सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !
कै. उषा पवार यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात देवाने त्यांना केलेले साहाय्य यांविषयी त्यांचा मुलगा श्री. विशाल पवार यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेने मला वर्ष २००४ ते २०१३ या काळात रामनाथी आश्रमात सेवा करायची संधी मिळाली. त्यानंतर वर्ष २०१३ मध्ये आईला बरे वाटत नसल्यामुळे मला घरी जावे लागले. ३.९.२०१३ या दिवशी आईचे निधन झाले. आईच्या रुग्णाईत अवस्थेत आणि त्यानंतरही प्रत्येक प्रसंगात आपणच मला साहाय्य केले आणि स्थिर ठेवून साधनेसाठी शक्ती दिलीत. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता !
१. आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. वर्ष २००३ मध्ये घरात संकटांची मालिका चालू होऊन केवळ आई कमावणारी असल्याने तिने सर्व दायित्व पार पाडणे : वर्ष २००३ मध्ये घरात अनेक बाजूंनी संकटांची मालिका चालू झाली होती. मलाही आध्यात्मिक त्रास चालू झाला होता. त्या वेळी माझ्याकडून १२ ची परीक्षा देणेही झाले नाही. पुढे माझ्या त्रासाचा भाग पुष्कळ वाढला आणि मी शिक्षण सोडून दिले. त्याच कालावधीत वडिलांचेही काम गेले होते. उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यातच मोठी बहीण पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. या सगळ्या प्रसंगात केवळ आई एकटीच कमावणारी आणि घराचा सर्व बाजूंनी भार उचलणारी होती. अशा बिकट आर्थिक स्थितीत तिने मी, बाबा आणि ताई अशा तिघांना सांभाळले आणि नवीन जन्मलेल्या बाळाचेही सर्व केले. दिवसभर कामाला जायचे आणि संध्याकाळी घरची सर्व कामे अन् बाळाचेही करायचे, असे प्रतिदिन करत असूनही तिचा उत्साह अल्प झाला नाही किंवा तिने ‘थकवा आला आहे’, असे कधी म्हटले नाही.
१ आ. घराशेजारील दारुड्यांनी त्रास देणे आणि आईने पोलिसांत तक्रार देऊनही त्यांचे साहाय्य न मिळणे : आमच्या घराच्या शेजारील दारुडे येऊन आम्हाला पुष्कळ त्रास द्यायचे. आमच्या साहाय्याला कोणी नातेवाईक किंवा पोलीसही येत नसत. आई पुष्कळ निडर असल्याने तिने घरातील बायकांना घेऊन अनेक वेळा पोलिसांत तक्रार केली; परंतु पोलिसांनी कधीच साहाय्य केले नाही.
१ इ. घरची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही पूर्णवेळ होण्यासाठी आईने पाठिंबा देणे : या कालाधीत मला एका ठिकाणी काम मिळाले. मी ते ६ मास केले. त्यानंतर मला रामनाथी येथे बांधकामाच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता असल्याचे कळले; म्हणून मी घरातील परिस्थिती चांगली नसतानांही हिंमत करून ‘मला पूर्णवेळ साधना करायची आहे’, असे आईला सांगितले. त्या वेळी आईने मला काहीही प्रश्न विचारले नाहीत. ‘‘देवाच्या जवळ राहून तुझे चांगले होणार असेल, तर तू जाऊ शकतोस’’, असे तिने मला सांगितले.
१ ई. आश्रम पाहिल्यावर मुलाची काळजी न वाटणे : वर्ष २००४ ते २०१३ या कालावधीत मी आरंभी ४ मासांनी (महिन्यांनी) आणि नंतर १४ मासांनी घरी जात असे. त्या वेळीही आईचे कधी गार्हाणे नसायचे. ‘देवा, माझे जे चांगले आहे, ते तू माझ्या मुलांना दे’, अशी ती देवाला सतत प्रार्थना करायची. तिनेच आमच्यावर साधनेचे संस्कार केले. वर्ष २०१० मध्ये ती परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाली, ‘‘मी आश्रम पाहिला आणि तुम्हालाही पाहिले. आता मला विशालची काळजी नाही.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आधीच यायला हवे होते, म्हणजे तुम्ही चिंतामुक्त झाला असता.’’
१ उ. मुलगा सनातनचा साधक असल्याने सर्व निर्णय विचारून घेणे : ‘मी सनातनचा पूर्णवेळ साधक आहे आणि माझी प्रत्येक गोष्ट योग्यच असणार’, असा तिचा नेहमी विचार असायचा. त्यामुळे मी तिला साधनेविषयी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती लगेच स्वीकारायची. तिला ताईसाठी काही निर्णय घ्यायचा असेल, तर ती माझा सल्ला घ्यायची आणि माझ्यासाठी काही निर्णय घ्यायचे असेल, तर ताईला विचारायची. ती स्वतःच्या मनाने कधीच निर्णय घेत नव्हती.
१ ऊ. ‘इतरांचा विचार करणे’, हे जीवनाचे सूत्र असणे : तिच्यात एक चांगला गुण होता. तो म्हणजे ‘इतरांचा विचार करणे.’ तिने तिचे सगळे आयुष्य इतरांचा विचार करण्यात घालवले. तिने आयुष्यात स्वतःसाठी कधीच वेळ दिला नाही. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको’, असे तिच्या जीवनाचे सूत्र होते. ते तिने शेवटच्या क्षणापर्यंत जपले.
१ ए. नामजप करण्यास सांगितल्यावर सतत नामजप करणे : मी सनातनमध्ये पूर्णवेळ होईपर्यंत ती कर्मकांड करत होती; परंतु नंतर नामजप करू लागली होती. ‘मी तिला नामजप कर’, असे सांगितल्यावर ती म्हणायची ‘माझा नामजप सतत चालू असतो.’ तेव्हा आम्हाला वाटायचे, ‘आमचा नामजप होत नाही, तर तिचा सहजपणे कसा चालू असतो ?’
१ ऐ. नेहमी विष्णुतत्त्वाची रांगोळी आवडीने काढणे : ती नेहमी एकच रांगोळी आवडीने काढायची. ती सगळ्या सणांना एकच रांगोळी काढायची. याविषयी आम्ही तिला नेहमी म्हणायचो, ‘‘तुला दुसर्या रांगोळ्या येत नाही का ?’’ तेव्हा ती सांगायची, ‘‘मला एकच रांगोळी येते आणि तीच आवडते.’’ त्यानंतर सनातनच्या रांगोळी ग्रंथात पाहिल्यावर मला कळले की, ती विष्णुतत्त्वाची रांगोळी आहे. तिला मात्र याविषयी काहीच ठाऊक नव्हते.
२. रुग्णालयात असतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. हृदयाचा त्रास होऊन आईला रुग्णालयात जावे लागणे आणि ‘मृत्यूसमयी मुलाने जवळ असावे’, ही एकच अपेक्षा असल्याचे तिने सांगणे : वर्ष २०१३ मध्ये तिला हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते. त्यानंतर आई आणि बाबा जळगावला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेले होते. गुरुपूजन आणि प्रवचन झाल्यावर तिला पुष्कळ उलट्या झाल्या. त्यानंतर तिचा त्रास वाढत गेला; म्हणून ते पुन्हा अमरावतीला गेले. मला अमरावती येथील साधकांनी कळवले. त्या वेळी तिच्या हृदयाच्या संदर्भात काहीतरी अडचण असल्याचे कळले; पण आधुनिक वैद्यांनी नेमकेपणाने काही सांगितले नाही.
मी गोव्याहून अमरावतीला पोचलो. त्या वेळी तिला पुष्कळ हायसे वाटले. ती मला एकच गोष्ट नेहमी सांगायची, ‘माझी मरणाची वेळ जवळ आली की, तू जगाच्या पाठीवर कुठेही असलास, तरी माझ्या जवळ ये. मला इतर काहीच अपेक्षा नाहीत. माझे अंत्यसंस्कार तूच कर.’’ आईला रुग्णालयातून सोडल्यावर पुन्हा आम्ही गावी गेलो.
२ आ. ‘आपण अधिक दिवस जगणार नाही’, हे लक्षात येऊनही आईने तसे न दाखवणे : ‘मला पुन्हा त्रास होत आहे’, असे आईने मला सांगितले. मी आईला शासकीय रुग्णालयात घेऊन गेलो. तेथील वैद्यांनी तिला भरती करून घेतले. तिने स्वतःची स्थिती जाणली होती. त्यामुळे ‘आपण अधिक दिवस जगणार नाही’, हे तिच्या लक्षात आले; परंतु ती मला तसे दाखवत नव्हती.
२ इ. नातेवाइकांवर विश्वास नसल्याने आणि सनातन संस्थेवर विश्वास असल्याने ‘मुलाला तुमच्या स्वाधीन करून जात आहे’, असे आईने पू. पात्रीकरकाकांना सांगणे : तिला रुग्णालयात भेटण्यासाठी पू. पात्रीकरकाका आले. त्या वेळी ती त्यांच्याकडे पाहून लहान मुलाप्रमाणे रडायला लागली आणि म्हणाली, ‘‘काका, माझा मुलगा कोणाच्याच स्वाधीन करू शकत नाही. केवळ तुम्ही (सनातन संस्था) आहात; म्हणून मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करून जात आहे. माझा माझ्या नातेवाइकांवर विश्वास नाही. मी आता पुष्कळ दिवस जगणार नाही.’’ त्या वेळी काकांनी ‘विशालची काळजी घ्यायला परात्पर गुरु आहेत ना ?’, असे सांगितले. (त्या वेळी पू. काका संत म्हणून घोषित झाले नव्हते.)
२ ई. अमरावती येथील वैद्यांनी आईच्या हृदयाची झडप खराब झाली असल्याने तिला तातडीने नागपूरला नेण्यास सांगणे आणि ‘आईची सेवा करण्यास अतिशय अल्प कालावधी आहे’, असे वाटून रडू येणे आणि त्यासाठी प्रार्थना करणे : मी अमरावती येथील साधक दांपत्य वैद्य वरुडकरकाका-काकू यांच्या साहाय्याने तिला एका वैद्यांकडे घेऊन गेलो. त्या वेळी त्यांनी आईला पहाताक्षणी सांगितले, ‘यांच्या हृदयाची झडप (वॉल्व्ह) खराब झाली आहे. यांना दम्याचा त्रास आहे. यांच्यात रक्त पुष्कळ अल्प आहे.’ त्यांनी तिच्या काही तपासण्या (टेस्ट) केल्या. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणेच तिचे निदान झाले. त्यांनी आईला भरती करून घेतले आणि ५ घंट्यांनी म्हणजे रात्री ११ वाजता त्यांनी मला सांगितले, ‘‘यांचे ठोके लागत नाहीत, तरी तुम्ही यांना तातडीने नागपूरला घेऊन जा.’’ मला त्या वेळी पुष्कळ रडू आले. तिच्या सेवेसाठी देवाने मला थोडाच वेळच दिला; म्हणून मी देवाला म्हटले, ‘देवा, मी तिची १५ दिवसही सेवा केली नाही. इतकेच माझ्या भाग्यात आहे का ? मी मातृसेवा करू शकतो.’ त्यानंतर आई आणखी १५ दिवस जगली.
२ उ. नागपूरला गेल्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे आणि साधक तसेच नातेवाइकांनीही साहाय्य करणे : आम्ही तिला पहाटे रुग्णवाहिकेतून नागपूर येथे घेऊन गेलो. तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आपल्याला यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया (ओपन हार्ट सर्जरी) करावी लागेल.’’ त्या वेळी ‘काय करावे ? शस्त्रक्रिया करावी कि करू नये ?’, या विचाराने माझा गोंधळ होत होता. ‘काय निर्णय घ्यावा ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा देवाला प्रार्थना करून मी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. २२.८.२०१३ या दिवशी एका नातेवाइकाने आणि साधकांनी आम्हाला डबा पाठवला होता. त्यात आईला आवडणारे विविध प्रकारचे पदार्थ होते. त्यांनी अगदी बासुंदीपासून ते पापड, ठेचा इत्यादी सगळेच पदार्थ पाठवले होते. आईला अन्न पचत नव्हते; म्हणून तिने अनेक दिवसांत एकही पदार्थ खाल्ला नव्हता; परंतु त्या दिवशी मात्र तिने सगळे पदार्थ खाल्ले. (क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
– श्री. विशाल पवार, जळगाव (२२.६.२०२०)
|