पसार साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांना अटक !
गोंदिया येथील आरोपी राजकुमार धोती याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरण
असे पोलीस जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?
गोंदिया – आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी राजकुमार धोती (वय ३० वर्षे) याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवाल आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अन्वेेषण यानंतर पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचार्यांना अटक करण्यात आली होती, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. अखेर त्यांना २ जून या दिवशी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (पोलीस कोठडीत गुन्हेगारांना अमानुष मारहाण केल्यामुळेच त्यांचा संशयास्पद मृत्यू होत आहे, असे राज्यातील इतर काही प्रकरणांवरून लक्षात आले आहे. गुन्हेगारांचा छळ करून जीव घेणार्या अशा पोलीस कर्मचार्यांना बडतर्फ केले पाहिजे. – संपादक)
१. आरोपी राजकुमार धोती याच्यासह सुरेश राऊत, राजकुमार मरकाम आणि एक अल्पवयीन आरोपी यांना चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २० मे या दिवशी अटक केली होती.
२. २१ मे या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने आमगाव पोलीस ठाण्याकडे या आरोपींना सोपवले. २२ मे या दिवशी पहाटे ५ वाजता पोलीस कोठडीत राजकुमार धोती याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
३. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी प्राथमिक पडताळणी करून पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तात्रय कांबळे यांना तडकाफडकी निलंबित केले होते.
४. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. वरील ५ कर्मचार्यांवर २७ मे च्या रात्री ९ वाजता गुन्हे नोंद करण्यात आले होते. यात महावीर जाधव वगळता इतर पोलीस कर्मचार्यांना अटक करण्यात आली होती.