अॅलोपॅथी आणि आयुर्वेदीय औषध घेणारे रुग्ण केवळ अॅलोपॅथी औषध घेणार्या रुग्णांच्या तुलनेत लवकर कोरोनामुक्त झाले !
कर्णावती (गुजरात) येथील कोविड रुग्णालयातील संशोधन !
संपूर्ण देशात कोरोना उपचारांमध्ये आयुर्वेदाचा अधिकृतरित्या सहभाग करून घ्यावा, असेच या संशोधनातून जनतेला वाटेल ! केंद्र सरकारने यावर निर्णय घेणे आवश्यक !
कर्णावती (गुजरात) – येथील आशियातील सर्वांत मोठ्या रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या १ सहस्र २०० खाटांच्या कोविड रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथीसमवेत आयुर्वेदीय उपचार करणे संजीवनी ठरत आहे, असे निदर्शनास आले आहे. रुग्णांच्या सहमतीने करण्यात येणार्या उपचारांमुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. या उपचारांमध्ये सहभागी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. काही रुग्ण गंभीर स्थितीमध्ये भरती झाले होते. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार करण्यात आले. या रुग्णालयात २६ कोरोनाबाधित रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले.
स्टँडर्ड ट्रीटमेंट ग्रुप (एस्टीजी) आणि आयुर्वेदीय ट्रीटमेंट ग्रुप (एटीजी) अशी विभागणी करून रुग्णांवर उपचार करण्यात आले. एटीजी ग्रुपमधील रुग्णांना अॅलोपॅथी आणि आयुर्वेद अशी दोन्ही औषधे देण्यात आली, तर एस्टीजीमधील रुग्णांना आयुर्वेदीय औषधे देण्यात आली नाहीत. एटीजी ग्रुपमधील रुग्ण एस्टीजीमधील रुग्णांच्या आधी बरे झाले. कुणालाही अतीदक्षता विभागात ठेवावे लागले नाही कि कुणाचा मृत्यू झाला नाही. ३३ टक्के, म्हणजे ८ रुग्णांना ३ दिवसांतच घरी सोडण्यात आले. याउलट एस्टीजी रुग्णांना बरे होण्यास अधिक कालावधी लागला. एकाही रुग्णाला ३ दिवसांत घरी सोडण्यात आले नाही.