प्रेमभाव, त्याग आणि भक्तीभाव यांचा अपूर्व संगम असलेल्या पू. निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) !
‘वैशाख कृष्ण पक्ष दशमी या दिवशी ८९ व्या वर्षात पदार्पण करतांना पू. दातेआजी भूलोकातील वैकुंठात पवित्र, पावन अशा सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमात आहेत’, या विचाराने पुष्कळ आनंद होऊन माझा भाव जागृत होत आहे. ‘पू. आजींची परात्पर गुरुदेवांप्रती असलेली दृढ श्रद्धा आणि भक्तीभाव यांमुळेच हा सुवर्णयोग आला आहे’, असे वाटते. पू. आजींनी आयुष्यभर केलेले कष्ट, संकटांना खंबीरपणे दिलेला लढा आणि केलेला संघर्ष हे आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला समजायला लागले आणि त्यातून पुष्कळ शिकता आले. ती सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सदाचरणाचे धडे कृतीतून शिकवणे
‘आपल्याशी कुणीही कसेही वागूदे, आपण मनात काहीही न आणता त्यांच्याशी चांगलेच वागले पाहिजे. आपण पेरत जायचे, चांगले उगवल्याविना रहाणार नाही’, असे पू. आजी नेहमी सांगत असतात. प्रत्येकाला आपल्या जवळचे सर्वांत उत्तम असेल, तेच द्यावे. आपले वागणे असे असले पाहिजे की, त्या व्यक्तीला आपल्याकडे परत यावेसे वाटेल. अशा अनेक गोष्टी पू. आजींनी केवळ सांगितल्या नाही, तर आम्हाला कृतीतून शिकवल्या.
२. कुठल्याही स्थितीत समाधानी आणि आनंदी असणे
पू. आजी साधारण ३३ वर्षे वाड्यातील दोन खोल्यांच्या घरात रहात होत्या. तेथे त्या सर्वकाही आनंदाने करत होत्या. तिथेच त्यांच्याकडून ‘शेजारधर्म म्हणजे काय ? एकोप्याने कसे रहावे ?’, हे शिकायला मिळाले. पू. आजींनी दूरदर्शीपणे आपले दागिने विकून वर्ष १९६१ मध्ये प्लॉट घेतला; परंतु अनेक वर्षे त्यावर घर बांधता आले नाही; कारण तेवढे आर्थिक बळ नव्हते. देवाच्या कृपेने वर्ष १९८६ मध्ये तेथे घर बांधता आले.
३. प्रथमपासून मुले आणि सुना यांना पूर्ण वेळ साधना करता यावी; म्हणून घराचे पूर्ण दायित्व घेणे
वर्ष १९९४ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली सनातनच्या माध्यमातून साधनेचा आरंभ झाला. सेवेच्या निमित्ताने साधक घरी येऊ लागले. त्यामुळे साधकांचा अखंड सहवास मिळू लागला, तसेच अनेक संतांच्या चरणस्पर्शाने आणि अस्तित्वाने वास्तूतील मांगल्य वाढत होते. त्यामुळे वास्तू पावन झाली. परात्पर गुरुदेवांच्या आगमनाने, तर वास्तू चैतन्याने भारित होत होती. त्यांच्या कृपेने घरी पंचमुखी हनुमानकवच यज्ञही संपन्न झाला.
पू. आजींची पुण्यातील वास्तू म्हणजे पुण्यातील सनातनचे सेवाकेंद्र झाले. पू. आजी या सेवाकेंद्राचा आधारस्तंभ होत्या. प्रथमपासूनच मुले आणि सुना यांना पूर्ण वेळ साधना करता यावी; म्हणून घराचे पूर्ण दायित्व पू. आजींनी घेतले. आश्रमात येणार्या प्रत्येक साधकाची प्रेमाने विचारपूस करणे, त्याच्या घरातील व्यक्तींची चौकशी करणे, त्याला आग्रहाने खाऊ देणे, हे सर्व पू. आजी सहजतेने करीत.
४. घराचा त्याग करून आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणे
रामनाथी येथे जातांना स्वकष्टाने उभारलेल्या या वास्तूला या वळणावर सोडून जाणे पू. आजींनी या वयातही स्थिरतेने स्वीकारले. घरातील सामान हालवतांनाही त्या अतिशय शांत आणि स्थिर होत्या. सामान भरण्यासाठी आलेल्या साधकांचे चहा, सरबत आणि अल्पाहाराचे नियोजनही त्यांनी केले. पू. आजींमध्ये परात्पर गुरुदेवांप्रती असणारी दृढ श्रद्धा आणि भक्तीभाव यांमुळे सर्वकाही सहजतेने घडत गेले. पू. आजी माया, ममतेतून अलगदपणे बाहेर पडल्या.
५. पू. आजी जीवनात कृतार्थ झाल्या ।
किती दशके सरली, काळ किती गेला ।
अविरत परिश्रम आणि बहुत संघर्ष केला ।
कोंड्याचा मांडा करूनी संसार उभा केला ।। १ ।।
देह झिजवला दुसर्यांसाठी ।
स्वतःचा विचार नाही शिवला ।।
काळ सरताच सनातनचे द्वार झाले खुले ।। २ ।।
अखंड नामजप, सेवा साधनेत दिवस सरती पुढे ।
याचस्तव पू. आजी संतपदी पोचल्या ।
आणि पू. आजी जीवनात कृतार्थ झाल्या ।। ३ ।।
– श्रीमती अनुराधा पेंडसे (पू. दातेआजी यांची मुलगी), पुणे. (१६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |