श्रीलंकेत उभारलेल्या फलकांवर तमिळची जागा घेत आहे चिनी भाषा !
‘चीनला दिली ओसरी, चीन हातपाय पसरी’, असेच यातून स्पष्ट होते ! आज तमिळ भाषा हटवणारा चीन उद्या संपूर्ण श्रीलंकेला स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यास आश्चर्य वाटू नये !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका सरकारच्या प्रकल्पांविषयी प्रदर्शित होत आलेल्या फलकांवर नेहमीप्रमाणे इंग्रजी, सिंहली आणि तमिळ या ३ भाषांचा समावेश असतो; मात्र आता चिनी भाषेने तमिळ भाषेला वगळून तिची जागा घेतल्याच्या २ घटना निदर्शनास आल्याने श्रीलंकेमध्ये मोठा वाद चालू झाला आहे. ‘चिनी लोक श्रीलंकेवर त्यांचे सांस्कृतिक वर्चस्व लादू पाहत आहेत का ?’, अशी चर्चा चालू आहे.
Sri Lanka in major language controversy as Mandarin replaces Tamil on signages https://t.co/tgSAqkhXIY
— HinduPost (@hindupost) June 2, 2021
१. या आठवड्यात चीनने श्रीलंकेचे महाधिवक्ता डप्पूला डे लिव्हेरा यांच्या कार्यालयाला स्मार्ट ग्रंथालय भेट दिले. ग्रंथालयाचे प्रकाशन करतांना सिंहली, इंग्रजी आणि चिनी भाषेत लिहिलेल्या एका फलकाचे अनावरण करण्यात आलेे. या फलकावर तमिळचा समावेश नव्हता. यावरून वाद निर्माण झाला. चिनी भाषेचा वापर श्रीलंकेच्या अधिकृत त्रैभाषिक धोरणाविरुद्ध आहे. या टीकेमुळे हा फलक नंतर काढून टाकण्यात आला.
२. यावर स्पष्टीकरण देतांना चिनी दूतावासाने ट्वीट केले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही श्रीलंकेतील तिन्ही अधिकृत भाषांचा आदर करतो आणि चीनच्या आस्थापनांना त्यांचे अनुसरण करण्यास उद्युक्त करतो.
३. गेल्याच आठवड्यात चीनकडून उभारण्यात येणार्या कोलंबो पोर्ट सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘सेंट्रल पार्क’मध्ये तमिळी भाषेची जागा चिनी भाषेने घेतली होती. सामाजिक माध्यमांवर ही बातमी प्रसारित झाल्यानंतर कोलंबो पोर्ट सिटीकडून निवेदन जारी करण्यात आले की, हे चित्र जुन्या फलकाचे आहे.
४. ‘तमिळ नॅशनल अलायन्स’चे (‘टीएन्ए’चे) खासदार शनाकियान रसमनिकम म्हणाले की, श्रीलंकेत फलक काय ठेवावे, हे चीनच ठरवत आहे. त्यामुळे श्रीलंका आता ‘ची-लंका’ झाली आहे.
५. अनेक प्रभावशाली बौद्ध भिक्खूंनीही साम्यवादी चीनचे ‘कोलंबो पोर्ट सिटी’वर वाढत चाललेल्या नियंत्रणाचा विरोध केला आहे.