भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !
आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !
संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
भाग ४ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/482105.html
भाग ५
७. औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे
७ इ. भूमीची प्रतवारी कशी करतात ? : भूमीची प्रतवारी त्या भूमी कोणत्या खडकापासून निर्माण झाल्या आहेत ? त्या विभागातील हवामान कसे आहे ? यांवर अवलंबून असते. उथळ भूमी, मध्यम खोल भूमी आणि खोल भूमी अशी भूमीची प्रतवारी करतात.
७ इ १. उथळ भूमी : उथळ भूमी उंच शिखरे, तसेच डोंगरांच्या रांगा यांवर आढळतात. शेतीपिकांसाठी उथळ भूमी आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. या भूमीमध्ये काही ठिकाणी गंधक, लोह, जस्त आणि बोरॉन या अन्नघटकांची अल्पता आढळते. उथळ भूमीत वने आणि कुरणे यांची लागवड करणे लाभदायक ठरते.
७ इ २. मध्यम खोल भूमी : मध्यम खोल भूमी मेजाकृती पठारावर आढळतात. या भूमी मध्यम पोताच्या असून यांत नत्र, स्फुरद, लोह, जस्त आणि गंधक यांची अल्पता असते. पावसाची जर अनुकूलता असेल, तर या भूमीत दुबार पिके घेता येतात.
७ इ ३. खोल भूमी : खोल भूमी सुपीक असून प्रामुख्याने मैदानी भागांत आढळतात. या भूमीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या भूमीत सेंद्रिय कर्बाचे आणि नत्राचे प्रमाण अतिशय अल्प असते. उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण अल्प ते मध्यम असून उपलब्ध पालाश जास्त असते. लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची न्यूनता असते.’ – डॉ. जनार्दन कदम, वृषाली देशमुख (सोलापूर) (संदर्भ : दैनिक ‘लोकसत्ता’, २.३.२०१३)
७ ई. माती परीक्षण : कोणतीही मोठी लागवड करण्यापूर्वी ज्या भूमीत लागवड केली जाणार आहे, त्या भूमीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे. पिकांच्या वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यांपैकी एखादे जरी मातीत न्यून किंवा अधिक झाले, तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो. अन्नद्रव्यांची न्यूनता किंवा अभाव यांमुळे वनस्पतीमध्ये झाडांची पाने पिवळी पडणे, पाने गळणे, शिरा सोडून पानांचा इतर सर्व भाग वाळून जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या १८ अन्नद्रव्यांविना पिकांची वाढ पूर्ण होत नाही. ती अन्नद्रव्ये मिळाल्यावर खुंटलेली वाढ पुन्हा होऊ लागते. विशेषतः या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परीक्षण करणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याचे सामू, विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पलाश यांसाठी परीक्षण केले जाते.
७ ई १. माती परीक्षणाचे लाभ
अ. माती परीक्षणावरून भूमीत पीकवाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची उणीव आहे आणि ती उणीव नाहीशी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे ठरवता येते.
आ. माती परीक्षण आणि पिकांचे उत्पादन यांच्या संबंधावरून पिकांना भूमीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात अन् कम्पोस्ट, हिरवळीचे खत आणि गांडुळ खत इत्यादी खतांपासून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत, ही माहिती मिळते.
इ. आपण लावणार असलेल्या वनस्पतींच्या वाढीसाठी ती भूमी चांगली आहे किंवा नाही, हे समजते.
ई. विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून वनस्पतींच्या वाढीवर होणार्या परिणामाचे अनुमान लावता येते.’
७ उ. भूमीच्या प्रकारानुसार औषधी वनस्पतींची लागवड : माती परीक्षण केल्यावर, तसेच भूमीतील भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची पहाणी केल्यावर त्या भूमीमध्ये कोणत्या औषधी वनस्पती लावाव्यात, हे ठरवावे. भूमी आणि प्रजाती यांचा अभ्यास करून तज्ञांच्या समादेशाने (सल्ल्याने) लागवड केल्यास उत्पन्न चांगले मिळू शकते. पुढील सारणीमध्ये भूमीच्या प्रकारानुसार लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पतींची सूची दिली आहे.
(क्रमशः)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)