सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांची चेन्नई येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
वैशाख कृष्ण पक्ष दशमी (४.६.२०२१) या दिवशी सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने चेन्नई येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सौ. कोमला श्रीवत्सन्
१ अ. नम्र स्वभाव : ‘पू. प्रभाकरन्मामा यांचे बोलणे मृदु आहे. ते उच्च पदावर काम करत असूनसुद्धा त्यांच्या बोलण्यात नम्रता आहे. ते कधीही अधिकारवाणीने बोलत नाहीत.
१ आ. इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती : त्यांची सतत इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती आहे. एकदा मला मूतखड्याचा पुष्कळ त्रास झाल्यामुळे मला रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी माझे यजमान बाहेरगावी गेले असल्यामुळे मी एकटीच होते. तेव्हा पू. प्रभाकरमामा माझ्या समवेत रुग्णालयात थांबले. माझे यजमान परत आल्यानंतरच ते गेले.
१ इ. घरकाम शांतपणे सेवाभावाने करणे : पू. मामा कधीच वैयक्तिक अडचणींविषयी बोलत नाहीत. त्यांच्या पत्नीला अनेक शारीरिक त्रास आहेत; मात्र मामा कधीही त्याविषयी बोलत नाहीत. ते पत्नीची काळजी घेतात आणि घरकाम करत त्यांच्या नातवाचीही काळजी घेतात. या सर्व सेवा ते शांतपणे करत असतात.’
२. श्रीमती कृष्णवेणी, मदुराई
अ. ‘पू. प्रभाकरन्मामा अतिशय नम्र असून ते इतरांना साहाय्य करतात.
आ. वक्तशीरपणा हा मामांचा आणखी एक गुण आहे.
इ. मामा सेवेविषयी अतिशय काटेकोर असून ती परिपूर्णरित्या करतात. ते कोणतीही सेवा करायला सिद्ध असतात.
ई. एखादी सेवा कठीण वाटत असल्यास पू. प्रभाकरमामांच्या मार्गदर्शनामुळे ती सहज सोपी होऊन जाते. मामा एकाच वेळी अनेक सेवांविषयी विचार करत असतात आणि त्यासंदर्भात योग्य मार्गदर्शनही करतात.