महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या विविध यागांच्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती
मध्यंतरी रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार विविध याग झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सप्तर्षि यांच्या कृपेमुळे मला ४७ दिवस या विविध यागांना बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती कृतज्ञतेच्या भावाने संकलित केल्या आहेत.
१. सनातन धर्मग्रंथ आणि यज्ञयाग यांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येऊन ऋषि अन् महर्षि यांनी भावी काळासाठी लिहून ठेवलेली अनमोल ज्ञानसंपदा पाहून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
‘वाराणसी येथे हिंदी भाषेतील धर्मसंवादांच्या चित्रीकरणाची सेवा चालू होती. ‘हिंदु संस्कृतीचे मूलभूत अंग, सनातन धर्मग्रंथ आणि यज्ञ संस्कृतीची वैशिष्ट्ये’ या विषयांवर चित्रीकरण चालू होते. चित्रीकरणासाठी विषयांचा अभ्यास करतांना सनातन धर्मग्रंथ आणि यज्ञयाग यांचे अनन्यसाधारण महत्त्व मला समजले अन् माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हा ऋषी आणि महर्षि यांनी भावी काळासाठी अनमोल ज्ञानसंपदा लिहून ठेवल्यामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. यागाला बसण्याचा निरोप आल्यावर ‘धर्मसंवादाचे चित्रीकरण करतांना मनात निर्माण झालेली यागाविषयीची जिज्ञासा श्री गुरु आणि महर्षि यांच्यापर्यंत पोचली आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे
‘रामनाथी आश्रमात याग चालू होणार आहेत आणि महर्षींच्या आज्ञेनुसार तुम्हाला यागाला बसायचे आहे’, असा निरोप मला मिळाला. हे ऐकल्यावर ‘धर्मसंवादाचे चित्रीकरण करतांना मनात निर्माण झालेली (यागाविषयीची) जिज्ञासा श्री गुरु आणि महर्षि यांच्यापर्यंत पोचली आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.
३. गोव्याला जाण्याचा निरोप मिळाल्यावर मनात अन्य कुठलेच विचार न येता मन शांत आणि स्थिर असणे अन् आतून आनंद जाणवणे
माझे गोव्याला जाण्याचे नियोजन नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्या कृपेने मला ही अमूल्य संधी मिळाली. ‘साक्षात् भगवंताची इच्छा अनुभवण्याची संधी मिळाली’, या विचाराने मला पुष्कळ आनंद झाला. एक मासापासून मला थोडा शारीरिक त्रास होत होता, तसेच धर्मसंवादांच्या शृंखलांचे ध्वनीचित्रीकरण आणि अन्य महत्त्वाच्या सेवाही होत्या. असे असूनही गोव्याला येण्याचा निरोप मिळाल्यावर मनात अन्य कुठलेच विचार आले नाहीत. त्या वेळी माझे मन शांत आणि स्थिर होते अन् मला आतून आनंद जाणवत होता. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि महर्षि सर्व करून घेणार आहेत’, असा एकच विचार मनात होता.
४. यागांच्या वेळी ३ संतांसमवेत बसून यागात आहुती देण्याची अमूल्य संधी मला मिळाली, यासाठी माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
५. यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
५ अ. ‘अग्निकुंडात श्री अग्निनारायण आहे’, असा भाव ठेवून आहुती दिल्यावर भावजागृती होऊन हाताला अग्नीचा दाह न जाणवता ‘तो श्री अग्निनारायणाचा स्पर्श आहे’, असा भाव जागृत होणे आणि यागातील एकरूपता वाढणे : यागाच्या वेळी ‘अग्निकुंड म्हणजे साक्षात् श्री अग्निनारायण आहे’, अशी माझ्या बुद्धीला जाणीव होती; पण तसा माझा भाव नव्हता. आहुती देतांना हाताला अग्नीचा दाह जाणवत होता आणि एकाग्रता अल्प होऊन भावपूर्ण आहुती देण्याची कृती होत नव्हती. पुनःपुन्हा प्रार्थना केल्यावर देवाने सुचवले,
‘श्री अग्निनारायणाकडे पाहून आहुती दिली, तर ती कृती भावपूर्ण होईल !’ नंतर प्रत्येक आहुती देतांना मी ‘अग्निकुंडात पाहून तेथे साक्षात् श्री अग्निनारायण आहे’, असा भाव ठेवून आहुती देऊ लागलो. असे केल्याने भावपूर्ण आहुती देता येऊन माझी भावजागृती होऊ लागली. यामुळे आहुती देतांना हाताला अग्नीचा दाह जाणवणे न्यून झाले आणि कधी दाह जाणवला, तरी ‘तो श्री अग्निनारायणाचा स्पर्श आहे’, असा भाव जागृत होऊन यागातील सेवेशी माझी एकरूपता वाढत गेली.
५ आ. यागाच्या वेळी आरंभी देवतेप्रती भाव अल्प असणे, नंतर पुरोहित-साधकांसह मंत्रोच्चारण केल्याने देवतेच्या नामामुळे भाव जागृती होऊन यागाच्या वेळी ‘देवतांचे तत्त्व जागृत होऊन त्या साधकांना कृपाशीर्वाद अन् यागाची फलश्रुती देतात’, असे वाटणे : मी यागाला बसायला लागल्यानंतर आरंभी काही दिवस पुरोहित-साधक मंत्रोच्चारण करायचे आणि मी आहुती देत असे; पण ज्या देवतेचा याग असायचा, त्या देवतेप्रती माझी भाव, तसेच यागाशी एकरूपता मला अल्प जाणवत होती. नंतर पुरोहित-साधक मंत्रोच्चारण करायचे, तेव्हा मी त्यांच्यासमवेत मंत्रोच्चारण करू लागलो. त्या मंत्रोच्चारणामध्ये देवतेच्या नामाचे उच्चारण असल्यामुळे माझी देवतेप्रती भाव जागृती होऊ लागली. ‘यागाच्या वेळी प्रत्यक्ष त्या देवतांचे तत्त्व जागृत होऊन त्या साधकांना कृपाशीर्वाद आणि यागाची फलश्रुती देतात’, असे वाटून मला कृतज्ञता वाटू लागली अन् यागाशी एकरूपता वाढत गेली.
५ इ. श्री प्रत्यंगिरादेवीच्या यागाच्या वेळी मिरच्यांची आहुती देतांना एकदाही मिरच्या जळल्याचा वास न येणे किंवा ठसका न लागणे आणि ‘श्री अग्निनारायण आहुती स्वीकारून त्या देवतांपर्यंत पोचवत आहेत’, याची प्रचीती येणे : श्री प्रत्यंगिरादेवीच्या यागाच्या वेळी यज्ञकुंडात ‘श्री अग्निनारायण आहुती स्वीकारत आहेत’, अशी मला प्रचीती आली. या यागात सुक्या मिरच्यांची आहुती द्यायची होती. हा याग ५ दिवस चालू होता. ३ संतांनी ४५ मिनिटांमध्ये १०८ वेळा, म्हणजे ३२४ मिरच्यांची आहुती दिली; परंतु आश्चर्य म्हणजे ५ दिवसांत एकदाही मिरच्या जळल्याचा वास आला नाही किंवा ठसका लागला नाही. या यागात श्री अग्निनारायण आहुती स्वीकारून ‘ती त्या देवतांपर्यंत पोचवत आहेत’, अशी मला प्रचीती आली.
५ ई. यागाच्या वेळी अंगावर बसणार्या आणि चावणार्या असंख्य किड्यांना घालवण्यासाठी शारीरिक हालचाली होणे; परंतु मन यागातच एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर किडे चावण्याचे प्रमाण अल्प होणे : याग चालू असतांना वेगवेगळ्या आकारांचे असंख्य किडे पाठीवर आणि हातावर बसायचे अन् चावा घ्यायचे. त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी हात मागे घ्यावा लागायचा आणि एकाग्रता भंग पावायची. नंतर लक्षात आले, ‘अनिष्ट शक्ती यागात विघ्न आणण्यासाठी किड्यांच्या माध्यमातून संतांवर आक्रमण करत आहेत.’ त्या वेळी माझी लढण्याची वृत्ती जागृत झाली. किडे चावायचे, तेव्हा त्यांना घालवण्यासाठी शारीरिक हालचाली होत होत्या; पण मन यागातच एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी किडे चावण्याचे प्रमाण न्यून झाले. पूर्वीच्या काळी ऋषी-महर्षि यज्ञ करायचे. तेव्हा राक्षस त्यांच्या यज्ञांत विघ्ने निर्माण करायचे. ‘त्या वेळी त्यांनी किती कष्ट सहन करून यज्ञसंस्कृती निर्माण केली आणि तिचे जतन केले’, असा विचार मनात येऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सप्तर्षि यांनी या सेवेची अमूल्य संधी दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, वाराणसी
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |