नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ पालटावे लागतील ! – संभाजीनगर खंडपीठ
देहली येथील रुग्णालयांचे आधुनिक वैद्य ‘व्हेंटिलेटर्स’ची पडताळणी करणार !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ?
संभाजीनगर – ‘पंतप्रधान निधीतून घाटी रुग्णालयाला देण्यात आलेले ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त असतील, तर ते पालटून घेतले पाहिजेत. दुरुस्त केलेल्या ‘व्हेंटिलेटर्स’चा वापर कोरोना रुग्णांसाठी करण्याची अनुमती आम्ही देऊ शकत नाही’, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठातील न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी २ जून या दिवशी बजावले आहेत. नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर’ची पडताळणी करण्यासाठी नवी देहली येथील राममनोहर लोहिया आणि सफदरजंग रुग्णालयाचे तज्ञ, आधुनिक वैद्य येणार आहेत. खंडपिठाने स्वत:हून (सुमोटो) प्रविष्ट करून घेतलेल्या फौजदारी याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्रसरकारचे अतिरिक्त ‘सॉलिसिटर’ जनरल अनिलसिंग यांनी ही माहिती दिली.
खंडपिठाने तज्ञांचा अहवाल ७ जून या दिवशी सुनावणीच्या प्रसंगी ठेवण्याचे आदेश दिले. ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त आहेत. या उत्पादनात दोष असल्याने ‘वॉरंटी’ योजनेचा लाभ घेता येऊ शकतो; मात्र अशा ‘व्हेंटिलेटर्स’मुळे दुर्दैवाने काही बरेवाईट झाले, तर कुणाला उत्तरदायी धरणार’, अशी शंका खंडपिठाने उपस्थित केली. केंद्रसरकारकडून मिळालेल्या ‘व्हेंटिलेटर्स’ची ‘एच्.एच्.एल्. लाइफ केअर’ आस्थापनाच्या २६ जणांच्या पथकाने २९ मे या दिवशी पहाणी केली होती. याचा अहवाल शासकीय अधिवक्ता ज्ञानेश्वर काळे यांनी खंडपिठात सादर केला.