची भक्तीच आहे’, असे मला वाटते.
७ ई. सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. नेनेआजी आणि पू. सत्यवती दळवी यांच्याशीही माझी ओळख झाली. परात्पर गुरुदेव मला जणू विश्वदर्शनच घडवत होते.
७ उ. सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणे : मी हळूहळू खोलीतून बाहेर येऊन सेवा करायला लागले. परात्पर गुरुदेव मला हळूहळू घडवत आहेत. माझ्याकडून चूक झाल्यास मी क्षमा मागून प्रार्थना करतेे. मला प्रसन्न, आनंदी आणि शांत वाटते.
७ ऊ. स्वप्नात शुभसंकेत मिळणे : एकदा रात्री मला स्वप्नात दिसले, ‘मी आवळ्याच्या बागेत फिरत आहेे. तेथे थोडी भूमी खणलेली होती. तेथे सापडलेले ४ – ५ आवळे मी रखवालदाराला दिले. तो मला म्हणाला, ‘‘आजी, तुम्हाला घ्या.’’ मी त्याला म्हणाले, ‘‘मला एकटीला एवढे काय करायचे ? मला एक दे.’’ मी तेथे प्रतिदिन जात होते. एक दिवस मला त्या ठिकाणी तोरण मिळाले. दुसर्या दिवशी मला गणपतीचे पदक मिळाले.’ या ‘स्वप्नांचा अर्थ काय ?’, असे मी सर्वांना विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘काही शुभसंकेत मिळाले आहेत.’’ हे ऐकून मला पुष्कळ बरे वाटले.
७ ए. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाल्यावर ‘कृष्ण भेटला’, असे वाटणे : एकदा माझी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाली. तेव्हा मला जणू कृष्ण भेटल्याचा आनंद झाला. मी त्यांना नमस्कार करून सर्व सांगितले. मी त्यांना ‘इथेच रहाणार’, असेही सांगितले.
देवद आश्रमात आल्यापासून ‘परात्पर गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली मी किती सुखरूप आहे’, याची मला अनुभूती आली.
८. अनुभूती
८ अ. शस्त्रकर्म करायचे ठरले असतांना नामजप करतांना डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टर दिसणे : वर्ष १९९६ मध्ये मला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याच्या उपचारार्थ वर्ष १९९७ मध्ये शस्त्रकर्म ठरले. (त्यानंतर कर्करोग पूर्ण बरा झाला.) तेव्हा विमलताईंनी परात्पर गुरुदेवांना दूरभाष करून विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘नामजप करा.’’ मला नामजप करतांना सतत डोळ्यांसमोर परात्पर गुरुदेव, विमलताई आणि सौ. ज्योती दाते दिसत. त्यानंतर ५ मास मी केवळ नामजप करत होते.
८ आ. शस्त्रकर्माच्या वेळी परात्पर गुरुदेवांनीच वाचवणे : वर्ष १९९७ मध्ये आम्हाला आमचे सिंहगडचे घर मिळाले. त्यानंतर ६ मासांतच माझे कर्करोगाचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा परात्पर गुरुदेवांनीच मला वाचवले. त्यानंतर ‘आता केवळ साधनाच करायची’, असे ठरवले. त्या वेळी मी अशक्तपणामुळे कुठे सत्संगाला जाऊ शकत नव्हते. त्यानंतर ४ मासांनी मी सत्संगाला जाऊ लागले.
८ इ. एकदा मला आकाशात एक तेजस्वी तारा दिसला. पहाटे मला दिसले, ‘परात्पर गुरुदेव एक तेजःपुंज तारा आहेत.’
८ ई. नामजप करतांना आणि स्वप्नात भिंतीवर श्री दुर्गादेवीचे दर्शन होणे : एकदा मी श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना मला भिंतीवर तिचे चित्र दिसले. मी साधकांना विचारले, ‘‘तुम्हाला तिथे दुर्गादेवीचे चित्र दिसते का ?’’ त्यानंतर दोन दिवसांनी मला स्वप्नात दिसले, ‘पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आणि हिरव्या रंगाचे पोलके घातलेली स्त्री मला बोलावत आहे. मी पायर्या चढून गेले.’ नंतर मी जागी झाले.
८ उ. साधकाकडे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले असतांना ध्यान लागून गणपतीचे स्वयंभू रूप दिसणे : एकदा आम्ही एका साधकाकडे संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. मी गणपतीला ८ प्रदक्षिणा घालून दर्शन घेऊन भिंतीला टेकून बसले. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा माझे ध्यान लागले. मला ध्यानात दिसले, ‘स्वच्छ सूर्यप्रकाश अंगावर येत आहे.’ गणपतीचे स्वयंभू रूप आणि त्याच्याकडून येणारा पिवळा प्रकाश यांनी माझे भान हरपून गेले. मला पुष्कळ आनंद होत होता. इतक्यात साधिकेने मला हळदी-कुंकू लावले आणि मला जाग आली.
मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘मला कधी दूर लोटू नका’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– (पू.) श्रीमती प्रभा व्यंकटेश मराठे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०१८)
|