मनमिळाऊ, प्रेमळ आणि अभ्यासू वृत्ती असलेले कोथरूड (पुणे) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रा. विलास भिडेकाका !
कोथरूड (पुणे) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक प्रा. विलास भिडेकाका (वय ७४ वर्षे) यांचे २६.५.२०२१ या दिवशी निधन झाले. ४.६.२०२१ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. सुरेंद्र वाटवे, कोथरूड, पुणे.
१ अ. मनमोकळेपणा
भिडेकाकांचा स्वभाव मनमोकळा होता, तसेच ते स्पष्टवक्ते होते. त्यांचा मला नेहमीच आधार वाटत असे. माझ्या साधनेविषयी, तसेच व्यावहारिक गोष्टींविषयीही मी त्यांचे मार्गदर्शन घेत असे.
१ आ. प्रेमभाव
वर्ष २०१४ पासून काका आणि काकू यांचा अन् माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यांचे घर माझ्या कार्यालयापासून जवळ असल्यामुळे मी नियमितपणे त्यांच्याकडे जात असे. दार उघडताच ‘या’, असे म्हणून अगत्याने स्वागत करण्याने मला त्यांच्याविषयी पुष्कळ आपुलकी वाटत असे. त्यांच्यामुळेच ‘मी सनातन संस्थेमध्ये कधी स्थिरावलो ?’, हे मला समजलेच नाही.
प्रत्येक शुक्रवारी त्यांच्या घरी सत्संग होत असे. गेल्या काही वर्षांत झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, तसेच मृत्युंजय मंदिर, चतुःश्रृंगी मंदिर येथे सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र जात होतो.
१ इ. उत्तम तांत्रिक ज्ञान असणे
काकांना असणारे तांत्रिक ज्ञान आणि या वयातही ते ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयात उत्साहाने घेत असलेला ‘इंडस्ट्रियल सेफ्टी’चा कोर्स यांमुळे मला काकांचा आदर वाटत असे.
१ ई. अध्यात्माविषयीच्या लेखनाची आवड असणे
काकांना लेखनाची आवड होती. मे २०२० मध्ये त्यांनी लिहिलेला ‘अध्यात्म आणि विज्ञान’ आणि शिव-पार्वती यांच्या संवादरूपातील ‘शिवस्वरोदयशास्त्र’ हा लेख त्यांनी मला अभ्यासासाठी पाठवला होता. ‘शिवस्वरोदयशास्त्र’ हे अनेक गूढ विद्यांपैकी एक आहे. काकांचा अशा विषयांचा चांगला अभ्यास होता.
गेल्या काही मासांत काकांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते; परंतु औषध घेतल्यावर ते बरे होत होते.
१ उ. काकांच्या देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे
२६.५.२०२१ या दिवशी सकाळी ‘काकांचे देहावसान झाले’, असा मनीषाताईंचा (सौ. मनीषा पाठक यांचा) दूरभाष आला. त्यानंतर मी काकांच्या घरी गेलो. त्या वेळी काकांचा तोंडवळा पुष्कळ शांत आणि प्रसन्न दिसला. त्यांच्या घरातील स्पंदनेही सकारात्मक असल्याचे जाणवले.
काकांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांची पुढील प्रगती करवून घेतील, हे निःसंशय !’ (२९.५.२०२१)
२. सौ. सविता देवधर, कोथरूड, पुणे.
अ. ‘भिडेकाका म्हणजे मनमिळाऊ, साधे, इतरांना साहाय्य करण्यास तत्पर, शिस्तप्रिय, हिशोबाला चोख, आत्मविश्वासू, शांत, प्रेमळ आणि अनेक विषयांचे ज्ञान असलेले व्यक्तीमत्त्व होते.
आ. पूर्वी काका रसायनी येथे रहात होते. एकदा त्यांच्या समवेत गावी जाण्याचा योग आला होता. रसायनी गावात ‘भिडेकाका ठाऊक नाहीत’, अशी व्यक्तीच सापडणार नाही. मला काकांचा पुष्कळ आधार वाटत असे.
‘काकांसारखे गुण आमच्यातही येऊ देत’, ही प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना आहे.’ (२९.५.२०२१)
३. सौ. नीता साळुंखे, कोथरूड, पुणे.
अ. ‘प्रा. भिडेकाका आनंदी आणि स्थिर होते.
आ. काकांकडे एकदा गुरुपौर्णिमेच्या विज्ञापनांची सेवा होती. काकांनी प्रत्येक विज्ञापनाच्या नोंदी तपशीलवार ठेवल्या होत्या.
इ. भिडेकाका आणि काकू त्यांच्या घरी सत्संग घेत होते. त्या सत्संगात नियमितपणे ५ जिज्ञासू येत असत. त्यांच्यापैकी ३ जण आता सेवेत क्रियाशील झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे.
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला अनेक गुणांनी युक्त अशा काकांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली’, त्याविषयी श्री गुरुचरणी कृतज्ञता ! (२९.५.२०२१)