सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !
कै. उषा पवार यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात देवाने त्यांना केलेले साहाय्य यांविषयी त्यांचा मुलगा श्री. विशाल पवार यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
३ जून या दिवशी आपण श्री. विशाल यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
३ जून ला प्रकाशित झालेला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/483173.html
३. मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे
३ अ. शस्त्रक्रिया अवघड असूनही यशस्वी झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि काही घंट्यांनी आई शुद्धीवर येणे : २३.८.२०१३ या दिवशी आईची शस्त्रक्रिया झाली. आधुनिक वैद्य आणि त्यांचे ६ – ७ सहकारी यांनी मिळून शस्त्रक्रिया केली होती. त्या वेळी वैद्यांनी सांगितले, ‘‘यांची शस्त्रक्रिया म्हणजे अग्नीपरीक्षा होती; परंतु ती यशस्वी झाली.’’ आई ४८ घंट्यांनी शुद्धीवर आली आणि आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली; पण ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने ते शक्य होत नव्हते. ती हाताने लिहिण्याचा प्रयत्न करू लागली; परंतु तिच्या हातात शक्ती नव्हती. मी तिला ‘आपण काही वेळाने बोलू’, असे सांगून शांत केले. तिनेही त्यास होकार दिला आणि शांत झाली.
३ आ. शरिरावरचे नियंत्रण जाऊन रक्त पालटण्याची प्रक्रिया चालू होणे आणि त्या परिस्थितीत स्थिर रहाता येण्यासाठी देवाला प्रार्थना करणे : ३० मिनिटांनी आईला झटके येऊ लागले आणि तिचे शरिरावरचे नियंत्रण सुटले. तिच्या डोळ्यांची सतत उघडझाप चालू होती. त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. त्या वेळी वैद्यांनी तिच्या डोळ्यांवर पट्ट्या ठेवून ते बंद करण्याचा प्रयत्न केला. काही घंट्यांनी तिचे शरीर गळून गेले. तिला सतत रक्त देणे चालू होते. ते रक्त शरिरात जाऊन पुन्हा बाहेर (‘पास’) होण्याची क्रिया चालू होती. बादलीत जमा झालेले रक्त टाकून देण्यासाठी तेथील परिचारीका मला रात्री – अपरात्री उठवत असत. ज्या आईने मला तिचे दूध पाजून मोठे केले, तिचे रक्त फेकतांना माझे मन पुष्कळ खिन्न होत असे. रक्ताचे प्रमाण २ लिटर पर्यंत असायचे. तेव्हा देवाला प्रार्थना व्हायची, ‘देवा, इतके माझे नशीब वाईट असल्याचा विचार मी झोपेतही केला नव्हता, तरीही तू मला शांत स्थिर ठेव. यातून आमची साधना करवून घे.’ अशी प्रार्थना परात्पर गुरु डॉक्टरांना केली की, माझे मन शांत व्हायचे. सतत वाटायचे, ‘उद्या आईला बरे वाटेल’; पण प्रतिदिन तोच नित्यक्रम असायचा.
३ इ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार प्रार्थना करणे आणि आईच्या शरिराला सुगंध येणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याकडून काही प्रार्थना आणि नामजपादी उपाय सांगण्यात आले होते. ते आम्ही करत होतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी आईला ‘देवा, तुझ्या चरणांशी घे’, अशी प्रार्थना करण्यास सांगितले. आम्ही तिला त्याप्रमाणे सांगितल्यावर तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहू लागले. ते तिचा मृत्यू होईपर्यंत सतत चालू होते. या काळात तिच्या शरिराला सतत सुगंध येत होता. आम्हाला परिचारिका विचारायच्या, ‘तुम्ही यांच्या अंगाला काही सुगंधी द्रव्य लावता का ?’
३ ई. देवाने आइसमवेतचे प्रारब्ध संपले असल्याचे सांगणे आणि वातावरणात हलकेपणा जाणवणे : ३.९.२०१३ (श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी) या दिवशी मला सतत देवता डोळ्यांसमोर दिसू लागल्या. आईची श्री काळूबाईवर पुष्कळ श्रद्धा होती. त्या दिवशी मला श्री काळूबाईदेवी स्पष्ट आणि तेजस्वी रूपात दिसत होती. गेले किती तरी दिवस अंघोळ न करणे, धावपळ आणि जागरण यांमुळे मला आलेला थकवा दूर झाला होता. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी देवाला मनातून म्हटले, ‘देवा, आज असे काय होत आहे ? माझे शरीर एकदम हलके झाले आहे. मन निर्विचार होऊन आनंदाची अनुभूती का येत आहे ? वातावरणातही हलके वाटत आहे.’ देव म्हणाला, ‘आज आईचे प्रारब्ध संपले. जे तुला जाणवत आहे, ते आईलाही जाणवत आहे.’ देवाने असे सांगणे, म्हणजे ‘आई आता आपल्यात नसणार’, हे देव मला सांगत आहे’, असे मला जाणवले. मी रात्री ९.३० वाजता आईला भेटायला गेलो आणि तिला तिच्या जवळच्या नातेवाइकांसमवेत बोलण्यास सांगितले. मी तिला धाडस करून सांगितले, ‘‘आई, तुझा आणि माझा या जन्मातील हिशोब संपला आहे. तू माझ्यात किंवा ताईमध्ये अडकू नकोस. आम्ही देवाला सतत प्रार्थना करू की, ‘तू जिथे असशील, तेथे तुझी साधना चालू राहू दे.’’ वैद्यांनी आईला भेटायला आलेल्या नातेवाइकांना ‘या आजची शेवटची रात्र काढतील’, असे सांगून ठेवले होते. आम्हाला देवाने आधीच सांगितले होते आणि आमच्या मनाची सिद्धता करून घेतली होती.
३ उ. आईने सूक्ष्मातून बहिणीला ती जात असल्याचे सांगणे आणि मृत्यूसमयी आईचा देह हळदीप्रमाणे तेजस्वी जाणवणे : आम्ही नामजप करत बाजूच्या खोलीत बसलो होतो. त्या वेळी आम्हाला एक क्षणच झोप लागली होती आणि ती जणू काळझोपच होती. मला आणि ताईला काहीच समजलेच नाही की, आम्ही ५ मिनिटांत इतके गाढ कसे झोपलो ? साधारण १०.३० वाजता आई सूक्ष्मातून ताईला (सौ. मनीषा चव्हाण यांना) म्हणाली, ‘राणी.. राणी …मी निघाले ग… तो झोपला आहे. त्याला सांग की, आई जाते म्हणून..’ त्या वेळीही ती इतरांचा विचार करत होती. तिने मला उठवले नाही; कारण ‘मी पुष्कळ थकलो असेन’, असे तिला वाटले. (मी रामनाथीहून दिवाळीला घरी जायचो. तेव्हा ती मला कधीही माझी झोप पूर्ण होईपर्यंत उठवायची नाही. आजही तिने मला जातांना उठवले नाही.) ताई खडबडून जागी झाली आणि मला जोरात हलवून म्हणाली, ‘‘अरे, आई निघाली जायला. चल तिला भेटायला.’’ आम्ही धावत अतीदक्षता कक्षात तिच्या पलंगाजवळ गेलो आणि तिचे हात घट्ट पकडले. तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके १०० चे ६०, ६० चे २०, २० चे ० होऊ लागले. त्या वेळी एक मोठी सावली (काळे ढग यावे, तशी) तिच्यावर आणि आमच्या देहावर ३० सेकंदासाठी आली होती. तिचा देह हळदीप्रमाणे तेजस्वी दिसत होता; म्हणून सावली काहीच करू शकली नाही. ही सावली मी ताईला दाखवत होतो, तर ताई म्हणाली, ‘‘मला काहीच दिसत नाही.’’ तिला केवळ आईचा तेजस्वी झालेला देह दिसत होता. तिचे डोळे उघडे होते, ते मी बंद केले. त्यानंतर वैद्यांनी तिला १०.३३ वाजता मृत घोषित केले. ती नेहमी म्हणायची, ‘मी वडिलांच्या आधी वैकुंठाला जाणार आहे’ आणि तसेच घडले होते.
३ ऊ. मातृसेवेसाठी देवाने आईचे आयुष्य १५ दिवसांनी वाढवून देणे आणि परिचारिकेने मातृऋणातून मुक्त झाल्याचे सांगणे : या वेळी एक परिचारिका माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ‘‘तुमचे मातृऋण फिटले. तुम्ही मुक्त झालात. तुम्ही तिची मनोभावे पुष्कळ सेवा केलीत.’’ तेव्हा मला आठवले की, मी देवाशी बोललो होतो की, ‘देवा, मी तिची १५ दिवसही सेवा केली नाही’; म्हणून ‘देवाने आमच्या समाधानासाठी तिला १५ दिवसांचे आयुष्य वाढवून दिले होते’, असे मला जाणवले.
४. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
४ अ. मृतदेह घेऊन जातांना आईचा श्वास चालू असल्याप्रमाणे जाणवणे आणि आईला नामजप अन् प्रार्थना करण्यास सांगणे : आम्ही आईचा मृतदेह घेऊन रात्री अकरा वाजता रुग्णवाहिकेने निघालो होतो. आपण सेवेसाठी प्रवास करतांना जसे प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांचा जयघोष अन् श्लोक म्हणून आरंभ करायचो, तसे आम्ही तिला नेतांना केले. त्या वेळी मी आईच्या कानात ‘तुझा नामजप आणि प्रार्थना चालू आहे ना ? तू ताईच्या रडण्याकडे लक्ष देऊ नकोस’, असे सांगितले. तेव्हा ‘तिने ते शांतपणे ऐकून घेतले आहे’, असे मला वाटले आणि ‘मला तिचा श्वास चालू आहे’, असेही वाटले.
४ आ. मृत्यूनंतर आईचे शरीर पिवळे होणे आणि वातावरण चैतन्यमय होणे : आईचे अंत्यदर्शन आणि तयारी होईपर्यंत संपूर्ण वातावरण पुष्कळ हलके झाले होते. अंत्यविधीसाठी आलेल्या अमरावती येथील डॉ. (सौ.) वरुडकरकाकू आणि अन्य साधकांनीही ‘तुमच्याकडे इतरांकडे जाणवते, तसे काहीच जाणवत नाही, तर चैतन्य जाणवत आहे’, असे सांगितले. आईचे शरीर हळद लावल्याप्रमाणे पूर्ण पिवळे झाले होते. मला वरुडकरकाकूंनी विचारले, ‘आईचा देह पिवळा झाला आहे ना ?’ सोळा घंटे उलटूनही आईच्या देहाला कुठेही कडकपणा आला नव्हता किंवा तिची त्वचा निस्तेज झाली नव्हती. तिच्या त्वचेवर एक प्रकारची चकाकी जाणवत होती.
४ इ. मृत्यूच्या दिवशी आईने वाढवलेल्या जास्वंदीच्या झाडाला २५ फुले लागणे : आई देवासाठी फुले मिळावी; म्हणून जास्वंदाच्या झाडाला आईच्या मायेने जपायची. त्या झाडाला प्रतिदिन केवळ २ – ३ फुलेच लागत होती. आई गेली त्या दिवशी मात्र त्या झाडाला २५ फुले लागली होती. त्या वेळी ‘झाडालाही आईप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती’, असे जाणवले.
४ ई. आईने मृत्यूची पूर्वसिद्धता करणे आणि तिला मृत्यूची पूर्वसूचना मिळाल्याचे जाणवणे : आईने बाबांना ४ मास आधीच घरात धान्य आणि अन्य वस्तू अतिरिक्त (नेहमीपेक्षा अधिक) घेण्यास सांगितल्या होत्या. ती बाबांना सांगायची, ‘‘या वर्षी आपल्याला जास्तीचे धान्य लागणार आहे. आपल्याकडे पुष्कळ नातेवाईक येणार आहेत.’’ त्यामुळे आम्हाला वस्तू आणण्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागली नाही. घरातील वस्तूंमुळे उत्तरकार्य आणि वर्षाचे कार्यही पार पडले. आईने दारातील गुरांच्या शेणापासून गोवर्यांची ६ फूट उंच आणि ५ फूट व्यासाची मोठी रास करून ठेवली होती. त्या सर्व गायीच्या शेणाच्या गोवर्या होत्या. त्याच आम्हाला तिच्या अंत्यसंस्कारासाठी वापरता आल्या.
४ उ. मृत्यूनंतर ठेवलेल्या कुंकवावर श्री महालक्ष्मीदेवीचे पाऊल उमटणे : आमच्याकडे मृत्यूनंतर कुंकवाचा ६ इंच लांबीचा थर करून त्यावर दिवा ठेवतात. त्यावर खुणा उमटतात आणि ‘मृत व्यक्ती कोणत्या योनीत जन्माला जाणार ?’, हे त्या खुणांमुळे निश्चित केले जाते. आम्ही ठेवलेल्या कुंकवावर सुवासिनी लावतात, तशी अर्धचंद्राची कोर आणि श्री महालक्ष्मीदेवीची पाऊले उमटलेली होती.
४ ऊ. वेदमूर्ती केतन शहाणे यांनी आईच्या तिसर्या दिवशी श्रावण अमावास्या येणे हे ‘शुभ लक्षण’ असल्याचे सांगितले.
५. मृत आईचा लिंगदेह रात्री मुलाच्या स्वप्नात येऊन तिने मनोभावे सेवा केल्याचे सांगणे आणि ते बोलणे मुलाच्या शेजारी झोपलेल्या बहिणीला ऐकू येणे
आम्ही आईचे अंत्यसंस्कार झाल्यावर घरी आलो आणि मला अश्रू अनावर झाले. मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही; म्हणून मला रडू आले. त्या रात्री स्वप्नात आईचा लिंगदेह माझ्याजवळ आला आणि मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘अरे वेड्या का रडतोस ? कुठल्या मुलाला तुझ्यासारखे भाग्य मिळाले आहे का, आपल्या आईला प्रत्यक्ष ‘महालक्ष्मी’ करून वैकुंठाला पाठवण्याचे ? तू तर मला महालक्ष्मीसारखे सजवलेस. माझी सेवा मनोभावे केलीस. मग का रडायचे ?’ माझ्या बाजूला ताई झोपली होती. तिला हे संभाषण ऐकायला जात होते. तिने मला सकाळी उठल्यावर विचारले, ‘‘तुझ्यात आणि आईमध्ये रात्री ‘असा असा’ (वरीलप्रमाणे) संवाद झाला का ?’’ मी तिला विचारले, ‘‘तुला हे सगळे कसे कळले ?’’ तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘तुमचे संभाषण मला ऐकू येत होते.’’
६. कावळ्याने नैवेद्य ग्रहण केल्याने देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
आम्ही आईचे उत्तरकार्य नाशिक पंचवटी येथे केले. या कार्यात एका १० x १२ च्या आगाशीवर अनेक पुरोहित आपापल्या यजमानांना घेऊन दहीभाताचा नैवेद्य ठेवण्यासाठी जात होते. मला तेथील भिंतीवर कावळ्यासाठी घास ठेवायला जागा नव्हती. मी जागा करून एका कोपर्यात घास ठेवला आणि प्रार्थनेसाठी हात जोडणार इतक्यात एक कावळा पाळीव पोपटाप्रमाणे ४० ते ५० नैवेद्यांना ओलांडून तो घास खाऊ लागला आणि माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देवा, आईला तू कशातच अडकवले नाहीस.’ कावळ्याने नैवेद्य ग्रहण करावा, यासाठी आमच्या आधीपासून अनेक लोक थांबलेले होते. आमचे उत्तर कार्य ३ घंट्यांत पूर्ण झाले.
आईच्या मृत्यूनंतर इतर अनेक मृत व्यक्ती माझ्या स्वप्नात आल्या; पण आई कधी स्वप्नात आली नाही किंवा तिच्याविषयी मला अन्य त्रासदायक असे कधीही जाणवले नाही. ‘आपण कोणाचे वाईट करू नये म्हणजे देव आपले वाईट करत नाही’, असे सतत सांगणार्या आणि त्यानुसार वागणार्या आईचे देवाने चांगलेच केले.
– श्री. विशाल पवार, जळगाव (२२.६.२०२०)
आईची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे ओळखणारे श्री. विशाल पवारश्री. विशाल यांनी लेखाच्या शेवटी लिहिलेले वाक्य – ‘आईची ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाली असावी’, असे आम्हाला वाटते.’ परात्पर गुरु डॉ. आठवले – विशाल, आईची पातळी ६१ टक्के झाली आहे. आईची आध्यात्मिक पातळी तुला कळली, म्हणजे तुझीही प्रगती चांगली होत आहे. अभिनंदन ! |
|