कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने ओढवलेल्या कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टर विविध माध्यमांतून साहाय्य करत असल्याची साधकाला आलेली अनुभूती !
१. घरातील सदस्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येणे, जुन्या घरी अलगीकरणात रहायला जाणे आणि अन् नामजपादी उपाय करणे
‘मार्च २०२१ मध्ये माझ्या आणि माझ्या मुलाचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला. त्यामुळे आम्ही दोघे आमच्या जुन्या घरी अलगीकरणात राहिलो. त्यानंतर माझी पत्नी सौ. पूजा हिचाही कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे तीही आमच्या जुन्या घरी रहायला आली. तिकडे गेल्यानंतर सौ. मनीषा पाठक यांनी आम्हाला संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय सांगितले. मी ‘महाशून्य’ हा जप करत असतांना ५ – ७ मिनिटांनी माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ किंवा ‘परम पूज्य डॉक्टर’ असा जप चालू व्हायचा. त्या संदर्भात त्यांनी सांगितले, ‘‘आवश्यक तो जप होऊ नये, यासाठी वाईट शक्ती अडथळे आणतात. त्यासाठी तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करा.’’ त्यानंतर माझा ‘महाशून्य’ हा जप होऊ लागला.
२. पाच मासांच्या नातीची आठवण होऊन मन भावनाशील होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर सर्व परिस्थिती धैर्याने हाताळता येणे
यामुळे आमच्या नवीन घरी सून सौ. तेजल आणि तिची ५ मासांची मुलगी ध्रुवी या दोघींनाच रहावे लागले. त्या वेळी भावनाशीलतेमुळे माझे मन अस्थिर झाले; कारण ध्रुवी तिच्या आईपेक्षा आमच्याकडेच अधिक वेळ असायची. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टरांनी बालसाधकांना घेतलेली छायाचित्रे आली. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘आता तुम्हीच ध्रुवीला खेळवा’, अशी प्रार्थना केली. तेव्हा ते सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘कृष्ण इकडचे जग तिकडे करेल; परंतु राधेला काही होऊ देणार नाही.’ (ध्रुवीला आम्ही घरात लाडाने ‘राधे’ म्हणून हाक मारतो.) त्या वेळी ध्रुवी नेहमीपेक्षा अधिक वेळ झोपायची. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सौ. तेजल सर्व परिस्थिती धैर्याने हाताळू शकली.
३. सुनेचाही कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने काळजी वाटणे आणि ‘कोविड केअर सेंटर’मध्ये काम करणार्या एका साधिकेने सुनेशी बोलून तिला धीर देणे
त्यानंतर तेजललाही त्रास होऊ लागला. तिची तपासणी केल्यानंतर तिचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे तेजलला ‘आता ध्रुवीचे कसे होणार, तिला त्रास होणार नाही ना ?’, अशी भीती वाटू लागली. तेव्हा सौ. मनीषा पाठक यांनी तेजलला धीर दिला, तसेच ‘कोविड केअर सेंटर’मध्ये सेवा करणार्या एक साधिका सौ. सविता चौधरी, ज्या अशा प्रसंगांतून गेल्या आहेत, त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलायला सांगितले. तेव्हा त्यांनी ‘योग्य काळजी घेतल्यास लहान बाळाला काही होणार नाही’, असे सांगून तेजलला धीर दिला.
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी आधीच नियोजन करून ठेवल्याप्रमाणे कठीण प्रसंगांत नातेवाइक, शेजारी आणि साधक यांचे वेळोवेळी साहाय्य लाभणे
आम्हाला या कठीण प्रसंगात स्थिर रहाता आले. खरेतर ‘स्थिर रहाता आले’, असे म्हणणे, हाही अहंकारच आहे. ‘आम्ही अस्थिर होऊ नये’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आधीच नियोजन करून ठेवले होते. या काळात साधक, सुनेचे आई-वडील, मावशी आणि आमच्या जुन्या घराजवळ रहाणार्या वाचक आजी यांचे आम्हाला साहाय्य झाले. आमच्याकडील सात्त्विक उत्पादने आणि साहित्य पोचवणारे रिक्शावालेकाका यांनीही रुग्णालयातून औषधे अन् अन्य साहित्य आणून देण्यास पुष्कळ साहाय्य केले. या संकटामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आम्हाला साहाय्य केले आणि एवढ्या मोठ्या प्रसंगांमध्ये आम्हाला काहीच जाणवू दिले नाही.
५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनदर्शन ग्रंथामुळे मिळाला आधार !
आमच्या जुन्या घरी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ आहे. या सर्व प्रसंगांत त्या ग्रंथातील चैतन्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमची सर्व प्रकारची काळजी घेऊन आम्हाला या कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
– श्री. शिरीष शहा, गावठाण, पुणे. (६.५.२०२१)
|