इस्रायलमध्ये नेतन्याहू यांचे सरकार जाऊन नेफ्टाली बेनेट होणार नवीन पंतप्रधान
तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवण्याची घोषणा केल्यामुळे आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. केवळ ७ खासदारांचे समर्थन असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनणार आहेत. नेफ्टाली हे जरी कट्टर राष्ट्रवादी नसले, तरी त्यांचा यामिना पक्ष हा पॅलेस्टाईनचा कट्टर विरोधी असल्याचे मानले जाते.
मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती. यामुळे नेतन्याहू हे काळजीवाहू पंतप्रधान होते. इस्रायलचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांना सरकार बनवण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी २ जूनपर्यंतचा वेळ दिला होता. सरकार बनवण्यासाठी नेतन्याहू यांनी पुष्कळ प्रयत्न केले; मात्र ते अपयशी ठरले. याचवेळी विरोधी पक्ष नेते येर लेपिड यांनी इस्रायलमध्ये विरोधी पक्षांमध्ये सरकार बनवण्यासाठी सहमती बनल्याचे घोषित केले. या नव्या आघाडीमध्ये ८ पक्ष सहभागी आहेत. या सर्वांच्या सहमतीनुसार यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. त्यांचा कालावधी केवळ २ वर्षांचाच असणार असून यानंतर येश एटिड पक्षाचे नेते येर लेपिड पंतप्रधान होणार आहेत.