कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे समजावून सांगणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
हिंगोली – ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने १५ मास झोपा काढल्या आहेत. राज्यात कोविड आजारामध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ दिलेल्या, तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देणे आवश्यक आहे, असे मत विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी ३ जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्याने कोविडमध्ये उत्तम काम केल्याचे सांगून त्यांनी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या कामांविषयी समाधान व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे आतापर्यंत ५ सहस्र रुग्ण आढळून आले आहेत. या आजारामध्ये रुग्णांना शरिराचा अवयव गमवावा लागत आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सरकारने शासकीय आणि खासगी रुग्णालयांत या आजाराची ‘इंजेक्शने’ विनामूल्य द्यावीत.
२. राज्यात कोरोनाची संभाव्य ‘तिसरी लाट’ लक्षात घेता आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
३. राज्य सरकारने शहराच्या दर्जाप्रमाणे कोविड उपचाराचे शुल्क आकारण्याचे पत्रक काढले; मात्र त्यासाठी विलंब झाला आहे.
४. पंतप्रधान निधीतून मिळालेले ‘व्हेंटिलेटर’ काही ठिकाणी ६ मासांपेक्षा अधिक काळ उघडले नसल्याने त्यामध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाले असतील, असे सांगून त्यांनी या ‘व्हेंटिलेटर’च्या वादावर पडदा टाकला.